‘लाडक्या खड्ड्या’ तुझ्यासाठी काहीही; जीव मुठीत घेऊन बदलापुरकरांचा जीवघेणा प्रवास

बदलापूर : ठाणे, डोंबिवलीनंतर नवं शहर म्हणून विस्तारणाऱ्या बदलापुरात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले आहेत. एकीकडे लोकल मार्गाने ऑफिस गाठताना गुदमराला लावणारी गर्दी, अपुऱ्या लोकल, विलंबाने धावणाऱ्या लोकल अशा अनेक समस्या असताना रस्ते मार्गही खडतर होत चालला आहे. अंबरनाथ-बदलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यामागील कारण रस्त्यावरील खड्डे आहे. खड्डेमय रस्त्यांवरून वाट कशी काढायची असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.

त्यामुळे या ‘लाडक्या खड्ड्या’पासून सुटका करून घेण्यासाठी बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाने शहरात उपहासात्मक बॅनर लावले आहेत.  बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे पालिका आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘लाडका खड्डा’ असे उपरोधिक बॅनर लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खड्डे पडले असल्यामुळे त्यांचं नाव ‘लाडका खड्डा’ ठेवल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे.

सध्या राज्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा आहे. एकीकडे सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरविण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारचं आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘लाडका खड्डा’ असे बॅनर्स खड्ड्यांच्या बाजूला लावले आहेत. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातील का? असा सवाल बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

× How can I help you?