हर शनिवार एक शेर

 

तू इधर उधर की न बात कर,
ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा?
मुझे रहज़नों से गिला तो है,
पर तेरी रहबरी का सवाल है”

खरंखरं न सांगता किंवा मुद्याचे न बोलता इकडच्या तिकडच्या गोष्टी करत मुद्दा टाळणारी बरीचशी माणसे आपण पाहात असतो आणि ऐकतही असतो. कदाचित खरं सांगितलं किंवा मुद्याचं बोललं तर ते अंगलट येऊ शकते म्हणूनही त्यांचे तसे वागणं असू शकते. आणखी एक कारण म्हणजे स्वतःची प्रतिमा समाजात चांगली निर्माण व्हावी यासाठी देखील त्यांची ती खटपट असते.कधी कधी ऐकणाऱ्याला वाईट वाटू नये ,त्याचे मन दुखावले जाऊ नये म्हणून सुद्धा खरी गोष्ट उघड न करता अवांतर बोलून मूळ गोष्टीला बगल दिली जाते .

प्रत्येक माणसाच्या ठायी जसे सद्गुण असतात तसे अवगुणही असतात. या जगात स्वच्छ चारित्र्याची माणसे नाहीत असंही नाही .पण त्यांची संख्या समाजात अत्यंत अल्प आहे.अर्थात स्वतःची काळी किंवा वाईट बाजू कोणीही येऊन स्वतः जाहीर करणे अशक्य आहे. जोपर्यंत समाजाला त्यांच्या पासून धोखा नाही किंवा समाजाला नुकसान होत नाही तोपर्यंत ते ठिक आहे. परंतु कुटुंबाला, समाजाला व देशाला घातक ठरणाऱ्या गोष्टींची माहिती एखाद्याकडे असेल आणि त्या व्यक्तीचे ती माहिती समाजाच्या हितासाठी उघड करणे उत्तरदायित्व असेल तर ती सार्वजनिक करणे आवश्यक असते . परंतु स्वतःच्या फायद्यासाठी ,ज्या संघटनेशी ते जोडलेले असतात त्या संघटनेची मलीन झालेली प्रतिमा उघड होऊ नये म्हणून इकडची तिकडची कारणे सांगून मूळ प्रश्नाला बगल देण्याचे कृत्य त्यांच्याकडून होताना दिसते .

याबाबतची पुष्कळशी उदाहरणे प्रायः आपणास लोकशाही व्यवस्थेत होताना दिसतात.अलिकडे राजकारण हा व्यवसायच नाही तर धंदा झाला आहे . यामुळे राजकारणाचे सध्याचे उसूल फार बदलले आहेत. सफाईने खोटे बोलणे, प्रतिपक्षाची बदनामी करणे, आपल्या अवगुणांची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्या स्पर्धकांना अवगुणांचे लेप चढवणे, त्यांच्या चारित्र्य हननाच्या गोष्टी रचणे हे सारे गुण राजकारण व प्रशासनात यशस्वी होण्यासाठी अलिकडच्या काळात हुकुमाचे एक्के झाले आहेत . काही अपवाद सोडता सध्या जे राजकारणी बघतो त्यांच्यात हे गुण चांगलेच मुरलेले आपण पाहतो.काल जे काही ते बोललेले असतात त्याच्या अगदी विरुद्ध आज ते बोलायला लागतात आणि इतके ठासून बोलत असतात की आपणही ते काल काय बोलले हे विसरून जातो. अगदी बेमालूमपणे बगल देऊन अवांतर मुद्यांवर ते बोलतात. काल आपण ज्या पक्षात होतो तेव्हा ज्या प्रतिपक्षावर आपण घणाघाती टीका केली आज त्याच पक्षात प्रवेश केल्यावर कालची बाजू कशी चूक होती आणि आजची बाजूच कशी योग्य आहे याची कारणमीमांसा सुद्धा तितक्याच प्रभावीपणे सांगतात. आपल्याच भूमिकेवर एका दिवसात घुमजाव करतात.निवडणुकीत कितीही पचका झाला तरीही तो राजकीय डावपेचाचा हिस्सा कसा होता हे लोकांपुढे चवीने मांडून सहज धूळफेक करतात. कितीही काटेकोरपणे उलटतपासणी केली तरी ते आपल्याला त्यांच्या वाक्चातूर्याने मूळ मुद्यापासून भरकटवत दूर नेतात.लोकांना ,त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची सर्व गुपिते माहीत असतात. त्यांच्या नेतृत्वाच्या काळजीतून जनतेच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात.पण ते इतके मुरलेले राजकारणी असतात की सहज त्या मुद्यांना बगल देत जनतेला व पाठीराख्यांना खरं न सांगता भुलवत राहतात, फसवत राहतात.

लपवून लुटालटीची कहाणी
करतो सदा खोटी बतावणी
ज्ञात जना सारे, त्यांचे कारनामे
पण भुलवी तया, त्यांची गोड वाणी

– मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?