ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ५१ टक्के नालेसफाई पूर्ण झालीअसून यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असला तरी कालव्यात मात्र नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.
कळव्यात अनेक ठिकाणी नालेसफाई झालेली नाही. न्यू शिवाजीनगर,कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा वाजले आहेत. येथील नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत नागरिकांनी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहे.
अधिकाऱ्यांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासने देण्यापेक्षा रस्त्यावर उतरवून त्या ठिकाणी स्वतः उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामे करून घ्यावीत.जेणेकरुन थोड्या पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही.
नालेसफाईच्या कामात सातत्याने हातसफाई होत आहे.त्यामुळे आतातरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या नाहीतर नागरी हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.