महाराष्ट्रात शरद पवार कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा जोरात झाले आहेत. हे किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, मात्र कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली कटुता संपली असा दावा मात्र केला जात आहे.
अजितदादा पवारांच्या मातोश्री आशाताईंनी नववर्षाच्या मुहूर्तावर पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. आपल्या मुलाच्या भाग्योदयाची कामना त्यांनी पांडुरंगापाशी केलीच सोबतच पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले तर आपल्याला खूप बरे वाटेल, तशी प्रार्थनाही आपण पांडुरंगाला केल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवार सहकुटुंब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. तिथे सुप्रियाताईंनी त्यांचे पुढे होऊन स्वागत केले. त्यानंतर नागपूरच्या अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाच्या तीन नेत्यांनी अजितदादांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात एक जागा रिक्त ठेवण्यात आली, ती नेमकी कोणाच्या कोट्यातील आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी जयंत पाटलांसाठी ती रिकामी ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या छावणीत विभागलेले कुटुंब एकत्र आले आहे. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर एकात्मता झाली, आता राजकीय एकीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन कुटुंब राजकीयदृष्ट्या वेगळे असले तरी इतर बाबींमध्ये दुरावा असल्याचे संकेत दिले होते, असेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आणि युगेंद्र पवार विधानसभेत अजित पवार यांच्या विरोधात लढल्यामुळे कटुता वाढली होती.
जयंत पाटलांनीही सभागृहात बोलताना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही राष्ट्रवादीची खासियत असल्याचे विधान केले होते. आता आशाताईंच्या वक्तव्यानंतर दादा गटाच्या नरहरी झिरवळांनी हनुमानाच्या हृदयात जसे रामाचे वास्तव्य होते तसे आपल्या हृदयात शरद पवारांचे स्थान असल्याचे म्हटले आहे. तिकडे प्रफुल्ल पटेलांनीही शरद पवार आमच्यासाठी दैवत होते आणि सदैव राहतील, असे म्हटले. ही सगळी वातावरण निर्मिती बघता निकट भविष्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निर्णय काय असेल, याचा थोडाफार अंदाज राजकीयतज्ज्ञांनाआलाआहे.
एकतर शरद पवारांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होईल किंवा शरद पवारांचा गट आपले स्वतंत्र अस्तित्व राखून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल, या दोन शक्यतांची अधिक चर्चा आहे. पुढच्या आठवड्यात शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे, कदाचित त्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीनेही या अलीकडच्या वातावरण निर्मितीकडे पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार घडामोडी घडल्या तर लवकरच सुप्रिया सुळे केंद्रात आणि जयंत पाटील राज्यात मंत्रिपदावर विराजमान झाल्याचे दिसेल.