
हल्ली माझाही ‘मोजो मोमेंट’ आला आहे म्हणे! तुमचा आला का? नसेल तर लवकर तयार करून ठेवा. नाहीतर ‘फोमो’ नावाचा आधुनिक राक्षस तुम्हाला गिळंकृत करेल. मोजो म्हणजे करिष्माई क्षण आणि फोमो म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहून स्वतःला झालेली अस्वस्थता. पूर्वी लोकांना शेजाऱ्याच्या गाईचं दूध जास्त आहे म्हणून वाईट वाटायचं; आता त्याच्या रीलला लाख व्ह्यूज मिळाले म्हणून झोप उडते.
मी तर आयुष्यभर मराठी मातीत आणि माणसांत राहण्याचा प्रयत्न केला. इंग्रजीच्या वसाहतवादातून बाहेर पडावं म्हणून धडपडलो; पण सोशल मीडियाने पुन्हा नव्या गुलामगिरीत ढकललं. जणू काही जाळ्यात अडकलेल्या हरिणासारखी माझी अवस्था. जितका सुटायचा प्रयत्न करतो, तितकाच अल्गोरिदमच्या दोऱ्यांत आणखी घट्ट गुरफटत जातो.
पूर्वी लेखक लिहायचा. आता लेखक ‘दिसतो’. इंस्टाग्रामने साहित्यालाच नवा मंत्र दिला आहे ‘लिहू नका, दिसा!’ तुम्ही काय लिहिलंत, यापेक्षा तुम्ही कोणत्या कॅफेत बसून लिहिताय, कोणत्या मगमध्ये कॉफी पिताय, कोणती कॉफी पिताय आणि पुस्तक उघडून फोटो काढताना चेहऱ्यावर किती विचारमग्न भाव आहेत, हे अधिक महत्त्वाचं झालं आहे.
एकेकाळी लेखकाच्या टेबलावर डायरी, शाईची बाटली आणि अस्ताव्यस्त कागद असायचे. आता त्याच टेबलावर आयफोन, रिंग लाईट, ट्रायपॉड आणि कॉफीचा कप असतो. डायरी दिसली तर तीही फोटोसाठीच!
पूर्वी पुस्तक प्रसिद्ध व्हायचं; आता पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं फोटोशूट प्रसिद्ध होतं. लेखकापेक्षा त्याचा पोर्ट्रेट जास्त चर्चेत असतो. पुस्तक वाचलं नाही तरी चालतं; पण ‘बुक लॉन्च’ची रील पाहिलीच पाहिजे. आता समीक्षा कमी आणि सेल्फी जास्त वाचले जातात.
हल्ली प्रत्येक लेखकाचा दिवस ‘आज काहीतरी पोस्ट करायलाच हवं’ या एका वाक्याने सुरू होतो. प्रेरणा आली नाही तरी चालेल; पण पोस्ट आली पाहिजे. कारण आजच्या साहित्यविश्वात प्रेरणेपेक्षा उपस्थिती महत्त्वाची आहे. शब्दांपेक्षा स्टोरी जास्त जगते.
कॅफेत बसून कॉफीसमोर पुस्तक उघडायचं, दोन मिनिटं गंभीर चेहरा करायचा, मग कॅप्शन टाकायची ‘कॉफी विथ काफ्का’, ‘कॉफी विथ पु. ल.’, ‘कॉफी विथ अस्तित्ववाद’… आणि बाकीचं काम अल्गोरिदम करतो. वाचक पुस्तक विकत घेईल की नाही माहीत नाही; पण रीलला ‘हार्ट’ नक्की देतो.
लेखन आता साधना राहिलेली नसून एक परफॉर्मन्स झाला आहे. शब्दांपेक्षा पोझ महत्त्वाची झाली आहे. प्रतिभेपेक्षा प्रेझेंटेशन. आशयापेक्षा अँगल. आणि पुस्तकापेक्षा मुखपृष्ठ. म्हणूनच आजचा लेखक प्रथम छायाचित्रकार, नंतर मॉडेल, मग सोशल मीडिया मॅनेजर आणि वेळ उरला तर लेखक असतो.
काळ बदलला आहे. आता ‘मी लिहितो म्हणून आहे’ हे कोणी म्हणत नाही. आता घोषणा एकच ‘मी दिसतो, म्हणून आहे!’
: मनीष चंद्रशेखर वाघ