नव्याने रिडेव्हलप झालेल्या टॉवरमध्ये पोपटपंतांना नेमक्या नको असलेल्या रेल्वे ट्रकच्या बाजूचा फ्लॅट अलोट झाला. फ्लॅट बघायला पंत आले, फ्लॅट पाहिला आणि गॅलरीत गेले. गॅलरीतून खालचे रेल्वे ट्रकचे दृष्य बघताच ‘याचसाठी केला का कोट्यवधींचा अट्टाहास’ अशी प्रतिक्रिया मनात सहज उमटली. ट्रकच्या बाजूने वाहणारा नाला… त्याचा आसमंतात दरवळलेला वास… नाल्याच्या काठावर उगवलेले काँग्रेसी गवत आणि काठावर प्रातविधीला बसलेली लहान मुले… पोपटपंतांना शिसारी आली. गॅलरीचे दार बंद करून ते आत आले आणि त्यांचे मन स्वतशीच हितगूज करू लागले. ‘पंत, काय हे दिवस? भारताने अमृतकाल सेलिब्रेट केला, ‘मोदी @ 3.0′ पर्व चालू आहे, 2047 चा अजेंडा ठरला आहे. अर्थव्यवस्था 10-15 ट्रिलियनची होत आहे. पण तुमच्या परिसराला काही ‘अच्छे दिन’ येत नाहीत.’
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणेशपूजेला उपस्थित राहिल्याप्रमाणे मोदीजी लोकदैवत रामदेवाचे दर्शन घेतील किंवा खातू श्यामजींच्या दरबारात हजेरी लावतील किंवा सालासरच्या हनुमान जत्रेत ‘दंडवत’ घालतील. पण ते चुकून इथे आले तर? मग इथे बसणार कुठे? नाल्यावर? इथे बघणार काय? तुडुंब नाले आणि गलिच्छ वस्ती? बरे झाले ते अशा भागात नाही येत ते.
आज मोदीजी दिवसातून दहा वेळा नवे कपडे बदलतात, हजारो कोटींच्या विमानात उड्डाण करतात, कुठल्याही करारावर सही करायला कोट्यवधीचे पेन वापरतात, सात एकरात पसरलेल्या घरात सर्व सोयींनी राहतात. पण मुळात मनाने ते फकीर आहेत. यातच त्यांचं असामान्यत्व दडलंय. सामान्य माणसाची गोष्ट वेगळी आहे. तो धर्म-अर्थ-काम-मोक्ष आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ असा प्रवास करत ‘संन्यास आश्रमा’त पोहोचतो. पण फकीरांना संन्यास आश्रमात ‘वाइल्ड कार्ड’ प्रवेश मिळतो. त्यामुळे मोदींना कोणताही नियम लागू होऊ शकत नाही.
मोदींनी 35 वर्षांपासून भिक्षा मागितली आहे. त्यामुळे ते कोणाच्याही घरातील कोणत्याही पूजा-उत्सवात सहभागी होऊन प्रसाद घेऊ शकतात. अंगावर लाखो रुपयांचा रिसायकल प्लास्टिकचा कोट घालू शकतात. ‘रोबो’शी संवाद साधू शकतात. स्वतला देव म्हणू शकतात. 10-12 हजार कोटींच्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती लागली, तर ‘काम सुधारू’ म्हणतात.
जसजसे न्यायमूर्ती चंद्रचुडांच्या घरी मोदींच्या हातातले आरतीचे तबक गणपतीपुढे फिरत होते तसतसे माझ्या डोक्यातही विचारांचं चक्र फिरत होतं. एक वेळ वाटलं, चंद्रचुडांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असेल तर शेजाऱयांप्रमाणे मोदीजींनाही बोलावले असेल. मोदीजी भक्त, साधे, चांगले, निष्पाप आणि नम्र व्यक्ती आहेत. पूर्व दिल्लीतील गुरु तेग बहादूर नगरच्या गवंडीमध्ये गेलेल्या राहुल गांधींसारखे अहंकारी थोडीच आहेत? मोदीजी तर फकिर आहेत. त्यांना स्वतसाठी काय हवे असणार? देश आणि जगात शांतता असावी अशीच त्यांची देवाकडे मागणी असणार.
शेवटी धर्म हा वैयक्तिक कल्याणाचा मार्ग आहे. आरती करून देशात आणि जगात शांतता नांदणार नाही. त्यासाठी आपल्या अंध अनुयायांना द्वेषपूर्ण विधाने करण्यापासून रोखले पाहिजे. सर्व बाबतीत संवेदनशीलता आणि समता दाखवली पाहिजे. सगळे जग फिरत बसलात पण दीड वर्षानंतरही मणिपूरला जाणे टाळले. सत्ता आणि न्यायव्यवस्थेची तुमची जवळीक म्हणूनच शंका निर्माण करते.
या देशाला आणि जगाला मोदी समजले नाहीत हेच खरे. आकाश, जल, वारा यांच्याप्रमाणेच मोदीही सर्व बंधनांच्या आणि औपचारिकतेच्या पलीकडे गेलेले आहेत. कारण ते बायोलॉजिकल आहेत. देवदूत आहेत.
विचारांच्या भोवऱ्यातून पोपटपंत बाहेर आले. विचारांच्या नादात आपण कुठे कुठे भरकटून आलो, याचेच आश्चर्य वाटले. या विचारांनी त्यांना मळमळायला लागलं. त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला. नाल्याचा वास त्यांच्या नाकात शिरताच पंतांना हायसं वाटलं आणि इथे राहायला आलो की गॅलरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा, असा निश्चय करून पोपटपंत नवीन टॉवरमधून बाहेर पडले…
मनीष वाघ