ठाण्याचा होतोय ‘उडता पंजाब’

ठाण्याचा होतोय ‘उडता पंजाब’

दीड वर्षांत ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; ४ हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल

ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दीड वर्षांत सुमारे ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणांत सेवन आणि विक्री करणाऱ्या सुमारे चार हजार जणांविरोधात गुन्हे दाखल आणि अटकेची कारवाई झाली आहे. अमली पदार्थामध्ये सर्वाधिक मागणी गांजाची आहे. गांजा हा इतर अमली पदार्थांच्या तुलनेत सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. त्यामुळे त्याची मागणी अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुण्यातील काही तरुणांमध्ये अमली पदार्थांचा विळखा बसला असून त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागले आहेत. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये असा प्रकार घडत असताना मुंबई लगतच्या ठाणे शहरातही तरुण नशेच्या आहारी गेल्याचे समोर येत आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्र येतो. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४ कोटी ४५ लाख ९७ हजार ३१९ रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार २५२ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी १ हजार ७७ जणांवर अमली पदार्थ्याचे सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या वर्षी १ जानेवारी ते २३ जून या कालावधीत ५५ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर २ हजार ७२४ जणांविरोधात कारवाई झाली असून त्यापैकी २ हजार ६१२ जणांना सेवन प्रकरणी ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींना विक्री आणि निर्मिती करताना अटक केली आहे. विक्री आणि सेवन करणाऱ्या आरोपींमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.

पोलिसांच्या कारवाईमध्ये सर्वाधिक गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी यावर्षी २२० किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मागील वर्षभरात ७८२ किलो ८११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजा हा अमली पदार्थ इतर अमली पदार्थ्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. तसेच हा अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असतो. सहज विकत घेता येत असल्याने हा अमली पदार्थ नशेबाज तरुण सर्वाधिक विकत घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Leave a Comment

× How can I help you?