लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अनेक नेत्यांचे दलबदल, खालच्या पातळीवरचे आरोप-प्रत्यारोप यांनी सगळा माहोल गरम झाला होता. यात सगळ्यात लक्षात राहिल्या त्या आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गोदी मिडीयातील विविध वृत्तपत्रे आणि चॅनेल्सना दिलेल्या मुलाखती. या मुलाखतींमधून देशवासीयांना नरेंद्रभाईंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक अनोख्या आणि नवनव्या आयामांची ओळख झाली. यापैकी काही खरोखरच आश्चर्यकारक म्हणाव्या लागतील. एका माणसात दहा-वीस माणसांची व्यक्तिमत्त्वे कशी राहू शकतात हे समजून घ्यायचं असेल, तर नरेंद्रभाईंनी या लोकसभा निवडणुकीत, भाषणांतून किंवा मुलाखतींतून जे काही सांगितलं, त्या सगळ्यांचं संकलन करून ते पुन्हा पुन्हा वाचायला हवं.
वाराणसीतील नमो घाटासमोर गंगेमय्याच्या कुशीत उभे असताना कूझवर चढताना दिलेली नरेंद्रभाईंची मुलाखत सर्वात जास्त प्रभावित झाली. या मुलाखतीदरम्यान त्यांचा गळा दाटून आला आणि त्यांचे डोळेही पाणावले. डोळे पाणावणं हे खूप चांगला माणूस असण्याचं लक्षण मानलं जातं. या मुलाखतीत नरेंद्रभाईंनी मांडलेल्या संकल्पनेचा देशवासीयांवर परिणाम झाला, ज्यात त्यांनी सांगितलं की, त्यांचा जन्म नक्कीच मानवरूपी आईच्या पोटी झाला. पण काही दैवी शक्तींनी त्यांना पृथ्वीवर पाठवलं आहे. नरेंद्रभाई म्हणाले की, मला पूर्ण खात्री आहे की ‘देवाने मला एक विशेष उद्देश पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी मला ऊर्जा, शक्ती आणि प्रेरणा देणारी सर्वोच्च शक्ती आहे.’
ही मुलाखत पाहताना भक्तांचं शिष आपोआपच नम्रतेने झुकलं असणार. विशेष जबाबदारी पार पाडण्यासाठी देवाने मानवी जगाकडे पाठवलेला हा देवदूत पाहून कोणाचंही शिष असंच झुकणं अगदी स्वाभाविक आहे. भारताचे पंतप्रधान हे सामान्य माणूस नसून एक देवदूत आहेत, हे उघड झाल्यावर भारतवासीयांसह ज्या ज्या देशाला मोदींनी भेट दिली त्या त्या देशातील नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून आला असणार. हे इतर कोणी बोलले असते तर कदाचित ‘अंधभक्त असेच म्हणणार’ म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष केले असते. पण जेव्हा स्वत नरेंद्रभाई हे गुपित उघड करत आहेत की त्यांच्या जैविक अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. पण त्यांना कोणत्यातरी विशिष्ट उद्देशनाने पृथ्वीवर धाडले आहे तेव्हा ‘प्रत्यक्षम् किम् प्रमाणम्’ म्हणजेच प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते असंच म्हणावं लागेल.
महात्मा गांधींनी आयुष्यात खूप तपश्चर्या केल्याचं ऐकलं-वाचलं आहे. जगभरातील अनेकांना असं वाटतं की ते देवाने इतिहास घडवण्यासाठी निर्माण केले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक क्रांतीसाठी गांधींना बहुधा देवाने पाठवले असावे हे लाखो लोकांच्या मनात रुजले आहे. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि अशफाकुल्ला खान, विनायक सावरकर, टिळक, शिवाजी महाराज यांसारख्या नायकांबद्दलही असंच म्हटलं जातं. या सगळ्या नायकांबद्दल अभ्यास केला आहे. या सर्वांचं कार्य, लेखन आणि शब्द अनेक वर्षांपासून बारकाईने तपासले गेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही असं म्हणलेलं किंवा लिहिलेलं आढळलं नाही की देवाने त्यांना थेट पृथ्वीवर काही विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे.
गांधी-सुभाष यांनी स्वतच्या कार्याला तपश्चर्येच्या श्रेणीत बसवल्याचा संदर्भ कुठेही आढळत नाही. गांधीजींची देहयष्टी साधारणच. पण ते बुद्धीने बलवान होते. त्यांना इतकी ऊर्जा कोणी दिली? इतकी शक्ती कोणी दिली? इतकी प्रेरणा कुठून मिळाली? छातीवर तीन गोळ्या घेऊन गांधीजी वैपुंठाला गेले. पण तोपर्यंत त्यांना माहित नव्हते की त्यांना कोणत्यातरी दैवी शक्तीने पृथ्वीवर पाठवले होते की ते सुद्धा त्या खेपेचा एक भाग होते. तुम्ही मानवी जगात का आलात?
या निवडणुका आल्या नसत्या तर अंधभक्त सोडून कोणाचेच डोळे उघडले नसते. आपण किती मुर्ख आहोत, हे कधीच समजू शकलं नसतं. भारतात नरेंद्रभाईंच्या आधी 13 पंतप्रधान होऊन गेले. ते आले आणि गेले. ते कुठून आले, कुठे गेले, कुणास ठाऊक? त्यांना कोणी पाठवले होते आणि ते एका उद्देशाने आले होते की ध्येयविरहित भटकत राहिले होते, कोणास ठाऊक? तेव्हा, आपल्या नशिबाला धन्यवाद द्या, की देवाचं कार्य पूर्ण करण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांना ‘देवदूत’ बनवून पृथ्वीतलावर पाठवलं आहे…
मनीष चंद्रशेखर वाघ
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments