जन्मठेपेची शिक्षा ते डॉक्टरेट : सतीश शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास

मानवी आयुष्याच्या वाटेवर काही वळणे अशी येतात की ती संपूर्ण प्रवासालाच कलाटणी देतात. एखादी घटना आयुष्य उद्ध्वस्त करू शकते; पण त्याच घटनेतून नवे आयुष्य घडवण्याची जिद्दही जन्म घेऊ शकते. रानमळा येथील सतीश मुरलीधर शिंदे यांचा प्रवास हा अशाच जिद्दीचा आणि ज्ञाननिष्ठेचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. प्रत्यक्ष गुन्ह्यात संबंध नसतानाही न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप, तुरुंगातील कठोर जीवन आणि त्यातून उभा राहिलेला ‘विद्या वाचस्पती’पर्यंतचा प्रवास हा केवळ वैयक्तिक संघर्ष नाही, तर शिक्षणाच्या परिवर्तनशक्तीचा जिवंत पुरावा आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सतीश शिंदे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि १९९४ साली उपजीविकेच्या शोधात मुंबईकडे प्रयाण केले. ग्रामीण पार्श्वभूमी, मर्यादित साधनसंपत्ती आणि मोठी स्वप्ने या त्रिसूत्रीवर त्यांचे आयुष्य उभे होते. पुढे महाड येथे बांधकाम व्यवसायात ‘साइट सुपरवायझर’ म्हणून काम करत असताना घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत त्यांच्यावर कटातील सहभागाचा आरोप ठेवण्यात आला. न्यायालयाने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाच्या आयुष्यावर अचानक अंधार दाटून आला.

सुमारे चार वर्षे दोन महिने दहा दिवस त्यांनी कल्याण आणि अलिबाग कारागृहात अंडरट्रायल म्हणून काढले. त्या काळात अनिश्चितता, नैराश्य आणि समाजाच्या नजरेतील संशय यांचा सामना करावा लागला. १७ जून २००५ रोजी त्यांची रवानगी कोल्हापूर कारागृहात झाली. आयुष्य जणू बंदिस्त झाले, भविष्य धूसर झाले; परंतु या अंधारातही त्यांनी आशेचा किरण शोधला. परिस्थितीला शरण जाण्याऐवजी तिला आव्हान देण्याचा निर्धार त्यांनी केला.

२१ जून २००५ रोजी कारागृहातील अभ्यासकेंद्रातून त्यांनी शिक्षणाची नवी सुरुवात केली. तुरुंगातील कोठडी त्यांच्यासाठी अभ्यासिकेत रूपांतरित झाली. पहिल्याच वर्षी ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ येत त्यांनी स्वतःच्या जिद्दीची साक्ष दिली. पुढे त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केली. अभ्यास हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा श्वास बनला. कारागृहातील मर्यादा, अपुरी साधने आणि मानसिक ताण यांवर मात करत त्यांनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही.

याच काळात त्यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबई येथे बहिःस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. आठ वर्षांच्या कालावधीत आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, मानव संसाधन, उद्योजकता, विपणन, कृषी व्यवसाय, बँकिंग आणि औद्योगिक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील आठ पदविका त्यांनी पूर्ण केल्या. ज्ञानाची भूक इतकी प्रखर होती की त्यांनी इंग्रजी संभाषण आणि संगणक कौशल्येही स्वयंअभ्यासातून आत्मसात केली. तुरुंगाच्या कठोर भिंतीआडही विचारांची पंखे छाटता येत नाहीत, हे त्यांनी सिद्ध केले.

साडेसतरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर १४ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांची मुक्तता झाली. चांगल्या वर्तनाबद्दल सहा महिने अठरा दिवसांची शिक्षा माफ झाली. बाहेरच्या जगात पाऊल ठेवताना त्यांच्याकडे केवळ स्वातंत्र्य नव्हते, तर अनुभवांचा आणि ज्ञानाचा मोठा साठा होता. २०१९ पासून ते राष्ट्रीयीकृत बँकेत आर्थिक व विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. समाजात सन्मानाने उभे राहताना त्यांनी आपल्या भूतकाळाला ओझे न बनवता प्रेरणेत रूपांतरित केले.

मुक्ततेनंतर त्यांनी समाजकारणाची वाटही स्वीकारली. पुण्यातील नवजीवन मंडळ आणि प्रिसन मिनिस्ट्री ऑफ इंडिया या संस्थांमार्फत ते विनामोबदला समुपदेशनाचे कार्य करीत आहेत. तुरुंगातून सुटणाऱ्या कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. कारावासानंतरचे जीवन केवळ पुनर्वसनाचा प्रश्न नसून आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया आहे, हे ते अनुभवातून सांगतात. त्यांच्या शब्दांना अनुभवाची ताकद आहे आणि त्यांच्या कार्याला संवेदनशीलतेची किनार आहे.

अलीकडेच दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ यांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत ‘विद्या वाचस्पती’ ही मानद डॉक्टरेट बहाल केली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही; तो शिक्षणाच्या शक्तीवर असलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. जन्मठेपेच्या शिक्षेतून मानद डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास म्हणजे मानवी जिद्दीचा सर्वोच्च आविष्कार आहे.

सतीश शिंदे यांची कथा सांगते की परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, आशेचा अंकुर नेहमीच उगवू शकतो. तुरुंगाच्या कठोर भिंतीही विचारांना कैद करू शकत नाहीत. आयुष्याचा खरा अर्थ शिक्षा किंवा मुक्तता यात नसून, त्या प्रवासात आपण स्वतःला कसे घडवतो यात आहे. आज रानमळा गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ते प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहेत. कारण शेवटी भविष्य घडवते ती परिस्थिती नव्हे, तर अढळ निर्धार आणि ज्ञानाची अखंड साधना.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment