
ठाण्याच्या नौपाडा विभागातलं हिंदू कॉलनीतलं आमचं घर म्हणजे एक बागायती परिसरच. घराच्या आजूबाजूला नारळ, चिकू, पेरू, कैऱ्या, जाम यांची झाडं असायची. यातली आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच हयात आहेत. त्यात अजून एक भर म्हणजे जांभळाचे झाड, जे आमच्या समोरच्या बागेत आणि कोपऱ्यावरच्या दोन वाड्यात (आताच्या सोसायट्यांत) डौलाने उभं आहे. झाडावरची जांभळं खाली पडून सध्या दोन्ही रस्ते अक्षरशः जांभळे झाले आहेत. ते बघून मला आमचे जांभळाचे दिवस आठवले.
परिसरातील या झाडांभोवतीच आमच्या बालपणाच्या आठवणींनी जणू घर केलं आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की त्या झाडाच्या फांद्यांवर हलकेच जांभळं, कैऱ्या, जाम डोलू लागतात. ते पाहिलं कि आमच्या मनात उत्सुकतेची पालवी फुटायची. सकाळी उठल्या उठल्या नजरा त्या झाडाकडे वळायच्या, आज किती जांभळं पिकली असतील? दुपारी त्या वाड्यातील लोक झोपल्यावर कोण आधी पोहोचणार? या छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये बालपणाची खरी गोडी दडलेली होती.
जांभळाचे दिवस म्हणजे केवळ फळांचा ऋतू नव्हता, तर तो एक मैत्रीचा सोहळा होता. सगळी मुलं एकत्र यायची, कोणीतरी झाडावर चढायचं, कोणीतरी खाली उभं राहून पडणारी जांभळं उचलायचं. हात, ओठ, कपडे; सगळं जांभळ्या रंगाने रंगून जायचं. पण त्या रंगात एक वेगळीच आनंदाची छटा होती, जी आजच्या कृत्रिम रंगांमध्ये सापडत नाही.
आज मात्र या झाडांकडे पाहताना एक वेगळीच भावना मनात येते. शहर वाढतंय, इमारती उंचावत आहेत आणि झाडं मात्र शांतपणे नाहीशी होत आहेत. जिथे कधीकाळी मुलांच्या हसण्याचे आवाज घुमायचे, तिथे आता पार्किंगच्या जागा आणि काँक्रीटचे जंगल उभं राहत आहे. जांभळाचे दिवस आता केवळ आठवणीत उरले आहेत.

या बदलत्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण नकळत काही मौल्यवान गोष्टी गमावत आहोत. झाडं ही केवळ पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची, आठवणींची आणि भावविश्वाचीही घटक आहेत. जांभळाच्या झाडाखाली घालवलेले क्षण हे फक्त बालपण नव्हे तर एक सामूहिक जीवनशैली होती, जिथे निसर्ग आणि माणूस एकत्र जगत होते.
आज गरज आहे ती या नात्याला पुन्हा जपण्याची. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल न करता, त्यांच्यासोबत जगण्याची मानसिकता निर्माण करण्याची. प्रत्येक घराजवळ, प्रत्येक परिसरात एखादं जांभळाचं झाड उभं राहिलं, तर कदाचित पुढच्या पिढीलाही ‘जांभळाचे दिवस’ अनुभवायला मिळतील.
जांभळाच्या डागांनी रंगलेले ते हात,
आईच्या ओरडण्यातही लपलेला गोडवा,
आणि खिशात दडवलेली काही जांभळं;
आजही आठवणींच्या कपाटात
ती जांभळं ताजीच आहेत…
शेवटी, जांभळाचे दिवस हे फक्त ऋतू नसतात, तर ती एक भावना असते, जी जपली तरच टिकते… आणि ती जपणं, ही आपलीच जबाबदारी आहे.
जांभळाच्या सावलीतलं बालपण हरवलं,
आता उन्हात उभं आयुष्य सावली शोधतंय…
: मनीष चंद्रशेखर वाघ