ठाणे : राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली-२०२४ मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे. सर्व मूर्तीकार, मूर्ती विक्रेते यांना त्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. हे प्रयत्न असेच सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा, असे महापालिका आयुक्त सौरभ राव राव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.
महापालिकेतील विभागप्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र येथे झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्यासंदर्भात उपक्रमाचे आयोजन करावे. त्यात नाटिका, स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरुपात विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल. तसेच, भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मियता निर्माण होईल. त्यादृष्टीने पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळांची संघटना, मूर्तीकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात. म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल, असेही आयुक्त राव म्हणाले.
कांदळवनावरील भरावाबाबत आक्रमक व्हा
कोलशेत–बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे. वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.
स्वाईन फ्लूबद्दल सतर्क रहावे
ठाणे महापालिका क्षेत्रात, जूनपासून स्वाईन फ्लूच्या (एचवनएनवन) रुग्णांची संख्या ७० इतकी आहे. गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते, परंतु स्वाईन फ्लूच्या (एचथ्रीएनटू) रुग्णांची संख्या ८७ होती. ही संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णासाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
