आज २० मे, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे. मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. म्हणूनच त्यांच्या संवर्धनासाठी अनेकजण पुढाकार घेतात. अशांपैकीच एक आहेत मेक्सिकच्या लेयडे पेच या मयान समुदायातील एक महिला…
मधमाश्या पाळून त्यापासून उत्पन्न मिळविणे हा मेक्सिकोच्या युकाटॅन द्वीपकल्पाच्या कॅम्पेचे राज्याचा प्रमुख व्यवसाय. इथल्या मयान या स्थानिक समुदायातील सुमारे 25 हजार कुटुंबीयांची गुजराण याच व्यवसायावर चालते. किंबहुना मधमाश्या पालन ही त्यांची प्राचीन संस्कृतीच! परंतु जास्त नफा देणाऱया सोयाबीनच्या लागवडीसाठी इथल्या स्थानिक जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागल्याने येथील मधमाश्यांचा अधिवास नष्ट होऊ लागला. पर्यायाने हा व्यवसायही धोक्यात येऊ लागला. या सोयाबीनच्या शेतीला प्रतिबंध व्हावा यासाठी मयान समुदायातीलच लेयडे पेच ही पुढे आली. तिच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या आंदोलनांमुळे अखेर मेक्सिकन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सोयाबीनच्या शेतीला प्रतिबंध करण्यात आला
.
2000 च्या सुमारास अमेरिकेतील ‘बायर’ कंपनीच्या ‘मोन्सॅन्टो’ या ऍग्रीकेमिकल कंपनीची नजर युकाटॅनच्या द्वीपकल्पावर गेली. इथे सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करून कंपनीला जास्त नफा मिळू शकतो याचा अंदाज येताच इथल्या स्थानिक जंगलांची तोड करून त्या जागी सोयाबीनची लागवड होऊ लागली. या शेतीमधून मिळणाऱ्या परकीय चलनाचा विचार करून मेक्सिकन सरकारनेही या शेतीला सरकारी मदत- अनुदाने देऊन प्रोत्साहित केले. मेक्सिकोमधील सहा राज्यांमध्ये स्थानिक प्रजातींना विश्वासात न घेता सोयाबीन शेतीला परवानगी देण्यात आली.
या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खते आणि औषधांमुळे त्याचे दुष्परिणाम स्थानिक जैवविविधतेवर जाणवू लागले. मधमाश्यांपासून मिळणारे मध कमी तर झालेच, पण जे थोड्या प्रमाणात मिळत होते, ते दूषित मिळू लागले. पर्यायाने याचा परिणाम स्थानिक मयान समुदायावर, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि जीवनशैलीवरही होऊ लागला.
लेयडे पेच या मयान समुदायातीलच एक. मधमाश्या पालन हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय. सोयाबीन शेतीमुळे या व्यवसायावर होणाऱया दुष्परिणांची जाणीव होताच, पेच यांनी स्थानिक पर्यावरणवादी आणि मधमाश्यापालकांना एकत्रित केले. ‘सिन ट्रान्सजेनिकोस’ या संस्थेची स्थापना करून सोयाबीन शेतीविरोधात मेक्सिकन सरकारला निवेदने देण्यात आली. सरकार लक्ष देत नाही असे लक्षात येताच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांत सरकारविरोधात खटले दाखल केले.
अनेक शैक्षणिक संस्थांच्या मदतीने पेच यांनी सोया शेतीमुळे मध, पर्यावरण आणि लोकांवर होणाऱ्या दुष्परिणामांचे कागदोपत्री, अभ्यासपूर्ण पुरावे जमा केले. या पुराव्यांच्या आधारे युनिव्हर्सिडेड ऑटोनोमा या मेक्सिकोच्या स्वायत्त विद्यापीठाने सोयाबीन उत्पादनांचा अभ्यास केला. यात ग्लायफोसेट या तणनाशकांचे अंश मधमाश्यांमध्ये आाढळून आले. त्याचा परिणाम थेट मधमाश्यांच्या प्रजननावर आणि मधावर झाल्याचा अहवाल विद्यापीठाने दिला. या अहवालाच्या आधारे पेच आणि मयान समुदायाने ‘मोन्सॅन्टो’ विरोधातला आपला लढा तीव्र केला. अखेर कायदेशीर लढाईत सोया शेतीवर बंदी घालण्यात आली. पेच आणि समुदायाच्या एकीची ही ऐतिहासिक लढाई मेक्सिकोच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. लेयडे पेच यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 2020 चा ‘गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार’ देण्यात आला.
: मनीष चंद्रशेखर वाघ