जग एकीकडे चालकविरहित वाहनांच्या निर्मितीत गुंतला आहे. यंत्र तंत्रज्ञान मानवांचे हाताचे कौशल्य हिरावून घेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची एक नवी शक्ती उदयास येत आहे. तर दुसरीकडे याच कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेला एक स्त्री रोबोट आता अल्बेनिया देशाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत आहे. तिचे नाव आहे डिएला! ही डीएला आता भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे स्वप्न जगाला दाखवेल. डिएलाची नियुक्ती ही सत्ताधारी पक्ष भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची कल्पना करत आहे, तर विरोधी पक्ष या रोबोट महिलेची नियुक्ती असंवैधानिक म्हणत आहे.
२८ लाख लोकसंख्या असलेल्या अल्बानियाच्या अल्बेनियन भाषेत, “डिएला” म्हणजे “सूर्य”. डिएला हा रोबोट म्हणून विकसित करण्यात आला आहे जो पारंपारिक अल्बेनियन पोशाखात एक सौम्य, सुंदर आणि सुसंस्कृत स्त्री दर्शवितो. डिएलाचा चेहरा अल्बेनियन अभिनेत्री अनिला बिशा हिच्या अनुकरणातून तयार करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी राजधानी तिराना येथील संसदेत सार्वजनिक खरेदी मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती औपचारिकपणे जाहीर केली. अल्बेनिया युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि भ्रष्टाचार या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण करत आहे. म्हणूनच, सरकारी खरेदी निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि गैरव्यवहार दूर करणे या उद्देशाने डिएला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान रामा यांनी एआय मंत्र्याची नियुक्ती करून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे पाऊल उचलले आहे. या संदर्भात, सरकारमधील इतर मंत्री आणि सरकारी अधिकारी असे म्हणू लागले आहेत की यामुळे सार्वजनिक खर्चातील भ्रष्टाचाराला तोंड देण्यास मदत होईल. याउलट, विरोधी पक्षातील खासदार असा दावा करत आहेत की हा तथाकथित एआय-शक्तीचा महिला रोबोट भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे काम करेल. कारण रोबोट शेवटी एक मशीन आहे आणि त्याला माहिती पुरवणारा शेवटी माणूसच असतो.
अल्बेनियन संविधानाने आभासी महिला रोबोटला नव्हे तर लोकांनी निवडून दिलेल्या सदस्याला मंत्री होण्याचा अधिकार दिला आहे. मन, हृदय किंवा नैसर्गीक शरीर नसलेला रोबोट मंत्र्याची जागा कशी घेऊ शकतो? हा दृष्टिकोन केवळ मानवांना थेट राजकारणातून विस्थापित करण्याचे एक धूर्त तांत्रिक माध्यम आहे, जे कोणत्याही देशासाठी आणि मानवतेसाठी हानिकारक आहे. कोणतेही प्रतीक मानवाची जागा घेऊ शकत नाही.
डिएलाच्या नियुक्तीचा सर्वात महत्त्वाची धोका म्हणजे तिच्या चुकांसाठी कोणाला जबाबदार धरणार? डिएला ही नैसर्गिक व्यक्ती नाही आणि तिला नियंत्रित करणारा कोणताही स्पष्ट कायदा नाही. गोपनीयता आणि डेटा सार्वभौमत्व या सारख्या सुरक्षिततेच्या समस्या देखील उद्भवतात. म्हणूनच, एआय हे निश्चितच कार्यक्षम आणि समावेशक प्रशासनासाठी एक शक्तिशाली साधन असले तरी, त्याची जबाबदारी आणि सार्वजनिक विश्वास सुनिश्चित केला पाहिजे, ज्यामुळे नैतिक आणि लोकशाही मानके स्थापित केली पाहिजेत.
: मनीष चंद्रशेखर वाघ