हर शनिवार एक शेर, मल्लिनाथी सव्वाशेर उम्र-ए-दराज़ माँग के लाई थी चार दिन” दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में

उम्र-ए-दराज़ माँग के लाई थी चार दिन”
दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में

जगज्जेत्या सिकंदराची एक दंतकथा मोठी बोधप्रद आहे.सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला, “पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला, “मग काय, नंतर निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच आपण का निवांत जगत नाही?
खरंच ही कथा बरंच काही सांगुन जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ,मरमर करतोय. पुढे कधीतरी निवांत जगू ही एकच भाबडी आशा.
उगाचच इतरांना मागे टाकण्याची स्पर्धा आपण
लावून घेतो.पण कितीही वेगाने पळालो , कितीही परीश्रम केले तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच आहे , कायमच आपण स्पर्धेत पुढे नसणार आहोत. हे केव्हा कळणार!कोणालातरी आपल्या पेक्षा जास्त संधी मिळणारच, कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन श्रेष्ठ असणारच हे आपण लक्षात घ्यायला हवे. पण नेमके याचे विस्मरण होते आणि मग आपल्या जीवनाला वेगळे वळण लागते. विधात्याने किती काळाचे आयुष्य मानवाच्या पदरात टाकले आहे याचा मागमूस कोणालाही नसतो.आयुष्याचा पट अनिश्चित आहे हे माहीत असूनही इच्छांचा डोंगर सर करायला पाहतो. हव्यासापोटी आपण आत्मकेंद्री आणि स्वार्थी होतो. आपण आपल्या क्षमतेबाहेर परीश्रम घ्यायला लागतो. येथेच खरी चूक होते आणि मग मूळ प्रकृतीची मूळं विस्कटायला लागतात आणि आपला सुखाचा,समाधानाचा व आनंदाचा वृक्ष डगमगायला लागतो. स्पर्धेच्या नादात आपले मित्र, नातेवाईक ,समाज यापासून आपण दूर दूर जातो. मग आपल्या वाट्याला आलेले एकटेपण असह्य होते आणि वैफल्य आणते. म्हणूनच गरजेपुरते मिळवणं शिकता आलं पाहिजे.रोजच जर पंचपक्वान्नाचा आहार घेतला तर आरोग्याचे संतुलन बिघडते.तसंच मनाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी यांचा सहवास हवा. त्यांच्या सहवासातील आनंदाचे क्षण निसटुन देऊ नयेत.जेवणात आणि जगण्यात संतुलन हवे. जिथे जगण्याचीच शास्वती नाही तिथे ,’आयुष्य पडलंय हे नंतर करू ‘या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
अभी नही तो कभी नहीं
शिक्षण,नीती,तत्त्वे आणि समाज मानके आखणारा चिनी विचारवंत कन्फुशियस म्हणतो,
“A man who has committed a mistake and doesn’t correct it is committing another mistake.” –जो माणूस केलेली चूक सुधारत नाही, हीच तर त्याची पुढची चूक असते. तरूणपणी शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो म्हणजेच उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण उत्साह उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगता यायला हवं.

नकोत इच्छा,नको प्रतिक्षा
चार दिसांचा हा खेळ सारा
हसतखेळत मस्त जगुया
ठेवुनी मागे ब्रह्मांड पसारा

©️®️ मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?