बदलापूर : मुरबाड विधानसभेत भाजपमध्ये असलेली अंतर्गत नाराजी आणि बंडाळी याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता म्हात्रे त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेला ही जागा मिळाल्यास मोठा विजय मिळवण्याचा विश्वास बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. बदलापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात वामन म्हात्रे यांनी वरिष्ठांकडे ही मागणी केली. यावेळी सुभाष पवार यांच्यासह शिवसेनेचे भिवंडी लोकसभा जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील उपस्थित होते. या दोघांनी देखील वामन म्हात्रे यांच्या या मागणीला समर्थन दिलं असून याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी लावून धरणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात मुरबाड विधानसभेवरून शिवसेना भाजपामध्ये संघर्षाची वेळ येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभे नंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक पक्षाने तयारीला सुरूवात केली आहे. आघाडी आणि महायुतीत अजूनही कोणाला कोणत्या जागा मिळणार हे निश्चित नाही. पण इच्छुकांनी आपली तयारी मात्र सुरू केली आहे. मित्रपक्षांच्या जागांवरही मग त्यातून दावा केला जात आहे. त्या पैकीच एक जागा आहे ती मुरबाड विधानसभेची. ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे किसन कथोरे हे सध्या विद्यमान आमदार आहे. मात्र या जागेवर आता शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे या जागेवरून वाद होण्याची दाट शक्यता आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघावर किसन कथोरे यांची चांगली पकड आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्या मामा यांनी मताधिक्य मिळाले होते. किसन कथोरे आणि भाजप तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्यात वाद होता. त्या वादाचा फटका कपील पाटील यांना बसला. त्याची परफेत विधानसभा निवडणुकीत कपील पाटील करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अंतर्गत वादाचा फटका महायुतीच्या उमदेवाराला बसू शकतो असा शिवसेनाचा युक्तीवाद आहे. असं असलं तरी किसन कथोरे यांनी पक्षा शिवाय स्वत:ची अशी ताकद आहे. ते राष्ट्रवादीमध्ये असतानाही निवडून आले होते. आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते जिंकले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे कथोरे पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशिल असणार आहेत.
मुरबाड विधानसभेत किसन कथोरे यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे गोटीराम पवार आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे हे पारंपारिक प्रतिस्पर्धी उमेदवार राहिले आहेत. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गोटीराम पवार आणि वामन म्हात्रे या दोघांच्या मतांची बेरीज ही किसन कथोरे यांना मिळालेल्या मतांपेक्षा बरीच मोठी होती. गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार हे आता शिवसेनेत सक्रिय आहेत. याशिवाय मुरबाड विधानसभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मुरबाड विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाल्यास किसन कथोरे यांच्यापेक्षा किमान 35 ते 40 हजार अधिक मतं घेऊन शिवसेनेचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.