‘गुजरात’ : ‘फसवणूकी’ची राजधानी

देशातील प्रत्येक राज्य किंवा शहर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहे. बिहार हे राज्य खंडणी किंवा अपहरण उद्योगांसाठी कुप्रसिद्ध होते. यावर अनेक चित्रपट तयार झाले. झारखंडमधील जामतर ही सायबर फसवणुकीची राजधानी आहे. यावर एक मालिकाही तयार झाली. राजधानी दिल्ली गुंड आणि शूटर्स लोकांची राजधानी बनली आहे. मुंबई ही टोळीयुद्ध आणि संघटित गुन्हेगारीची राजधानी आहे. यावरही अनेक चित्रपट बनले आहेत. तसेच गुजरात ही मागील दहा वर्षांमध्ये फसवणुकीची राजधानी म्हणून उदयास येऊ लागली आहे. शेअर बाजार, बँकिंग क्षेत्र, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पकडले जाणारे ड्रग्स या घटना मागील दहा वर्षांमध्ये वाढल्या असतानाच आता फसवणूक आणि लुटमारीच्या ज्या कथा समोर येत आहेत त्यातून तिथल्या ठगांची पूर्णपणे वेगळी प्रतिभा दिसून येते. गुजरातची ही फसवणुकीची लागण राजकारणातून तर आली नसावी ना, असा एक शोध सध्या सर्वत्र सुरू झाल्याचीही एक बातमी आहे..

प्रकरण आहे अहमदाबादच्या आयुष्मान ख्याती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाने सात निरोगी लोकांवर अँजिओप्लास्टी केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वास्तविक, मेहसाणा येथील रुग्णालयात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात 19 जणांना हृदयविकाराचे निदान झाले होते. त्यानंतर आयुष्मान कार्ड असणायांना मोफत उपचार मिळेल, असे सांगितले. अशा सात जणांची अँजिओग्राफी करून त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही सर्व कारवाई चार तासांत पार पडली. गेल्या सहा महिन्यांत या रुग्णालयाने साडेतीनशेहून अधिक अँजिओग्राफी केल्याचे सांगण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेतील पद्धतशीर फसवणुकीचे हे प्रकरण आहे.

गेल्या महिन्यात राजधानी गांधीनगरमध्ये बनावट न्यायालय आणि बनावट न्यायदंडाधिकारी यांचा पर्दाफाश झाला होता. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. गांधीनगरमध्ये एका व्यक्तीने बनावट न्यायालय स्थापन केले होते, ज्यामध्ये तो न्यायदंडाधिकारी म्हणून बसायचा आणि त्याचे सहकारी वकील म्हणून हजर असायचे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी नऊ खटल्यांचा निकालही दिला. न्यायाधिकरणाचे अधिकारी म्हणून त्यांनी खटले ऐकले आणि आदेश दिले. आता तो पकडला गेला असून तुरुंगात आहे. यापूर्वी, गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग 27 वर नुकताच एक बनावट टोल प्लाझा पकडला गेला होता. वांकानेर ते मोरबी आणि कांडला, मुंद्रा या प्रमुख बंदरांना जोडणाया महामार्गावर बनावट टोलनाका सुरू होता. जवळच्या गावचे सरपंच आणि इतर काही लोकांनी स्वतचा बनावट टोल प्लाझा उभारला होता, जिथे वाहनांकडून टोल वसूल केला जात होता. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

फसवणुकीच्या या मालिकेतील आणखी एक मनोरंजक प्रकरण म्हणजे गुजरातमधील छोटा उदेपूर येथे एका माजी आयएएस अधिकाऱयाने पाटबंधारे विभागाचे बनावट कार्यालय उघडले होते. तेथून आदिवासी उपयोजनेचे पैसे जिह्यातून लाटले जात होते. पाटबंधारे विभागाच्या त्या बनावट कार्यालयातून गुजरात सरकारचे सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. किरण पटेल, गुजरातमधील एक व्यक्ती पंतप्रधान कार्यालयाचा बनावट कर्मचारी म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये कसा पोहोचला आणि अत्यंत संवेदनशील लष्करी तळांना भेट देत होता, ज्याला नंतर अटक करण्यात आली. तसेच संजय शेरपुरिया यालाही पंतप्रधान कार्यालयाजवळ असल्याचे भासवून गुजरात ते दिल्ली येथे फसवणूक करताना पकडण्यात आले. मात्र, सर्वत्र फसवणूक होत असली, तरी बनावट टोल प्लाझा बांधणे, पाटबंधारे विभागाचे बनावट कार्यालय उघडणे, बनावट न्यायालय उभारणे आदी ही वेगळ्याच पातळीवरील प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि उद्योजकतेची उदाहरणे आहेत.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?