उपक्रमांमधील विविधता हीच ठाणे शहर शाखेची खरी ओळख – नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आज जवळपास सत्तर शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहे. प्रत्येक शाखा तळमळीने भाषा संवर्धनाचे काम करीत असते. पण कोमसापची ठाणे शहर शाखा ही ऍड. मनोज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांमधील विविधता राबवून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी केले. कोमसाप शहर शाखेने आयोजित केलेल्या महिला साहित्य जागर या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी सभागृहात तन्वी हर्बलच्या संचालिका डॉ. मेधा मेहेंदळे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ठाणे शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य, शहर महिला अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा बोर्डे, शहर कार्याध्यक्ष साधना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

नमिता कीर आपल्या मनोगतात पुढे म्हणाल्या, सागरी साहित्य संमेलन, दृष्टिहिनांचे काव्यसंमेलन, आजचा महिला कला जागर, वेगवेगळ्या स्पर्धा यातून मला आज ठाणे शहर शाखेची नव्याने ओळख झाली. असे सामाजिक, सांस्कृतिक काम करताना आपल्या घरच्यांचे प्रेम, आशीर्वाद सतत सोबत असावे लागतात. तरच तुम्ही मनासारखे काम करू शकाल, असे मत नमिता कीर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले, स्त्रीची अनेक रूपे आहेत. पण आई हे स्त्रीचे सर्वोच्च रूप आहे. आईने केलेले संस्कार शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. जिजाईचे संस्कार होते म्हणूनच शिवबा घडले. मलाही माझ्या आईने शिक्षणाचे, अभ्यासाचे संस्कार दिले म्हणूनच मीही आज या पदावर पोहोचलो आहे. कोमसापच्या सत्तर शाखा आज एकदिलाने मराठी संवर्धनाचे काम करीत आहे. ठाणे शहर शाखेचेही काम असेच सुरू राहू दे, असे डॉ. ढवळ यांनी सांगितले.

तन्वी हर्बलच्या मेधा मेहेंदळे यांनी कोमसापच्या महिला कला जागर कार्यक्रमाचे कौतुक करताना कोमसापची महिलांच्या प्रती असलेली भावना ही वाखाणण्यासारखी आहे. हे नमिता कीर यांच्या रूपाने आपण पाहतोच आहोत. महिलांनी समाजात काम करताना आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. मेहेंदळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ऍड. मनोज वैद्य यांनी शहर शाखेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम, उपक्रमांची माहिती दिली. शहर शाखेने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. त्यापैकीच स्त्री कर्तृत्वाला सलाम करणारा आजचा महिला कला जागर कार्यक्रम असल्याचे वैद्य यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण शहर कार्यकारिणी ही तन-मनाने काम करीत असते. पण कुठलाही उपक्रम पैशाअभावी अडू नये म्हणून स्वत:च्या खिसातले पैसे खर्च करून तो उपक्रम केला जातो. म्हणूनच आमचे सगळे उपक्रम हे यशस्वी ठरतात, असेही ऍड. वैद्य यांनी सांगितले.

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, कोमसाप महिला अध्यक्ष डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी शहर शाखेच्या वतीने प्रकाशित होणाऱया ‘समृद्ध मराठी’ या डिजीटल अनियतकालिकाच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी संपादक भारती मेहता यांनी प्रास्ताविक केले. एकपात्री प्रयोग,  ‘मुक्काम पोस्ट तलाव’ च्या लेखिका नूतन बांदेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही यावेळी करण्यात आला.

मराठी कवितांवर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली . पंकज पाडाळे यांनी ही नृत्ये दिग्दर्शित केली होती. भारतीय क्रिकेट टीमचा अंतिम सामना, रविवार असूनही प्रेक्षकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला.

Leave a Comment

× How can I help you?