विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

‘ग्रीन नोबेल’ २०२६ मध्ये महिलांची ऐतिहासिक झेप

एकीकडे भारतात महिला आरक्षणाचा राजकीय वाद पेटला आहे तर दुसरीकडे जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या संघर्षात २०२६ हे वर्ष एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्काराने यंदा प्रथमच संपूर्ण महिलांच्या गटाचा सन्मान करून इतिहास रचला आहे. ‘ग्रीन नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार केवळ गौरवाचा मानच नाही, तर तळागाळातील लढ्यांना जागतिक ओळख देणारे व्यासपीठ आहे. या सहा महिलांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे की, स्थानिक पातळीवरील प्रयत्नदेखील जागतिक बदलाला चालना देऊ शकतात.

या पुरस्काराची स्थापना १९८९ मध्ये रिचर्ड आणि रोड्डा गोल्डमन यांनी केली. तेव्हापासून दरवर्षी सहा भौगोलिक प्रदेशांतील कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. प्रत्येक विजेत्याला मिळणारी आर्थिक मदत आणि जागतिक प्रतिष्ठा ही त्यांच्या लढ्याला बळ देणारी ठरते. मात्र, यंदाच्या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचे एकत्रित नेतृत्व. हे केवळ प्रतीकात्मक नसून, पर्यावरण क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे ठोस उदाहरण आहे.

इरोरो तान्शी (नायजेरिया) – आफ्रिका, बोरीम किम (दक्षिण कोरिया) – आशिया, सारा फिंच (युनायटेड किंगडम) – युरोप, थिओनिला रोका मॅटबॉब (पापुआ न्यू गिनी) – बेटे आणि बेट राष्ट्रे, अलानाह अकाक हर्ले (युनायटेड स्टेट्स) – उत्तर अमेरिका आणि युवेलिस मोरालेस ब्लँको (कोलंबिया) – दक्षिण आणि मध्य अमेरिका या सहा विजेत्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास पर्यावरणीय संघर्षाची विविध रूपे स्पष्ट होतात.

काहींनी जीवाश्म इंधन प्रकल्पांविरोधात लढा उभारला, तर काहींनी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अथक प्रयत्न केले. कोलंबियामधील फ्रॅकिंगविरोधी आंदोलन असो किंवा दक्षिण कोरियातील हवामान न्यायासाठीचा न्यायालयीन संघर्ष. या सर्व प्रयत्नांनी सरकार आणि उद्योगांना जबाबदारीची जाणीव करून दिली. त्याचबरोबर, अलास्का आणि पापुआ न्यू गिनीमधील परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी उभारलेले आंदोलन हे स्थानिक समुदायांच्या हक्कांचेही प्रतिनिधित्व करते.

यातून पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ वैज्ञानिक किंवा राजकीय नाही, तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचा विषय असल्याचे स्पष्ट होते, महिलांनी नेतृत्व केलेल्या या चळवळींमध्ये संवेदनशीलता, दीर्घकालीन विचार आणि समुदायाशी असलेली नाळ स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच या लढ्यांना अधिक व्यापक समर्थन मिळताना दिसते.

आजच्या काळात, जेव्हा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत आहेत, तेव्हा अशा तळागाळातील चळवळींचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. शासन आणि धोरणनिर्माते यांच्यासोबतच सामान्य नागरिकांनीही या प्रयत्नांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. गोल्डमन पुरस्कार २०२६ हा केवळ सहा महिलांचा सन्मान नाही, तर पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग अनिवार्य असल्याचा एक संदेश आहे,

महिलांच्या या ऐतिहासिक यशामुळे पर्यावरण चळवळींना नवी ऊर्जा मिळाली आहे. आता गरज आहे ती या ऊर्जेला व्यापक जनआंदोलनात रूपांतरित करण्याची.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment