वारी समतेची, मानवतेच्या कल्याणाची…

महाराष्ट्राला संतवारीची प्राचीन परंपरा लाभली आहे. समाजातील भेदभाव, जातपात नष्ट करत लाखो जण या वारीत सहभागी होत असतात. अगदी बाराव्या शतकापासून महाराष्ट्रातील संतांनी समाजातील अमंगल जातीयतेवर प्रहार करीत सामाजिक समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मण असो की वैश्य, क्षुद्र असो क्षत्रीय, अनेक जातीपातीत जन्मलेल्या आपल्या संतांनी एकदिलाने विठूरायाची भक्ती केली. अठरा पगड जातीच्या भक्तगणाला विठूरायाच्या चरणाशी नतमस्तक केले आहे. अशा या सामाजिक समरसतेच्या वारीत महाराष्ट्रातून लाखो भक्तजन दरवर्षी सहभागी होत असतात.

आध्यात्मभाव हा भारतीयांच्या दैनंदिन जगण्यात सहजपणे विरघळून गेलेला आहे. तोच वारीच्या रूपात प्रचंड विस्तीर्ण होऊन भव्य दिव्यपणे प्रकट होतो. मनात वसलेलं, हृदयात साठलेलं, भावनेत ठसलेलं, बुद्धीत भरलेलं हेच आध्यात्म पंढरीच्या वाटेवर मैलोन् मैल चालायला अथक बळ देतं! प्रत्यक्ष वारी जेव्हा पहिले रिंगण, दुसरे रिंगण, फुगड्या, फेर, गाणी, गवळणी असे वाटेवरच्या प्रवासातले सारे मनमुक्त आनंद लुटून विसावा घेत घेत पंढरीत पोहोचते, तेव्हा जिकडे बघावे तिकडे, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी वारकऱयांची अवस्था झालेली दिसते. ज्या ओढीने ही लांबवर पायपीट केली, त्या विठूरायाच्या मंदिराचे कळसदर्शन होताच सारा शीणभाग हलका होतो. लहानथोर एकमेकांच्या पायावर डोकं ठेवत ‘माऊली, माऊली’ म्हणून एकमेकांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देतात. दोन आत्मे एक होऊन ‘विठ्ठलरूप’ झाल्याचा तो प्रगाढ अनुभव म्हणजेच, सगळ्या जगाला अचंबित करणारी ही महान भागवत परंपरा. तिचा सामूहिक उद्गार आहे पंढरीची वारी! मानवतेचे चिरंतन मूल्य जोपासणारा एक अनुपम्य सुखसोहळा!!

संतमंडळी एकावेळी जमवण्याची ही मूळ कल्पना होती; तीच मुळी सारे समाजिक स्तर एकत्र व्हावेत, भेदाभेद मिटून जावेत, जातीपातीच्या मान्यता विसरून जाव्यात, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भिंतींना भेदून समरसतेची भावना निर्माण व्हावी, यासाठीच संतमंडळींनी हा सामूहिक सोहळा प्रस्थापित केला होता. त्यानुसार आजही इथे सामील होणाऱया विठ्ठलभक्तांमध्ये विशुद्ध एकात्मतेचा निखळ भाव असतो. प्रेमाचे धागे नकळतपणे गुंफले जातात. सारा समाज एकत्र आणण्याची ही एक अजब जादू कमालीची यशस्वी झाली ती वारीच्या माध्यमातून…
सर्वसामान्य समाजाला मार्ग दाखवून शुद्ध आचरण आणि व्यवहारी वर्तन यांची शिकवण देण्याचे संतांचे महत्कार्य वारीच्या माध्यमातून खऱया अर्थाने आकाराला आले. जागोजागी होणारे पालख्यांचे भव्य स्वागत, गावोगावी होणारे चोख व्यवस्थापन या साऱयांच्या मागे आहे, सामाजिक एकतेचा भावना; जो या कृतीतून समोर स्पष्ट दिसतो. मुद्दाम काही शिकवण्याचा अविर्भाव संतांना आणावा लागला नाही. ती शिकवण आपोआप रूजली.
भक्तिभावाबरोबरच एकतेचे आणि समतेचे रेशमी वस्त्र आपल्या संतांनी हळूवारपणे विणले. एखाद्या कुशल विणकरासारखे श्रद्धेचे धागे इथल्या समाजाच्या हृदयात त्यांनी अशा कौशल्याने गुंफले की, गेल्या सात-आठशे वर्षांपासून आजतागायत ती भगवी पताका डौलाने फडकतेच आहे. दरवर्षी मोठ्या प्रेमाने ती खांद्यावर घेऊन निघालेले वारकरी अखेरी पंढरीत पांडुरंग चरणीची धूळ मस्तकी धारण करून धन्य होतात. ही वैभवशाली परंपरा जतन करून वर्तमानातसुद्धा ‘भेदाभेद अमंगल’ असे समाजभान जागृत ठेवण्याचे काम हा वारकरी संप्रदाय आजही निरलसपणे करीत आहे.

ज्ञानेश्वर-नामदेवांनंतर काही शतकांनी जन्मलेले, याच परंपरेतील थोर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगवाणीतून हिच ज्ञानगाथा लिहिली. ‘जोडावे धन उत्तम व्यवहारे’ अशी नैतिक शिकवण देऊन समाजाला जगण्याचा सत्य मार्ग सांगितला. संत आणि सामान्य कष्टकरी यांचे एक अंतरिक नाते पुन्हा एकदा दृढ झाले. म्हणूनच संत बहिणाबाई लिहून गेली ‘ज्ञानदेवे रचला पाया कळस जाहले तुकोबाराया.’ तेव्हापासून ग्यानबा-तुकारामांचे स्मरण करीत आपला सर्वात्मक समाज, संतवाणीचे भावरूप मनी घेऊन मोठ्या ताकदीने वारीत आजतागायत चालतो आहे. म्हणूनच पंढरीची वारी आपल्या सर्वकालिक समाजाचं प्रतिकात्मक रूप भासते.

