
लोकशाहीत सामान्य नागरिकाच्या भावना, त्याचे दुःख, त्याग आणि विश्वास यांची किंमत नेमकी किती आहे? हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशात गेल्या काही दिवसांत घडलेल्या चार घटनांनी पुन्हा ऐरणीवर आणून ठेवला आहे, सत्ता ही जनतेच्या विश्वासावर उभी असते; पण जेव्हा त्याच जनतेच्या जखमांवर राजकीय जल्लोषाचे फटाके उडवले जातात, तेव्हा लोकशाहीचा आत्माच जखमी होतो.
पहिली घटना म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. देशासाठी लढणाऱ्या सहा जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देशाचा सलाम आहे. परंतु या घटनेने एक कटू प्रश्नही उभा राहतो. सुरुवातीला ‘आमचे कोणतेही नुकसान झाले नाही’ असा दावा करण्यात आला आणि त्यानंतर विजयाचे सोहळे, मिरवणुका, अभिनंदनाचे कार्यक्रम यांची रेलचेल झाली. नंतर मात्र शहीद जवानांची माहिती अधिकृतपणे समोर आली. युद्धात काही माहिती सुरक्षेच्या कारणास्तव लगेच जाहीर केली जात नाही, हे मान्य असले तरी जनतेशी संवाद साधताना अचूकता आणि संवेदनशीलता यांची अपेक्षा असते. शहीद कुटुंबीयांच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर विजयाचा जल्लोष अधिक संयमाने व्यक्त झाला असता, तर तो अधिक सन्मानजनक ठरला असता.
दुसरी घटना शिक्षण व्यवस्थेतील विश्वासाला तडा देणारी आहे. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रश्नचिन्हात आले. देशभरात संताप, आंदोलन आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी सत्तेतील व्यक्तींच्या अभिनंदनपर संदेशांमुळे किंवा राजकीय औपचारिकतेमुळे अनेकांना प्रशासन जनतेच्या वेदनांपासून दूर असल्याची भावना निर्माण झाली. विद्यार्थ्यांना आश्वस्त करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची प्रतिमा महत्त्वाची वाटू लागली, अशी टीका होणे साहजिक आहे.
तिसरी घटना श्रद्धेशी निगडित आहे. ‘राम मंदिरा’साठी देशभरातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या, सोने-चांदी आणि इतर अर्पणे झाली. ही केवळ आर्थिक मदत नव्हती; तो कोट्यवधी नागरिकांचा विश्वास होता. अशा ठिकाणी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांच्या बातम्या समोर येत असतील, तर पारदर्शकता, सुरक्षा आणि उत्तरदायित्व यांबद्दल प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. श्रद्धा ही आंधळी नसते; ती विश्वासावर उभी असते. आणि विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक व्यवस्थापन आवश्यक असते.
चौथी घटना म्हणजे पुन्हा एकदा ‘टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची’. एका बाजूला नीट परीक्षेतील गैरव्यवहारावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेवरही संशयाचे सावट आले. शिक्षक घडविण्याची प्रक्रिया जर अशा प्रकारच्या घटनांनी दूषित होत असेल, तर त्याचा परिणाम केवळ उमेदवारांवर नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होतो. प्रत्येक पेपरफुटी म्हणजे लाखो तरुणांच्या परिश्रमांचा आणि प्रामाणिकपणाचा अपमान असतो.
या चारही घटनांचा धागा एकच आहे, ‘सामान्य नागरिकाचा विश्वास.’ सैनिकाचा त्याग, विद्यार्थ्यांची मेहनत आणि श्रद्धाळू नागरिकांची भावना या तिन्ही गोष्टींना सत्तेने केवळ राजकीय घोषणांपुरते किंवा प्रतिमानिर्मितीचे साधन म्हणून पाहू नये. लोकशाहीमध्ये सरकार केवळ निर्णय घेणारी यंत्रणा नसते; ती समाजाच्या भावनांची संवेदनशील संरक्षकही असते.
आजची सर्वात मोठी चिंता ही कोणत्याही एका घटनेची नाही; तर सत्ताधाऱ्यांच्या प्रतिसादाची आहे. चूक होऊ शकते, व्यवस्थेत त्रुटी असू शकतात; पण त्या मान्य करण्याची प्रामाणिकता, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि जखमी मनांशी संवाद साधण्याची संवेदनशीलता हीच लोकशाहीची खरी ताकद असते. जेव्हा त्याऐवजी उत्सव, प्रचार आणि प्रतिमेचे राजकारण पुढे येते, तेव्हा नागरिकांचा विश्वास ढासळतो.
लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबून चालत नाही आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तर अजिबात नाही. कारण सत्ता ही कायमस्वरूपी नसते; पण जनतेच्या स्मृती दीर्घकाळ टिकतात. सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान, विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी आणि श्रद्धाळूंच्या विश्वासाचे संरक्षण ही कोणत्याही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे.
सत्ता जनतेमुळे मिळते; पण ती टिकते जनतेच्या विश्वासामुळे आणि जेव्हा त्या विश्वासापेक्षा उत्सव मोठा वाटू लागतो, तेव्हा तो लोकशाहीचा विजय नसून तिच्या संवेदनशीलतेचा पराभव असतो.
: मनीष चंद्रशेखर वाघ