कोई क्या उखाड लेगा?

‘कोई क्या उखाड लेगा? ‘हा उन्मत्त प्रश्न ठाण्यातले फेरीवाले ठाणेकरांबरोबरच प्रशासनालाही आता विचारताना दिसत आहेत. पालिका अधिकाऱयांना-लोकप्रतिनिधींना हप्ते देऊनही कारवाई होते, या रागातून सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयावर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत या अनधिकृत फेरीवाल्यांची आता मजल पोहोचली आहे. अशा हल्ल्यांनंतर फेरीवाल्यांवर जोरदार कारवाईचे ‘प्रदर्शन’ प्रशासन करते. मात्र पालिकेच्या गाड्या जाताच, हे फेरीवाले पुन्हा नव्या जोमात त्याच जागेवर आपले बस्तान बसवतात. ठाणेकर नागरिकही मोठ्या उत्साहाने याच फेरीवाल्यांकडून खरेदी करतात. अशा खरेदीवर नागरिकांच्या आणि हप्ता वसूल करणाऱया अधिकारी-कर्मचाऱयांच्या जीवावर हेच फेरीवाले प्रशासनाला वाकुल्या दाखवत प्रश्न विचारतात, ‘हमारा कोई क्या उखाड लेगा?’

महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवे, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने दिला असतानाच ठाण्यात तब्बल 20 हजार बेकायदा फेरीवाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या फेरीवाल्यांनी शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, मैदाने, स्टेशन परिसर व्यापले असून नागरिकांनी चालायचे कुठून? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पालिकेचे फेरीवाले धोरण दहा वर्षांपासून लटकले आहे.

ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. तरीही गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या फेरीवाल्यांचे संकट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरात फेरीवाला धोरण राबविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप हे धोरण कागदावरच आहे.
महापालिकेने 1 हजार 366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली असली तरी शहरात 20 हजारांहून अधिक बेकायदेशीर फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे.

प्रभाग समितीनिहाय फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात येणार होते. मात्र अद्याप जागा निश्चित झालेली नाही, तर अनेक फेरीवाले कुर्ला, भिवंडीतील असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून आपला व्यवसाय करत आहेत. अनेक फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांचे फोफावले असल्याचे दिसून येत आहे. कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नसल्यामुळे 285 फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर नव्याने कागदपत्रे सादर केल्यानंतर 1 हजार 366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार आली. नगर पथ विकेता समिती गठीत न झाल्याने फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून मिळते.

: मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?