ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पॉड टॅक्सीचा पायलट प्रकल्प राबविणार : प्रताप सरनाईक

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ठाणे महापालिका क्षेत्रात, घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीस, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे आणि शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव, स्मशानभूमी, उद्यान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकासकामांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. ज्या प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत किंवा अतिक्रमणे हटवायची आहेत, ती कामे १५ मार्चपर्यंत पूर्ण करून पुढील बैठकीत त्याची माहिती द्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रोप-वे, पॉड टॅक्सी यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्युट्राॅन ईव्ही मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती.

दरम्यान, अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर, मीरा-भाईंदर येथील जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून त्यामध्ये सरकार अथवा महापालिकेला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा-भाईंदर मध्ये मेट्रोला सलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉड टॅक्सीचे जाळे निर्माण करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

Leave a Comment

× How can I help you?