डावखरेंच्या हॅटट्रीकमध्ये पदवीधरांच्या ‘नाराजी’चा अडसर पदवीधरांच्या समस्यांकडे 12 वर्षं दुर्लक्ष

ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. ठाण्यातील मित्रपरिवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कै. वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरे यांनी गेली बारा वर्षे पदवीधर मतदारसंघात राजकीय वडिलांचा वारसा जोपासला आहे. निरंजन डावखरे यांनी अनेक पदवीधरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. असे असताना देखील निरंजन डावखरेंच्या विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागातील युवक-युवती डावखरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे दिसून येते. मुरबाडमधील समस्यांबाबत मात्र कोणताही राजकीय नेता हा पुढे येत नसल्यामुळे मुरबाडसह ग्रामीण भागातील युवक- युवतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निरंजन डावखरे हॅटट्रिकच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त ठाणे जिह्यातील ग्रामीण भागाचा उमेदवार राजकीय पक्षीय मंडळीना सापडलेला नाही, हे येथील ग्रामीण भागातील पदवीधरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. निरंजन डावखरे निवडून येणार अशी ओरड आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी करत आहेत. परंतु दहा वर्षांत निरंजन डावखरेने ग्रामीण पदवीधर युवकांसाठी काय योगदान दिले. याचा विचार करावा लागेल. पदवीधर उमेदवार कोणत्याच पक्षाचा नसावा, फक्त समस्याग्रस्त बेरोजगार उच्चशिक्षितांच्या समस्या सोडवणारा निपक्षपाती असावा, अशी मतदार युवकांची पसंती आहे.
डावखरे यांनी कधीच पदवीधरांसाठी संघर्ष केला नाही. हजारो पदवीधर बेरोजगारांना नोकऱया नाहीत, व्यवसाय नाही, शासनाच्या योजनेचा लाभ नाही, शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींच्या ऍडमिशन, वाढती फी, शिष्यवृत्ती, बँक कर्ज, नवीन उच्चशिक्षित कॉलेज, वसतिगृह गेल्या दहा वर्षांत राजकीय चिखलात गुंतलेला अशा अनेक पदवीधरांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली वडिलांचा वारसा लादण्याचा प्रयत्न निरंजन डावखरे करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मदत करणाऱया नेते, कार्यकर्ते यांच्या शाळा, कॉलेज यांना रस्ते, इमारती, साहित्यसाठी निधी दिल्याचा कांगावा मुरबाड येथील पदवीधर कार्यकर्ता बैठकीत देण्यात आला. युवकांना दिशाहीन करून राजकारण कोणत्या स्तराला जात आहे, याबद्दल पदवीधरांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी आहे. पदवीधरांना स्वतंत्र विचारसरणीचा आमदार अद्यापही मिळालेला नाही. गेल्या पाच वर्षांत राज्यात यूपीएससी, एमपीएससी परीक्षांचा राडा, रस्त्यावरील आंदोलने युवक विसरलेले नाहीत.
रायगड, कोकण विभागातूनही डावखरे यांच्याबद्दल असाच नाराजीचा सूर ऐकायला मिळतो. कोकण पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व निरंजन डावखरे करत आहेत. मात्र ज्या पदवीधरांच्या मतांवर निवडून आले त्यांच्यासाठी आजपर्यंत काय केले? असा सवाल विचारला जात आहे. स्वतच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी धडपड करणारे निरंजन डावखरे यांनी पदवीधरांची भ्रम निराशाच केली. आज तिसऱया वेळेलादेखील ते निवडणूक रिंगणात उतरून पदवीधरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी पदवीधरांसाठी काहीच केले नाही त्यांना आता मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. पेणसह रायगडच्या पदवीधरांवर जेव्हा-जेव्हा वेगवेगळया संकटांना सामोरे जावे लागले तेव्हा एकदाही निरंजन डावखरे पदवीधरांच्या मदतीला धावून 2 आले नाहीत अथवा स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नासाठी विधीमंडळात एक ब्र शब्द काढला नाही अशांना आपण निवडून द्यायचे का? असा सवाल रायगड-कोकणातील युवक-युवती विचारीत आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघात नव्याने झालेल्या मतदारांच्या नोंदणीत मागील पाच वर्षांतील मतदार नोंदणीच्या तुलनेत वाढ झाल्याने पदवीधर मतदारांची वाढ झाल्याने ही निवडणूक चुरशीची घेण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील पदवीधरांचे प्रश्न सुटत नसल्याने तसेच पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने व कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील बेरोजगारांसह पदवीधरांचे किती प्रश्न मार्गी लागले, असा सवाल कोकणातील पदवीधर संघटनांकडून उपस्थित केला आहे. फक्त निवडणुकांपुरता पदवीधराचा वापर केला जात असल्याची भावना पदवीधरांनी व्यक्त केली.
कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. निरंजन डावखरे यांचा राष्ट्रवादीत असतानाचा एक अपवाद सोडला तर या मतदारसंघावर भाजपचे कायमच वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे या निवडणूकीत काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणूकीत कोकणाने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. राज्यातील इतर भागात महा विकास आघाडीचा प्रभाव दिसून आला असला तरी कोकणाने प्रवाहाविरोधात मतदान केले होते. त्यामुळे हा कल या सुशिक्षित मतदार कायम ठेवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणातील सुशिक्षित मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतोय हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

× How can I help you?