ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि घंटाळी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकुलात विद्यार्थी व शिक्षक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
आनंद विश्व गुरुकुलच्या प्रांगणात सकाळी घंटाळी मित्र मंडळ यांच्या योगा इन्स्ट्रक्टर सौ. मेधा गोसावी आणि योग शिक्षिका कल्याणी काळे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांनी योगसाधना केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. नंतर आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. दीपिका तलाठी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी योग साधना करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात आलेल्या योगदिनाबद्दल मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना रासकर यांनी घंटाळी मित्र मंडळाचे लाभलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व सर्व शिक्षकांना योग साधनेसाठी प्रोत्साहित केले.
सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंदाने आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता पर्यवेक्षक प्राध्यापक सागर जाधव यांनी आभारप्रदर्शनाने केली.