विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

ठाणेकर कधी जागे होणार?

ठाणे शहरातील विविध ठिकाणी अचानक झळकलेल्या ‘वेक अप ठाणेकर’ या संदेशाने शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर कोणत्याही संस्था, संघटना किंवा व्यक्तीचे नाव नसल्याने त्यामागील उद्देशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या एका वाक्याने ठाणेकरांसमोर ‘खरोखरच ठाणेकर कधी जागे होणार?’ हे एक महत्त्वाचा प्रश्न उभा केला आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. उंच इमारती, नवीन रस्ते, मोठे विकास प्रकल्प आणि वाढते शहरीकरण यामुळे शहराचे स्वरूप बदलत आहे. परंतु या विकासाची किंमत पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानाला मोजावी लागत असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील वृक्षतोड, हिरव्या क्षेत्रांचे कमी होत जाणारे प्रमाण, वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाढते प्रदूषण आणि पायाभूत सुविधांवरील ताण हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.

विशेषतः ठाण्यातील रिंग रेल्वे, विविध रस्ते प्रकल्प तसेच इतर विकासकामांमुळे पर्यावरणीय परिणामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. समाजमाध्यमांवर नागरिक आपली मते मांडत असले तरी प्रत्यक्ष लोकसहभाग आणि संघटित जनमताचा अभाव जाणवतो. अनेकदा प्रश्न निर्माण झाल्यानंतर काही दिवस चर्चा होते, आंदोलनाची हाक दिली जाते आणि नंतर विषय विस्मरणात जातो. यामुळे प्रशासनावर अपेक्षित दबाव निर्माण होत नाही.

‘वेक अप ठाणेकर’ हा संदेश केवळ एखाद्या गूढ मोहिमेचा भाग नसून नागरिकांना त्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा इशारा आहे. शहराचा विकास आवश्यक आहेच; परंतु तो पर्यावरणपूरक, शाश्वत आणि लोककेंद्रित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. विकासाच्या नावाखाली शहराची ओळख, पर्यावरण आणि नागरिकांचे हित दुर्लक्षित होता कामा नये.

आज गरज केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रियांची नसून माहितीपूर्ण चर्चांची, लोकसहभागाची आणि जबाबदार नागरिकत्वाची आहे. शहराच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना नागरिकांनी सजग राहून प्रश्न विचारणे, पर्याय मांडणे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.

‘वेक अप ठाणेकर’ या संदेशामागे कोण आहे, यापेक्षा त्या संदेशामागील आशय समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण शहराच्या समस्या वाढत असताना जागे होण्याची वेळ उद्यावर ढकलणे आता परवडणारे नाही. प्रश्न एवढाच आहे, `ठाणेकर खरोखर कधी जागे होणार?’

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें