
कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या प्रसाद गावडे, अविनाश उषा वसंत, सत्यजित चव्हाण, विनीत विचारे, अक्षय सावंत. ऋषिकेश पाटील, फिजा मकानदार, ऐश्वर्या सावंत, सागर नानोसकर, राजीव नावथे, रोहित पेडणेकर, लक्ष्मण शेर्लेकर, भालचंद्र परद, जगदीश गावडे, ऋषिकेश पाळंदे, सोमेश काणेकर, कृष्णा गुणाजी सावंत आणि मल्हार इंदुलकर अशा १८ जणांनी चार दिवसांची ‘राखणदार पदयात्रा नुकतीच पूर्ण केली. या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत.
विकासाच्या नावाखाली निसर्गाची लूट आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा आता जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न ठरत आहे. रस्ते, बंदरे, महामार्ग, औद्योगिक प्रकल्प आणि पर्यटनाच्या वाढत्या विस्तारामुळे जंगल, नद्या, डोंगर आणि किनारपट्टी यांच्यावर अभूतपूर्व ताण निर्माण झाला आहे. विकास आवश्यक आहे; परंतु तो पर्यावरणाच्या किमतीवर होऊ लागला, तर त्याचे परिणाम पुढील अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. अशा वेळी पर्यावरणाचे खरे राखणदार कोण, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
सरकार, न्यायालये आणि पर्यावरणविषयक कायदे यांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. पण पर्यावरणाचे खरे संरक्षण केवळ कायद्यांनी होत नाही. ते होते जनजागृतीने, लोकसहभागाने आणि निसर्गाशी असलेल्या भावनिक नात्याने. म्हणूनच गेल्या काही वर्षांत देशभर अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्था विकासाच्या नावाखाली होणाऱ्या पर्यावरणीय हानीविरोधात उभ्या राहत आहेत.
कोकण आणि गोवा परिसरात नुकतीच झालेली पर्यावरण जनजागृती यात्रा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण करण्याचा संदेश देत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या या यात्रेने पर्यावरण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे अधोरेखित केले. गावोगावी संवाद, चर्चा, लोकसहभाग आणि स्थानिक प्रश्नांना राष्ट्रीय संदर्भ देण्याचा प्रयत्न या यात्रेतून झाला. पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ झाडे वाचविण्यापुरते मर्यादित नसून, ते शेती, पाणी, मासेमारी, जैवविविधता, स्थानिक संस्कृती आणि लोकांच्या उपजीविकेशी जोडलेले आहेत, ही जाणीव या यात्रेने अधिक स्पष्ट केली.

आज अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकच पर्यावरणाचे खरे प्रहरी बनले आहेत. डोंगर वाचविण्यासाठी, नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी, जंगलतोड रोखण्यासाठी किंवा अवैध खाणींना विरोध करण्यासाठी गावोगावी लोक संघटित होत आहेत. त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद नाही; पण पर्यावरणाशी असलेली नाळ त्यांना संघर्ष करण्याची प्रेरणा देते. अनेकदा त्यांना राजकीय दबाव, प्रशासनाचा विरोध किंवा न्यायालयीन लढाया यांचा सामना करावा लागतो. तरीही ते निसर्गाच्या बाजूने उभे राहतात, कारण पर्यावरण नष्ट झाले तर विकासाचाही पाया कोसळेल, याची त्यांना जाणीव आहे.
पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ कार्यकर्त्यांची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत. पाण्याचा संयमी वापर, प्लास्टिकचा कमी वापर, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, वृक्षसंवर्धन, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि स्थानिक पर्यावरणीय चळवळींना पाठिंबा देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शासनानेही विकास प्रकल्पांची पर्यावरणीय किंमत प्रामाणिकपणे तपासूनच निर्णय घेतले पाहिजेत. पर्यावरणीय मंजुरी ही केवळ औपचारिकता न राहता लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनली पाहिजे.
निसर्ग हा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा नाही; तो पुढील पिढ्यांकडून घेतलेले कर्ज आहे. हे कर्ज फेडायचे असेल, तर पर्यावरणाचे राखणदार होण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. कारण जंगल, नद्या, डोंगर आणि समुद्र वाचले, तरच माणूस आणि मानवतेचे भविष्य सुरक्षित राहील. पर्यावरणाचे रक्षण म्हणजे केवळ निसर्गाचे नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचे संरक्षण होय.
: मनीष चंद्रशेखर वाघ