कवयित्री अंकिता मांगले – टोणगे
लिखित “असंच काहीसं सुचलेलं” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
या प्रकाशन सोहोळ्यासाठी सारिका विलास नरोटे, अरुणा अरुण मांगले, दिपाली महेंद्रे , विजया सीताराम नरोटे, हर्षवर्धन अनिलकुमार टोणगे, अंकिता हर्षवर्धन मांगले- टोणगे , सीताराम महादेव नरोटे, समाजमाध्यम तज्ञ मनिष पंडित, हर्षवर्धन टोणगे,
अतुल वसंत शिलवंत, रुचिता रविंद्र मांगले उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका प्रा.प्रज्ञा पंडित व शारदा प्रकाशन चे प्रकाशक प्रा.डॉ.संतोष राणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.डॉ.संतोष राणे म्हणाले की, ” कविता सुचण्याची प्रक्रिया दीर्घकाळाची असते. आशयसंपन्न कवितेसाठी चिंतन आणि मनन महत्वाचे असून कवयित्री अंकिता यांना विविधांगी अनुभवातून कविता स्फूरलेली आहे. नात्याची वीण घट्ट करणारी त्यांची कविता वाचकांच्या मनात कायम रुंजी घालेल.” कवितेत कवीचे आत्मवृत्त असल्याचे सांगून प्रा.राणे पुढे म्हणाले ,” आजची
युवा पिढी आवर्जून कविता वाचते आहे. कवितेबद्दल समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. ही अतिशय आशादायक गोष्ट असून
कवितेच्या पुस्तकांना जास्त मागणी आहे.”
” स्त्री मनाचा कानोसा घेण्याचे महत्वपूर्ण काम कवयित्री अंकिता यांनी केल्याचे सांगून लेखिका प्रज्ञा पंडित म्हणाल्या की,” आज सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. शिक्षण , नोकरी , कुटुंब अश्या सर्वच पातळ्यांवर स्त्री यशाची नवी तोरणं बांधत आहे. हे कवितेतून टिपण्यात कवयित्री यशस्वी झालेली आहे.स्त्री मनाचा हुंकार टिपून त्याला शब्दातून नवे आयाम देण्याचे काम
कवयित्री अंकिता यांनी केले आहे.”
कवयित्री अंकिता मांगले – टोणगे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,” माझ्या कवितेची नाळ आईबरोबर जोडली गेलेली आहे. आईवरील माझ्या पहिल्या कवितेचे सर्वांनीच कौतुक केले. त्यातून मला प्रेरणा मिळाली. आजूबाजूला जे घडत आहे त्यामधून कविता स्फुरत असते. रसिक कवितेचे कौतुक करतात म्हणूनच कविता लिहिल्याचे समाधान मिळते.”
यावेळी अनेक मान्यवरांनी कवयित्री अंकिता यांच्या कवितेबद्दल अनेक मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सर्वेश मांगले आणि श्वेता मांगले यांनी केले
