विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

देवाभाऊ, काही दिवस ठाण्यात राहून बघाच…

ठाणे… महाराष्ट्रातील आठ स्मार्ट सिटींपैकी एक गजबजलेलं शहर! पण सध्या या शहराची अवस्था एकदमच बकाल झाली आहे. राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान याच शहरात! या जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याचकडे. पण सध्या त्यांचा ठाण्यावर काहीच वकूब नसल्याचे दिसून येतेय. आज हे शहर केवळ नकाशावर वाढलेले महानगर नाही, तर गोंधळ, घाई, आणि गाड्यांच्या न संपणाऱ्या रांगेत अडकलेली एक जिवंत कहाणी बनले आहे. विकासाच्या नावाखाली इथे सुरू असलेल्या कामांची परस्परविरोधी शर्यत आहे. रस्ते बनण्याआधीच वाहतूक कोसळते आणि नियोजनाआधीच संयम संपतो.

कधी कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळून ट्राफिक जॅम होते तर कधी माजिवडा चौकात रस्ता खचून वाहतूककोंडी; कधी घोडबंदर रोडवरील सेवा रस्ते वर्षानुवर्षे अर्धवट राहतात तर कधी पुन्हा कोपरी पुलावर एखादा कंटेनर बंद पडून वाहतूक खोळंबते. ही सगळी घटनांची मालिका अपघात म्हणून बाजूला काढता येत नाही. ती एका खोल व्यवस्थात्मक त्रुटीची साक्ष देते. प्रश्न फक्त एवढाच नाही की रस्ता खचला; प्रश्न असा आहे की तो नेमका कुठे खचला हे शोधायला चार दिवस का लागतात?

देवाभाऊ, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की भूमिगत हालचालींचा मागोवा घेणे कठीण राहिलेले नाही. पण ठाण्यात अजूनही अंदाजपंचे तर्क आणि प्रयोग यांच्या आधारे कामे सुरू असल्याचे चित्र दिसते. एक जागा खणली जाते, चूक लक्षात येते. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खणले जाते. या सगळ्या प्रक्रियेत शहर चार दिवस ठप्प. या दरम्यान वाहतूक पोलिस मात्र रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या संतापाचे लक्ष्य बनतात.

खरे पाहता, ही केवळ वाहतूक कोंडी नाही; ही समन्वयाच्या अभावाची कोंडी आहे. पालिका आणि पोलिस यांच्यातील संवाद तुटलेला आहे. नियोजन करणारे वेगळे, अंमलबजावणी करणारे वेगळे आणि परिणाम भोगणारे वेगळे अशी तिहेरी फूट शहराच्या नसा अडवून बसली आहे.

सीएम साहेब, सेवा रस्त्यांची कहाणी तर अधिकच विचित्र आहे. आर मॉलजवळचा रस्ता वर्षभर बंद आहे, विहंग हॉटेल परिसरातही तेच चित्र. एकेकाळी मेट्रोचे कारण दिले गेले; आता मेट्रो संपत आली, पण अडथळे तसेच उभे. विकासाचा प्रवास जर सततच्या अडथळ्यांतूनच होणार असेल तर तो नागरिकांसाठी दिलासा नाही, तर शिक्षा ठरतो.

राजकीय पातळीवर हालचाली दिसतात. बैठका होतात, सूचना दिल्या जातात. पण प्रत्यक्षात यंत्रणा हलताना दिसत नाही. कागदावरची गती आणि रस्त्यावरची गती यातला फरक इतका प्रचंड आहे की नागरिकांचा विश्वासच डळमळू लागला आहे. कदाचित ही वेळ केवळ आदेश देण्याची नाही, तर उत्तरदायित्व निश्चित करण्याची आहे.

आज गरज आहे ती ठोस हस्तक्षेपाची. शहराच्या समस्यांना फक्त अहवालांमध्ये किंवा बैठकीत ऐकून चालणार नाही. त्या प्रत्यक्ष अनुभवायला हव्यात. म्हणूनच, सीएम साहेबांनी स्वतः ठाण्यात येऊन काही दिवस मुक्काम करावा, अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधावा, आणि जमिनीवरील वास्तव पाहावे, अशी मागणी आता ठाणेवासीय करू लागले आहेत.

ही मागणी केवळ भावनिक नाही, तर आवश्यक आहे. कारण कधी कधी, शहर समजून घ्यायचे असेल तर शहरातील रस्त्यांवर उभे राहावे लागते, त्या कोंडीत अडकून पाहावे लागते. कदाचित तेव्हाच निर्णयांना वेग येईल आणि शहर मोकळा श्वास घेईल…

तोपर्यंत, ठाणेकर मात्र ‘उमेद अजून जिवंत आहे, म्हणून शहरही जिवंत आहे’ या आशेवरच जगत राहतील.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें