जिस को गले लगा लिया वो दूर हो गया

हर शनिवार एक शेर,
मल्लिनाथी सव्वाशेर

अच्छा तुम्हारे शहर का दस्तूर हो गया
जिस को गले लगा लिया वो दूर हो गया

जवळ करणे म्हणजे काय ? तर कोणाला तरी जीव लावणे आणि जीव लावणे म्हणजे काय? तर माया करणे वा माया लावणे.ज्याच्यावर जीव लावला त्याच्यासाठी जिवाचे रान करणे, म्हणजे त्याला सुख, समाधान व आनंद देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जे काही करायचे ते मनापासून,प्रेमाने करायचे म्हणजेच जीवेभावे करायचे. जो आपल्या जिवाभावाचा असतो तोच आपला लाडका असतो. आपल्या कुटुंबातील सर्वच माणसे प्रेमाची व जिवाभावाची असायलाच हवीत.पण ती आपल्या जिवाभावाची असतातच असेही नाही. मानवी जीवनात आयुष्याच्या वाटेवर अनेक माणसे भेटतात. मग कोणी कार्यालयातील असेल ,कोण मित्र-मैत्रीण असेल, वा शेजारी असेल. अशांपैकी कोणावर तरी प्रेम जडते,माया जडते . कालांतराने ती माणसे वा व्यक्ती आपल्या जिवाभावाची होऊन जातात. त्यांच्यासाठी आपण आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन जिव्हाळा लावण्याचा प्रयत्न करतो.कधी कधी हे सारे एकतर्फी होत असते. याची जाण आल्यानंतर देखील आपण प्रेमाची सलगी करतच राहतो.
जीवशास्त्र व विज्ञान म्हणते जीव लावणे,माया करणे या बाबी मेंदू व वर्तन आणि मज्जासंस्थेच्या संज्ञानात्मक कार्यांवर त्यांचा प्रभाव याच्याशी त्या संबंधित आहेत.पण या विषयाचे मानसिक व भावनिक दृष्टीने विश्लेषण म्हणजे प्रेम वा जिव्हाळा जीवापाड लावणे हे होय. मानव ते आवाक्याबाहेर जाऊन करतो. असे असले तरी कधीतरी अशी वेळ येते की ज्या व्यक्तीवर आपण जीवेभावे माया केली ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. दूर जाते म्हणजे मायेच्या , जिव्हाळ्याच्या नात्यापासून ती दूर जाते .आपल्याशी असलेले संबंध ती तोडते. आपल्याला दुःखाचा चटका देऊन जाते.सारा जीव पोळून निघतो. असे या शहरात ,या जगात घडत राहते. कवीवर्य कुसुमाग्रज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी नमूद करत त्यांच्या कवितेत एका ठिकाणी नमूद केले आहे की,
“तुका म्हणे सारे मायेचे माइंद
तयापाशी गोविंद नाही नाही”
तंतोतंत हाच अनुभव बहुतांश जनांना जीवनात येत असतो. अतिपरिचयात अवज्ञा होते. म्हणून भावनेचा ,मायेचा , जिव्हाळ्याचा अतिरेक होऊ देऊ नये. “अती तेथे माती” या वचनानुसार पदरी निराशा येते.मनाला मोठी ठेच लागते. यातून काही सावरतात तर काही आयुष्यातून उठतात.एक सुंदर चायनीज म्हण आहे,
“You cannot prevent the birds of sorrow from flying over your head, but you can prevent them from building nests in your hair.”
दु:खाचे पक्षी डोक्यावरून उडताना एकवेळ तुम्ही अडवू शकणार नाही पण तुमच्या केसांत बांधली जाणारी त्यांची घरटी तुम्ही निश्चित टाळू शकता.म्हणून कायम लक्षात ठेवावे ,”ज्याला जास्त जवळ करू तोच तुम्हाला दूर सारून निघून जाणारा असतो” ही या दुनियेची रीत आहे म्हणा वा प्रथा आहे म्हणा…

रीत न्यारी या जगाची
जीव लावावा जयाला
तोच तोडी प्रेम बंध
अन् ने माया लयाला

©️®️ मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?