दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी खासदार नरेश म्हस्के यांचा पुढाकार

ठाणे : राज्यशासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दारिद्रय निर्मुलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी दरवर्षी महापालिकेतर्फे एकूण बजेटच्या पाच टक्के इतकी रक्कम राखीव ठेवली जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्टॉलचे वाटप, दिव्यांग स्कूटर, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दिव्यांगाच्या व्यायामशाळा, परिवहन सेवेमध्ये 100 टक्के सवलत व बेरोजगार दिव्यांगासाठी रु. 24,000/- इतके अनुदान वितरित करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षापासून सदरचे अनुदान बंद झाले असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते.
खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेता असताना त्यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण समितीच्या विविध योजना तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये नवीन योजनांची सुरूवात करुन त्याची अंमलबजावणी केली होती. या महत्वाकांक्षी योजनांची नोंद राज्यातील इतर महापालिकांनी घेवून त्यांनी देखील अशा योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
या दोन्ही योजनांचा फायदा ठाणे शहरातील अनेक गरीब व गरजू नागरिकांना होत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत घरे वाटप करणे, स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करुन देणे अशा अनेकविध योजना महापालिकेने राबविल्या असून याची नोंद संपूर्ण राज्याने घेतली होती. परंतु अचानकपणे अनुदानाची रक्कम बंद केल्यामुळे दिव्यांग व्यक्तींसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांगाच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाही राबवाव्यात असेही आयुक्तांना सांगितले. चर्चेअंती आयुक्तांनी दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला व बालकल्याण समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही निर्णय घेवून त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल असे नमूद केले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी,  प्रशांत रोडे, धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीष मेहरोल, सचिव शरद पवार व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेवून आयुक्त यांच्याशी चर्चा करुन या बैठकीत दिव्यांगाच्या योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

× How can I help you?