मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे आणि कशेळी येथील दोन जिल्हा परिषदांच्या शाळांमधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.
केवणी दिवे शाळेमध्ये ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या ‘कवितेच्या ओठी, अभिजात मराठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मो. ह. विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना अरुण म्हात्रे यांनी तुकाराम, ज्ञानेश्वर, शिरवाडकर, पाडगावकर, शांता शेळके, बहिणाबाई यांच्यापासून चालत आलेल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि वैभवाचे थोडक्यात कथन केले. मराठी भाषेला असे साहित्यवैभव लाभले म्हणूनच महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठीच आहे आणि तिचे जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे श्री. म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी अरुण म्हात्रे यांनी मुलांना काही कविता गाऊन दाखविल्या आणि मराठी शब्द-खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य खुलविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ऍड. मनोज वैद्य यांनी, मराठी भाषेला अधिकाधिक व्यावहारिक करण्यासाठी किंवा भाषेविषयी जी भीती निर्माण केली आहे ती काढून टाकण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज आहे, ते प्रयत्न आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले. दुसऱ्या भाषांचा तिरस्कार न करता मराठी साहित्य, मराठी लोककला, मराठी संगीत याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपदान ऍड. वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना मुख्याध्यापक विकास पाटील यांनी सांगितले, मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे. बोलीभाषा टिकल्या तरच मराठी टिकेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत बोलीभाषांचे वैविध्य आढळते. म्हणूनच बोलीभाषा टिकणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर केवणी-दिवेच्या सरपंच मथुरा मढवी, मो.ह. विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाटील, संचालक मंडळ सदस्य स्नेहा शेडगे आणि कोमसाप ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य उपस्थित होते. श्री. अभिजित यांनी मराठी गाणी गौण विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
कशेळी येथील शाळेत कोमसापच्या महिला अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना मराठी म्हणी, वाप्रचार आणि व्याकरणाविषयी मार्गदर्शन केले. कोमसापचे सहसचिव पंकज पाडाळे यांनी विद्यार्थ्यांना लोककला, भारुड आदीविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका कोमल झिंजाळ यांच्यासह मंगल कढणे, समिधा झेंडे, सुजाता पाटील या शिक्षिका उपस्थित होत्या.
दोन्ही शाळांमधील कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन डॉ. प्रतीक्षा बोर्डे आणि पंकज पाडाळे यांनी केले तर स्थानिक कार्यकर्ते प्रभीर भोईर आणि कांतीलाल यांचे तसेच शाळेच्या शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.