
विशेष प्रतिनिधी :
भारतीय रेल्वेने मोठ्या गाजावाजात सुरू केलेले रेल-वन ऍप सध्या प्रवाशांच्या तीव्र नाराजीचे कारण ठरत आहे. जुलै २०२५ मध्ये सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिम्स (CRIS) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या ऍपला ‘अपग्रेडेड’ आणि ‘अधिक विश्वासार्ह’ म्हणून सादर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विशेषतः तत्काल तिकीट बुकिंगच्या वेळेस ऍपमध्ये गंभीर तांत्रिक समस्या उद्भवत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सकाळी तात्काळ बुकिंग सुरू होताच ‘कनेक्शन इश्यू’, ‘एनेबल टू प्रोसेस रिक्वेस्ट’ यांसारखे संदेश मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. परिणामी, तिकीट बुकिंग प्रक्रिया अर्धवटच थांबते. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, बुकिंग सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच सर्व सीट भरल्याचे दाखवले जाते, पण त्याचवेळी ऍप सतत एरर दाखवत राहते.
प्रवाशांच्या मते, पूर्वीचे रेल कनेक्ट ऍप अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होते. नव्या रेल-वन ऍपमध्ये वारंवार लॉग आउट होणे, सर्व्हर डाऊन होणे, तसेच पैसे खात्यातून डेबिट होऊनही तिकीट कन्फर्म न होणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये प्रवाशांना परतावा मिळण्यातही विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
या तांत्रिक अडचणींमुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढत आहे. अनेकांना नाईलाजास्तव एजंट्सकडे जावे लागत असून, तेथे तिकीट मिळवण्यासाठी जादा शुल्क आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे प्रशासनाने यापूर्वी सर्व्हर क्षमता वाढविण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात बुकिंगच्या ‘पीक अवर्स’मध्ये ही यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, अॅपच्या बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करणे, लोड मॅनेजमेंट अधिक सक्षम करणे आणि युजर इंटरफेस अधिक सुलभ करणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून रेल-वन ऍपमधील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.
जोपर्यंत या तांत्रिक अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने उचललेले हे पाऊल प्रवाशांसाठी सोयीपेक्षा त्रासदायक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.