
‘विकास’ हा कोणत्याही स्मार्ट शहराच्या प्रगतीचा अविभाज्य भाग असतो. उंच इमारती, विस्तीर्ण रस्ते, मेट्रोचे जाळे आणि नव्या गृहसंकुलांमुळे शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र उभे राहते. मात्र, या विकासासाठी जर निसर्गाचा बळी दिला जात असेल, तर तो विकास नव्हे तर भविष्यासाठी उभा राहणारा गंभीर धोका आहे. ठाण्यासारख्या शहरांमध्ये आज हे वास्तव प्रकर्षाने जाणवत आहे.
एकेकाळी तलावांचे शहर, हिरवळ आणि आल्हाददायक वातावरणासाठी ओळखले जाणारे ठाणे आता झपाट्याने काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित होत आहे. वृक्षतोड, डोंगर सपाट करून उभारले जाणारे प्रकल्प, वाढते सिमेंट-काँक्रीटीकरण आणि नैसर्गिक जलस्रोतांवर होणारे अतिक्रमण यामुळे शहराचा नैसर्गिक श्वास गुदमरू लागला आहे. आज घोडबंदर भागात अनेक नवनवे गृहप्रकल उभे राहत आहेत. पण परिसर अक्षरशः वाळवंटासारखा रखरखीत झाला आहे. गडकरी रंगायतांजवळ पार्किंगचे काम सुरु आहे. तिथलेही अनेक मोठमोठे वृक्ष तोडले आहेत. या सगळ्यामुळे ठाण्यात वाढलेले तापमान हे केवळ हवामान बदलाचे परिणाम नसून शहराने स्वतः निर्माण केलेल्या संकटाचे संकेत आहेत.

पूर्वी झाडांच्या सावलीत गारवा अनुभवणारे रस्ते आता उन्हाच्या झळांनी तापलेले दिसतात. मोकळी मैदाने, हिरवे पट्टे आणि ओलसर जागा वेगाने नाहीशा होत असल्याने उष्णता शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणाच कमकुवत झाली आहे. परिणामी उन्हाळ्यातील तापमान अधिक तीव्र होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. प्रदूषण, श्वसनविकार, उष्माघात आणि मानसिक तणाव या समस्या वाढण्यामागे पर्यावरणीय असंतुलन हा मोठा घटक आहे.
विकास आवश्यकच आहे; परंतु विकासाचा अर्थ निसर्गाचा विनाश असू शकत नाही. दुर्दैवाने अनेक विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहते. शेकडो वर्षे जुनी झाडे तोडून त्यांच्या बदल्यात लहान रोपे लावण्याची घोषणा केली जाते; पण त्या रोपांमुळे तत्काळ पर्यावरणीय समतोल निर्माण होत नाही. मोठ्या वृक्षांची सावली, कार्बन शोषण्याची क्षमता आणि जैवविविधतेला मिळणारा आधार यांची तुलना छोट्या रोपांशी होऊच शकत नाही.
शहर नियोजन करताना हिरव्या पट्ट्यांचे संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक बांधकाम यांना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. केवळ विकास प्रकल्पांची संख्या वाढवणे म्हणजे प्रगती नव्हे; तर नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि संतुलित जीवनमान देणे ही खरी प्रगती ठरते. प्रशासनाने वृक्षतोडीवर कठोर नियंत्रण आणणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरणीय उत्तरदायित्व निश्चित करणे गरजेचे आहे.

आज जर शहरांनी निसर्गाशी संघर्ष करण्याचा मार्ग निवडला, तर भविष्यातील पिढ्यांना उष्णता, पाण्याची टंचाई आणि प्रदूषणाने वेढलेले जीवन जगावे लागेल. म्हणूनच विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखणारी भूमिका स्वीकारणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, हिरवाई गमावून उभा राहिलेला विकास शहराला समृद्ध नव्हे, तर असुरक्षित आणि असह्य बनवेल.
: मनीष चंद्रशेखर वाघ