ठाणे : मनीष वाघ लिखित ‘विश्लेषण’ या लेखसंग्रहाच्या प्रकाशनावेळी डॉ. राजेश मढवी बोलत होते. गुरुपौर्णिमा आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. चंद्रशेखर वाघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात य लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. मढवी पुढे म्हणाले, क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर या पुस्तकातील लेख हे विसावी ओव्हर आहे. कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण करताना, त्याचे चांगले – वाईट परिणाम, त्याचे दुष्परिणाम बघितले जातात. तसेच या लेखसंग्रहातून मनीष वाघ यांनी शासन, प्रशासनाच्या बाबतीत विश्लेषण केले आहे. हे लेख वाचताना वाचकाचे नक्कीच प्रबोधन होईल. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मिडीया अशी लढाई आहे. यात प्रिंट मीडिया जिवंत ठेवायचा वाघ यांनी प्रयत्न केला आहे. वडिलांची प्रतिमा आणि प्रतिभा मनीष वाघ यांच्या पाठीशी असून त्यांच्याकडून असेच लिखाण होत राहो.
यावेळी ‘आपला महाराष्ट्र डिजिटल’चे संपादक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य हेदेखील उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, काही ठिकाणी जावं लागतं तर काही ठिकाणी जावसं वाटतं. आज मी जावसं वाटलं म्हणून या कार्यक्रमाला मनापासून उपस्थित आहे. मनीषचे परखड विचार कौतुकास्पद आहेत. संघ विचारांचा पत्रकार असूनही भाजपच्या काही धोरणाविरोधात त्याने लिखाण केले, हे धैर्याचे काम आहे. असेच परखड आणि वास्तव लिखाण त्याच्या हातून व्हावे, असे मत ऍड. वैद्य यांनी मांडले.
आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ विचारवंत निशिकांत महांकाळ म्हणाले, प्रस्थापितांविरुद्ध लिहिण्यासाठी एक धाडस लागतं, ते मनीष वाघ यांच्यात आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा विशेष आनंद आहे.
यावेळी लेखक मनीष वाघ, कोमसाप शहर उपाध्यक्ष विनोद पितळे, मनोहर बापट, चंद्रशेखर दामले, कोमसाप शहर सहसचिव पंकज पाडाळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, रत्नेश मिश्रा आदी मनावर उपस्थित होते. मनीष वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.