विस्मृतीतले झुरके…

तिच्यासारखे माहेरपणाला येणारे अनेक चेहरे बघायचे तर त्यासाठी मे महिन्याची सुट्टी आणि आमचा नौपाड्याचा गोखले रोड हे समीकरण ठरलेलंच. शाळा सुरू व्हायच्या आधीचा आजचा शेवटचा रविवार. बघूया कोण कोण दिसतय भेटतय म्हणून गोखले रोडला चक्कर मारली. आणि ‘ती’ अचानकच दिसली. ओळख पटवायचे बरेच प्रयत्न झाले… अखेर ओळख पटली आणि ती चक्क समोर येऊन उभी टाकली… तशी ती दरवर्षीच दिसायची; मे महिन्याच्या सुट्टीत माहेरपणाला येते तेव्हा. मुला-भाच्यांच्या गोतावळ्यात… गोखले रोडच्या वर्दळीत… समाधान फक्त ‘नजरभेटी’वरच…!

कॉलेज संपून आता जवळपास 35 वर्षे झालीत… त्यानंतर ती प्रथमच येऊन ‘भेटली, बोलली’… अचानक तिचं येऊन भेटणं अपेक्षित नव्हतंच; पण सुखावणारं मात्र नक्कीच होतं…
मग सुरु झाल्या त्यावेळच्या वेगवेगळ्या ग्रुप्सच्या चौकशा. कोण कोण भेटतं… कोण-कुठे-काय करतंय; वगैरे… वगैरे… मनातील अनेक ‘बंदिस्त’ विषय बोलते झाले…
अचानक तिचा प्रश्न…
”अजूनही तोच ‘ब्रँड’ आहे का रे तुझा?
विल्स आणि ओल्ड मंक??”
तिच्या त्या प्रश्नाने मी हबकलोच…
हिला कसं बरं माहित माझे ब्रँड? आणि माझ्या आयुष्यातून कधीच ‘काळाच्या पडद्याआड’ गेलेले ते ब्रँड अजूनही हिच्या मनात प्रश्न बनून उभे?
“तुला कसं गं माहित माझे ब्रँड?” – माझा प्रश्न
“सेकंड ईयरच्या गोवा ट्रीपमधला तुझ्या ग्रुपचा ‘उच्छाद’ अजूनही आठवतोय मला”, ती उत्तरली. “मिरामारच्या बीचवर रात्री सरांच्या नकळत तुम्ही सोडलेली विल्सची वलयं आणि ओल्ड मंकचे रिचवलेले घोट… सगळे प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर उभे राहतात कधीकधी… अगदी जसेच्या तसे!”
“खूप काळजी वाटायची तेव्हापासून तुझी ”

तिच्या या वाक्याने मी अवाक्.. अंग शहारलं…

“अगं म, तेव्हाच का नाही सांगितलंस? कॉलेज संपलं… सगळे मित्र पांगले… अन् ते ‘ब्रँडस्’ही तिथेच थांबले… त्यानंतर परत नाही.”
माझ्या या उत्तराने तीचं समाधान झाल्याचं जाणवलं…
“विश्वास ठेवते” म्हणत… व्हॉट्स अप नंबरची देवाणघेवाण करत तिने निरोप घेतला आणि मुला-भाच्यांसह पुन्हा गोखले रोडच्या वर्दळीत दिसेनाशी झाली…

आता मला प्रतिक्षा पुढच्या उन्हाळी सुट्टीची…

निरोपाच्या वेळी तिच्या डोळ्यांत जागे झालेले ‘मेड फॉर इच अदर’चे भाव पाहून ‘फिल्टर अँड टोबॅको परफेक्टली मॅच’ म्हणत ओठांवर रेंगाळलेले विल्सचे विस्मृतीत गेलेले झुरके उगाचच आठवू लागले…

: मनीष

Leave a Comment

× How can I help you?