
खेळाच्या मैदानावर खेळाडूची ओळख त्याच्या कामगिरीवरून ठरते, असे आपण मानतो. किती वेगाने धावला, किती उंच उडी मारली, किती गुण मिळवले किंवा किती पदके जिंकली, यावर त्याचे यश मोजले जाते. मात्र, खेळाडू हा केवळ आकडेवारी आणि पदकांचा संच नसतो. त्यालाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते, आवडीनिवडी असतात, स्वप्ने असतात आणि स्वतःला व्यक्त करण्याची एक स्वतंत्र शैली असते. केरळची लांब उडीपटू अँसी सोजन हिने आपल्या क्रीडाकौशल्यासोबतच आपल्या रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्वातून हाच वेगळा विचार समाजासमोर ठेवला आहे. तिची कहाणी केवळ राष्ट्रीय विक्रमाची नाही, तर स्वतःची ओळख जपण्याच्या आत्मविश्वासाची आहे.
अवघ्या दहा वर्षांची असताना एका उपजिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेत तिने एका धावपटूला मनगटात काचेच्या बांगड्या घालून धावताना पाहिले होते. धावताना त्या बांगड्यांचा होणारा मंद किणकिणाट तिच्या मनात घर करून राहिला. दुसऱ्याच दिवशी अँसी स्वतः बांगड्या घालून स्पर्धेला पोहोचली. खेळाडू म्हणून पुढे जाताना नियमांमुळे तिला आवडते पैंजण आणि दागिने बाजूला ठेवावे लागले; पण नटण्याची, रंगांची आणि स्वतःला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची तिची आवड कधीच संपली नाही. पुढे रंगीबेरंगी वेण्या, केसांमधील मणी, सजवलेले बूट, रंगवलेली नखे आणि गळ्यातील साखळ्या तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनल्या.
२७ जून रोजी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अँसीने पाचव्या प्रयत्नात ६.८८ मीटर लांब उडी मारली आणि अंजू बॉबी जॉर्ज यांचा तब्बल २२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक पटकावून तिने आपल्या गुणवत्तेची पुन्हा साक्ष दिली. आता सात मीटरची उडी मारण्याचे तिचे स्वप्न आहे. मात्र, या यशामागे केवळ शारीरिक क्षमता नाही, तर प्रचंड मेहनत, मानसिक तयारी आणि स्वतःवर असलेला विश्वास आहे.
अँसीच्या रंगीबेरंगी शैलीकडे अनेकांनी सुरुवातीला टीकेच्या नजरेने पाहिले. तिच्या केसांची रचना, दागिने आणि मेकअप यावरून समाजमाध्यमांवर तिची खिल्ली उडवण्यात आली. काहींनी तर तिच्या सजण्यामुळेच सुवर्णपदक हुकल्याची टीकाही केली. खेळाडूने आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे, नटण्यावर नाही, अशी मानसिकता या टीकेतून दिसून येते. प्रत्यक्षात मात्र अँसीने या टीकेला आपल्या कामगिरीतून उत्तर दिले. तिच्यासाठी सजणे हा दिखावा नसून स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग आहे. इतरांपेक्षा वेगळे दिसण्याची इच्छा असण्यात गैर काय? खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वावर समाजाने लादलेल्या चौकटींचे ओझे असण्याचे कारण नाही.
विशेष म्हणजे, तिची ही शैली केवळ सौंदर्याची आवड म्हणून मर्यादित नाही. तिचे प्रशिक्षक अनूप जोसेफ सांगतात की, अँसी आपल्या आवडीनुसार तयार होऊन मैदानात उतरते, तेव्हा तिचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो. ही तयारी तिच्या मानसिक स्थितीचेही निदर्शक आहे. स्पर्धेपूर्वीची चिंता कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी तिच्या या सवयी उपयोगी पडतात. म्हणजेच, बाह्य व्यक्तिमत्त्व आणि अंतर्गत आत्मविश्वास यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध असतो, हे तिच्या उदाहरणातून स्पष्ट होते.
अँसीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. तिचे वडील सोजन हे रिक्षाचालक. पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या सरावासाठी ते पहाटे चार वाजताच तिला आणि तिच्या भावंडांना मैदानावर घेऊन जात. त्यानंतर शाळा आणि संध्याकाळचा सराव असे तिचे बालपण गेले. खेळासाठी लागणारे बूट, आहार आणि प्रवास यांचा खर्च भागवणे कुटुंबासाठी आव्हानात्मक होते. गावातील मित्र, हितचिंतक आणि एका सैनिकानेही आर्थिक मदत केली. आई जॅन्सी सरावावरून परतणाऱ्या मुलीसाठी जेवण आणि केळ्याचा रस तयार ठेवत असे. मुलगी खेळाडू होणार म्हणजे अभ्यासाचे काय, मुलींनी खेळात एवढे गुंतण्याची गरज काय, असे प्रश्नही कुटुंबाला ऐकावे लागले. पण त्यांनी या प्रश्नांना महत्त्व न देता तिच्या स्वप्नांना प्राधान्य दिले.
या प्रवासात अँसीला आरोग्यविषयक आव्हानांचाही सामना करावा लागला. २०२४ मध्ये अनियमित मासिक पाळी आणि वजन नियंत्रणातील अडचणींमुळे तिला पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोमचे निदान झाले. प्रशिक्षण, आहार आणि औषधोपचार यांचा समतोल राखत तिने सराव सुरू ठेवला. शरीराची साथ नसतानाही मानसिक खंबीरपणा टिकवणे किती कठीण असते, याची जाणीव तिच्या अनुभवातून होते.
अँसीला चित्रे रंगवायला आवडतात. रंगवणे हा तिच्यासाठी ध्यानधारणेसारखा अनुभव आहे. मित्रमैत्रिणींसोबत भटकंती, ट्रेकिंग आणि स्वतःच्या आवडी जपणे यांतून ती स्वतःला आनंदी ठेवते. आज केरळमधील तरुण खेळाडू तिच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. हीच तिच्या यशाची खरी पावती आहे.
अँसी सोजनची कहाणी समाजाला एक महत्त्वाचा संदेश देते. यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा त्याग करण्याची गरज नाही. खेळाडूने पदके जिंकावीत, पण त्याचबरोबर त्याने स्वतःचे अस्तित्व, आवडीनिवडी आणि आनंदही जपावा. मैदानावर तिची उडी ६.८८ मीटरची असली, तरी विचारांच्या बाबतीत तिने समाजाच्या जुनाट मानसिकतेच्या कितीतरी पुढे झेप घेतली आहे. सात मीटरची उडी मारण्याचे तिचे स्वप्न एक दिवस पूर्ण होईलही; पण स्वतःच्या अटींवर जगण्याची आणि टीकेला न जुमानता स्वतःची ओळख निर्माण करण्याची जी उंची तिने गाठली आहे, ती अधिक मोलाची आहे. कारण विक्रम मोडले जातात, पदके बदलतात; पण स्वतःवर विश्वास ठेवून जगण्याची प्रेरणा पिढ्यान्पिढ्या टिकून राहते.
: मनीष चंद्रशेखर वाघ