
आज ५ जून. आज जगभर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध घोषणा, उपक्रम आणि चर्चांचा धडाका सुरू आहे. पण दुसरीकडे जगातील अनेक भागांत सुरू असलेली युद्धे पृथ्वीच्या जखमा अधिकच खोल करत आहेत. युद्धात किती सैनिक मारले गेले, किती इमारती उद्ध्वस्त झाल्या, किती प्रदेश जिंकले गेले याची चर्चा होते; मात्र पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी अनेकदा दुर्लक्षित राहते.
युद्ध म्हणजे केवळ माणसांविरुद्धचा संघर्ष नसतो, तो निसर्गाविरुद्धही छेडलेला विनाशकारी हल्ला असतो. बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने आणि स्फोटकांचा प्रचंड वापर यामुळे हवेत विषारी वायूंचे प्रमाण वाढते. हजारो टन कार्बन उत्सर्जन वातावरणात मिसळते. एका युद्धात जेवढे प्रदूषण होते, ते अनेक देशांच्या वार्षिक औद्योगिक उत्सर्जनाइतके असू शकते.
युद्धग्रस्त भागांतील जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आगी लागतात, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात, नद्या-तलाव दूषित होतात. जमिनीतील रासायनिक प्रदूषणामुळे शेतीची सुपीकता कमी होते. अनेक वर्षे त्या भागातील जमीन, पाणी आणि हवा सामान्य स्थितीत येत नाही. युद्ध संपते, पण त्याचे पर्यावरणीय परिणाम पिढ्यान्पिढ्या भोगावे लागतात.
आज हवामान बदल, वाढते तापमान, दुष्काळ, पूर आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही मानवजातीसमोरील मोठी आव्हाने आहेत. अशा वेळी युद्धे या संकटांना आणखी तीव्र बनवत आहेत. एका बाजूला पर्यावरण वाचवण्याचे संमेलन भरवले जाते, तर दुसऱ्या बाजूला अब्जावधी डॉलर्स शस्त्रास्त्रांवर खर्च केले जातात. पृथ्वीला वाचवण्यासाठी जेवढी गुंतवणूक आवश्यक आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा तिच्या विनाशासाठी खर्च होत आहे, ही शोकांतिका आहे.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती किंवा स्वच्छता मोहिमा निश्चितच महत्त्वाच्या आहेत. परंतु पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार जागतिक शांततेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण युद्धाच्या ज्वाळांमध्ये केवळ मानवी जीवनच जळत नाही, तर जंगलांचा हिरवा श्वास, नद्यांचे निर्मळ पाणी आणि पृथ्वीचे भवितव्यही राख होत असते.
आज पर्यावरण दिनी ‘पृथ्वी वाचवायची असेल तर फक्त झाडे लावणे पुरेसे आहे का, की युद्धाच्या मानसिकतेलाही मुळापासून उपटून टाकण्याची गरज आहे?’ हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
निसर्गाला सीमा माहीत नसतात. धुराचे ढग, प्रदूषित हवा आणि तापमानवाढ कोणत्याही राष्ट्राच्या सीमांवर थांबत नाहीत. म्हणूनच पर्यावरण संरक्षणाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शांततेची वाट. कारण जिथे युद्ध असते तिथे विकास मरतो; आणि जिथे शांतता असते तिथेच पर्यावरण फुलते.
: मनीष चंद्रशेखर वाघ