
अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकताच एक अन्नविषयक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार २०२६-२७ या हंगामात जगातील तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ‘भाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही’ असे मानणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी जागतिक स्तरावरून आलेली एक बातमी धोक्याची घंटा ठरू शकते. उत्पादन घटत असताना खप मात्र वाढत असल्याने भविष्यात अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो.
जगातील मोठ्या लोकसंख्येचे प्रमुख अन्न म्हणजे तांदूळ. आशियातील भारत, चीन, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड यांसारख्या देशांत तर भात हे केवळ अन्न नाही, तर संस्कृतीचाच भाग आहे. अशा वेळी जागतिक उत्पादन घटण्यामागे अनेक कारणे दिसतात. हवामान बदलामुळे अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि पूर यांचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. काही देशांमध्ये शेतीयोग्य जमीन कमी होत आहे, तर काही ठिकाणी शेतकरी कमी नफा आणि वाढते खर्च यामुळे भात शेतीपासून दूर जात आहेत.
भारतासारख्या देशासाठी ही बाब अधिक चिंताजनक आहे. जगातील सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु देशातील अनेक भागांत पाण्याची कमतरता, जमिनीची घटती सुपीकता आणि उत्पादन खर्च वाढल्याने तांदूळ शेतीवर दबाव निर्माण झाला आहे. पंजाब, हरियाणा यांसारख्या भागांत भूजलाचा अतिवापर तर पूर्व भारतात पूरस्थिती ही मोठी समस्या ठरत आहे.
महाराष्ट्राची परिस्थितीही फार वेगळी नाही. राज्यात कोकण, विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर भात लागवड होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा या भागांत भात हे मुख्य पीक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे उत्पादनात मोठी चढ-उतार दिसून येत आहे. कोकणात कधी अतिवृष्टी तर कधी पावसातील खंड यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. शहरीकरणामुळे शेती जमीन कमी होत आहे. तरुण पिढी शेतीपासून दूर जात असल्याने मजुरांची कमतरताही जाणवते. परिणामी, अनेक शेतकरी पारंपरिक भात शेती सोडून इतर पर्यायांकडे वळताना दिसतात.
याचा थेट परिणाम बाजारावर होऊ शकतो. उत्पादन घटल्यास तांदळाचे दर वाढतील, सर्वसामान्यांच्या ताटातील भात महाग होईल आणि गरीब कुटुंबांच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरही त्याचा ताण वाढू शकतो. भविष्यात “भात ताटातून गायब होतोय का?” हा प्रश्न केवळ रूपक राहणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे. पाणी बचतीच्या आधुनिक पद्धती, हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या बियाण्यांचा वापर, शेतकऱ्यांना हमीभाव आणि तांत्रिक मदत यावर भर द्यावा लागेल. महाराष्ट्रात पारंपरिक भात जातींचे संवर्धन, लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि शेतीकडे तरुणांना आकर्षित करणारी धोरणे राबवणे गरजेचे आहे.
भात हा केवळ अन्नपदार्थ नाही; तो आपल्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा आणि अन्नसुरक्षेचा आधार आहे. त्यामुळे आजचा हा इशारा वेळेत समजून घेतला नाही, तर उद्या ताटातील भात खरोखरच दुर्मिळ होऊ शकतो.
: मनीष चंद्रशेखर वाघ