समाजातील सगळे घटक – मग ते स्त्राr-पुरुष, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, ह्या जातीचा त्या जातीचा.. कसलाही भेद नाही. सर्वांनी यावे आणि ह्या समरसतेच्या गंगेत सामील होऊन विचार शुद्ध करावे, हाच संतांचा विचार आहे. संतसाहित्यातल्या समता, समरसता या विचारांचे प्रतिबिंब आपल्या संविधानातही पडले आहे. म्हणूनच की काय, देहभान हरपून, सुखदु:ख विसरून, मोहपाश त्यागून, संसार सोडून सगळेच वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत असतात. जशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या पंढरीच्या विठूरायासाठी वारकरी सोडतात, अगदी त्याच प्रकारे एक गोष्ट आपल्या मनामनात बिंबवतात, ती म्हणजे समरसता.. वारकऱयांच्या मनामनात असलेली समरसता जणू त्या विठ्ठलाचेच प्रतिबिंब.

समाजात आज जातीजातीमध्ये असलेला भेद हा मध्ययुगात खचितच आजच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिकच होता, तरीही संतांनी आपल्या कृतीतून समाजात जातिभेदविरहित समाजाची मांडणी केली, म्हणून तर विष्णुमय जग सांगणारे तुकोबाराय फक्त ते सांगतच नाहीत, तर आपल्या आचरणातून दाखवतात. तुकोबारायांच्या चातक मंडळातील टाळकर्यांची नावे जरी आपण पाहिली, तरी आपल्याला याची साक्ष पटेल. कोणताही भेद संतांच्या मनाला शिवत नाहीच नाही, म्हणूनच तर माउली म्हणतात, अवघाचि संसार, सुखाचा करीन।

हजारो वर्षे मानसिक व शारीरिक गुलामगिरी, शिक्षण, व्यवसाय व इतर मानवी स्वांतत्र्यापासुन बहुजनांना दुर ठेऊन अज्ञान, पांखड व अंधश्रद्धेमध्ये ढकलण्याची प्रक्रिया कायम सुरू आहे. प्रत्येक वेळेस नवीन योजना आखल्या जातात. त्या इतक्या बेमालूम असतात की गुलामी, अंधश्रद्धा, थोतांड, पाखंड याबाबत लोकांना काडीमात्र शंका येत नाही म्हणूनच या बहुजन समाजात आजही विषमतेची घाण खोलवर रुजली गेली आहे. खरंतर यातून बाहेर येण्यासाठी संत महात्म्यांनी वेळोवेळी उपदेश केला आहे जो संपूर्ण मानवाचे कल्याण योजतो. मात्र आम्ही त्यांनाही एका समुहात बंदीस्त करून ठेवत आहोत. आज गरज आहे ती समानतेची….. आज वारी हवी समतेची मानवतेच्या कल्याणाची… जो विचार आमच्या संतांनी सातत्याने पेरला इथल्या मातीत रुजवला त्याचा प्रचार आणि प्रसार केला.

आम्ही वैष्णव एकमेकांचे बंधू असून आपला क्रोध, अभिमान सोडून आम्ही एकमेकांचे चरणस्पर्श करत आहोत. त्याही पुढे जाऊन जगद्गुरू तुकाराम महाराज पुढे सांगतात, आम्हा वैष्णवांना वर्णाचा अभिमान नाही की जातीची आठवण नाही, हे सगळे विसरून आम्ही सारे एकमेकांना लोटांगण घालत आहोत. किती क्रांतिकारक विचार संतांनी शेकडो वर्षांपूर्वी मांडलाय. ज्या काळात कोण कोणत्या जातीत – वर्णात जन्मला आला यावरून त्याचे श्रेष्ठत्व ठरवले जायचे, तेव्हा आपली संतपरंपरा सांगते की आपण सारे भाऊ भाऊ आहोत. त्याहीपुढे जाऊन ज्ञानोबाराय तर हे सगळे विश्वच माझे घर आहे असे आपल्याला सांगतात.

बदलत्या काळानुसार वारीतही अनेक बदल घडून येत आहे. मागील काही वर्षापासून वारीचं थेट प्रेक्षेपण होऊ लागल्याने वारीही डिजिटल झाली आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातील नागरिक आणि तरुणाई सुद्धा वारीत मोठ्या संख्येने सहभागी होतात. अर्थात वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱया भाविक भक्तांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. परंतु यामुळे वारीत येणाऱयांची संख्या घटत नाही तर उलट ती वाढतच आहे. कारण वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक लेणं आहे. सामाजिक शुद्धीकरणाची ती एक प्रक्रिया आहे. आज बदलत्या काळात सामाजिक द्वेष वाढवणाऱया घटनांची संख्या वाढत असताना सामाजीक समता आणि एकात्मतेच तत्वज्ञान रुजवणारा हा वारीचा सोहळा नक्कीच उल्लेखनीय म्हणावा लागेल. या वारीच्या माध्यामातून सामाजिक एकोपा असा वाढीस लागावा हीच पंढरीच्या विठुरायाचरणी प्रार्थना..
‘हेची व्हावी माझी आस
जन्मोजन्मी तुझा दास
पंढरीचा वारकरी
वारी चूको न दे हरी…’

मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?