विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

आरसा फोडून चेहरा बदलत नसतो…

“तुम गंदा लिखते हो” न्यायालयात जजने सआदत हसन मंटो यांना सुनावले तेव्हा मंटोंनी दिलेले उत्तर आजही काळजाला भिडते.
“तुम गंद हटवा दो, मैं लिखना छोड़ दूंगा!”

मंटो यांचं हे वाक्य संपूर्ण समाजव्यवस्थेला दिलेली चपराक होती. कारण समाजाला नेहमीच आरसा दाखवणाऱ्यांची भीती वाटते. आरशात दिसणारा कुरूप चेहरा बदलण्याऐवजी लोक आरसाच फोडण्याचा प्रयत्न करतात. आजच्या काळातही हेच घडताना दिसते आहे.

आज आपल्या समाजात भ्रष्टाचार, स्त्री अत्याचार, धार्मिक द्वेष, पर्यावरणाचा विनाश, बेरोजगारी, राजकीय ढोंग, खोटी राष्ट्रभक्ती, सोशल मीडियावरील विषारी प्रचार, ट्रोल संस्कृती, मानसिक शोषण अशा अनेक ‘घाणी’ वाढत चालल्या आहेत. पण या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांना मात्र ‘नकारात्मक’, ‘देशद्रोही’, ‘समाजविघातक’ किंवा ‘विकासविरोधी’ ठरवले जाते. म्हणजे प्रश्न निर्माण करणाऱ्यांना सोडून प्रश्न समोर आणणाऱ्यांवरच खटले भरले जातात.

आज पत्रकार जर एखाद्या घोटाळ्याचा पर्दाफाश करतो, तर त्याची निष्ठा विचारली जाते. एखादा लेखक जातीय हिंसाचारावर लिहितो, तर त्याला एका विचारधारेत ढकलले जाते. एखादा तरुण प्रश्न विचारतो, तर त्याच्या देशप्रेमावर संशय घेतला जातो. जणू समाजाने ठरवले आहे की सत्य दिसू नये, अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि वास्तवावर सुंदर रंग चढवून सर्व काही सुरळीत असल्याचे भासवावे. मात्र वास्तव लपवून ते बदलत नाही.

वर्तमानपत्रात छापला म्हणून रस्त्यावरचा खड्डा तयार होत नाही; तो आधीपासूनच असतो. स्त्रीवर अत्याचाराची बातमी आली म्हणून अत्याचार होत नाही; तो समाजात आधीपासून घडत असतो. बेरोजगार तरुण आत्महत्या करतो तेव्हा त्याची बातमी ‘देशाची बदनामी’ करत नाही; उलट ती व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देत असते.

मंटो यांचे लेखन अश्लील कधीच नव्हते; समाजाचे वास्तव अश्लील होते. त्यांनी फाळणीतील हिंसा, माणसातील पशुत्व आणि स्त्रीदेहावरील क्रौर्य शब्दांत मांडले. लोकांना त्यांच्या कथा अस्वस्थ करायच्या, कारण त्या कथांमध्ये समाजाचे खरे चेहरे दिसायचे. आजही परिस्थिती फार बदललेली नाही. फक्त माध्यमे बदलली आहेत; असहिष्णुता मात्र तशीच आहे.

सोशल मीडियाच्या युगात तर ‘प्रतिमा’ ही सत्यापेक्षा मोठी झाली आहे. एखादी घटना घडली की लोक तिच्यावर उपाय शोधण्याऐवजी ‘ट्रेंड’ नियंत्रित करण्यात गुंततात. पीडितांपेक्षा ‘इमेज मॅनेजमेंट’ महत्त्वाचे ठरते. टीका सहन करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रश्न विचारणारा प्रत्येक आवाज धोकादायक वाटू लागतो.

पण लोकशाहीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य. समाजातील घाण दाखवणाऱ्यांवर बंदी घालून समाज स्वच्छ होत नाही. उलट घाण अधिक खोलवर सडत जाते. लेखक, पत्रकार, कवी, व्यंगचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते हे समाजाचे शत्रू नसतात; ते चेतनेचे प्रहरी असतात. त्यांचे काम टाळ्या मिळवणे नसून, झोपलेल्या विवेकाला जागे करणे असते.

आज गरज आहे ती मंटो समजून घेण्याची. कारण प्रत्येक काळात काही लोक वास्तव लिहितात आणि काही लोक वास्तव लपवतात. इतिहास मात्र नेहमी वास्तव लिहिणाऱ्यांच्या बाजूने उभा राहतो.

समाज बदलायचा असेल तर आवाज दाबून चालणार नाही; कारण दाबलेला आवाज अधिक तीव्र होऊन परत येतो.
खरी गरज आहे ती समाजातील अन्यायाची, दुटप्पीपणाची, भ्रष्टाचाराची, द्वेषाची आणि संवेदनाहीनतेची. ‘गंद’ हटवण्याची. कारण आरसा फोडून चेहरा सुंदर होत नाही.

आरसा फोडून
चेहरा कधी बदलत नसतो,
फक्त सत्याचे तुकडे
पायांत रुतत राहतात…

भिंतींवर रंग चढवून
वास्तव झाकता येत नाही,
कारण प्रत्येक जखम
शब्दांतून पुन्हा रक्ताळत असते…

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें