विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

कधी रे येशील तू…

राज्यात पावसाची चाहूल लागली की मनात एक वेगळीच हुरहूर दाटून येते. शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे खिळतात, शहरातील नागरिक उकाड्यापासून मुक्तीची वाट पाहतात आणि नद्या तलाव नवजीवनाच्या प्रतीक्षेत असतात. पण यंदा पुन्हा एकदा पावसाने `येईन’ म्हणत दाराशी येऊनही पाऊल आत टाकलेले नाही. त्यामुळे सर्वत्र एकच प्रश्न घुमतो आहे, `कधी रे येशील तू?’

गेल्या काही आठवड्यांपासून वातावरणात कमालीची अस्थिरता दिसत आहे. कधी ढग दाटून येतात, कधी वाऱ्याचा वेग वाढतो, तर कधी एखादी सर येऊन आशा निर्माण करते. पण पावसाची खरी सलग साथ अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीची तहान भागलेली नाही आणि खरीप हंगामाचे गणित बिघडण्याची भीती वाढू लागली आहे.

शहरांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. तापमानाचा पारा सातत्याने चढत आहे. दमट उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजेचा वापर वाढल्याने यंत्रणांवर ताण निर्माण होत आहे. जलसाठ्यांची चिंता कायम आहे. ज्या पावसाकडे जीवनाचा आधार म्हणून पाहिले जाते, त्याच पावसाची प्रतीक्षा आता अस्वस्थतेत रूपांतरित झाली आहे.

पर्यावरणातील बदलांचे परिणामही यामागे स्पष्टपणे दिसू लागले आहेत. जंगलतोड, काँक्रीटीकरण, डोंगरांची तोडफोड, नैसर्गिक संसाधनांवरील वाढता दबाव आणि त्यात अमेरिका – इराण युद्धाची भर; यामुळे ऋतुचक्राचे संतुलन ढासळत आहे. पूर्वी ठरावीक वेळी येणारा पाऊस आता अनिश्चित झाला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी प्रदीर्घ कोरडेपणा, अशी टोकाची स्थिती निर्माण होत आहे.

पावसाची प्रतीक्षा ही केवळ हवामानाची बाब नाही; ती अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, पिण्याचे पाणी आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. म्हणूनच प्रत्येक ढगाकडे आशेने पाहिले जाते. प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीत पावसाचा संदेश शोधला जातो.

पाऊस वेळेवर यावा अशी अपेक्षा ठेवताना, त्याला येण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण आपण जपतो आहोत का, हा प्रश्नही स्वत:ला विचारायला हवा. कारण निसर्गाशी विसंगत विकासाची किंमत अखेर निसर्गच वसूल करतो.

आज आभाळ भरून आले आहे. क्षितिजावर ढगांचे तांडे दिसत आहेत. शेतकऱ्याचे डोळे अजूनही आकाशाकडेच लागलेले आहेत. शहरातील माणूसही उष्णतेने हैराण होऊन पहिल्या सरीची वाट पाहत आहे. आणि म्हणूनच सर्वांच्या मनातील एकच आर्त हाक, `कधी रे येशील तू…?’
कारण तुझ्या आगमनातच हिरवाईचे स्वप्न आहे, जीवनाचा श्वास आहे आणि उद्याच्या आशेची नवी पालवी आहे.

कधी रे येशील तू,
असे विचारत
धरतीने पुन्हा
आभाळाकडे हात पसरले आहेत…

नद्या थांबल्या आहेत
आपल्या कोरड्या काठांवर,
विहिरींच्या तळाशी
पाण्याची आठवण उरली आहे.

शेतकरी अजूनही
मुठीत बी धरून उभा आहे,
स्वप्नांची पेरणी करायची आहे त्याला,
पण ढगांनी अजून
शब्द दिलेला नाही.

वारा येतो,
पानांशी कुजबुजतो,
`तो येईल..’
असे सांगून जातो;
आणि पुन्हा
उकाड्याची शिक्षा वाढते…

शहरही वाट पाहते आहे,
काँक्रीटच्या जंगलात
पहिल्या सरींच्या सुगंधासाठी;
धुराने काळवंडलेल्या
आकाशाला धुवून काढणाऱया
एखाद्या पावसासाठी…

तोडलेली झाडे,
बुजवलेलेया ओढे,
फोडलेले डोंगर
आणि विकासाच्या नावाखाली
गुदमरलेली हिरवाई;

याच सगळ्यांचा तू
हिशेब मांडत असशील का?

तरीही ये…
राग विसरून ये,
कोरड्या मातीत
हिरव्या कविता फुलवायला ये…

कारण तुझ्याविना
धरतीचे ओठ कोरडे आहेत,
आणि माणसाच्या डोळ्यांत
आशेचा शेवटचा थेंब
अजून तुझीच वाट पाहतो आहे…

: मनीष चंद्रशेखर वाघ

 

Leave a Comment

और पढ़ें