देवांनो ! तुम्ही सुद्धा!…

 

 

कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच “बळी प्रतिपदा!” ‘प्रतिपदा’ हा शब्द संस्कृत ‘प्रतिपद’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ अमावास्येनंतरचा पहिला दिवस (म्हणजेच शुक्ल प्रतिपदा). दिवाळीनंतर येणारा हा दिवस म्हणून त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणतात. हा दिवस राजा बळीराजाशी संबंधित आहे.

पुराणात यासंबंधी असलेल्या कथेचा संक्षिप्त भाग असा आहे की, ” बळी हा दैत्यवंशातला राजा होता. बळी दैत्य असला तरी अत्यंत दयाळू, धर्मप्रिय आणि न्यायी होता. त्याच्या राज्यात सर्वजण सुखी होते. बळीराजाचे सामर्थ्य आणि कीर्ती इतकी वाढली की देवतांनाही त्याचा मत्सर वाटू लागला. मग देवांनी भगवान विष्णूला विनंती केली. तेव्हा विष्णूने वामनावतार घेतला आणि बळीने आयोजित केलेल्या यज्ञात तीन पावले जमीन मागितली. बळीने विष्णुला म्हणजे वामनाला निःसंकोच दान दिले. विष्णुने पहिले पाऊल पृथ्वीवर, दुसरे आकाशात ठेवले, आणि तिसऱ्या पावलासाठी बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात पाठवले. भगवान विष्णूने वामनावतार घेत बळीराजाला पाताळात पाठवले. पण त्याच्या भक्ती आणि सत्यनिष्ठेमुळे त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली.”

तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा. या दिवशी बळीराज पृथ्वीवर येतो असे मानले जाते. लोक त्याचे स्वागत करतात आणि समृद्धी, प्रेम आणि न्यायाची प्रार्थना करतात. या दिवशी लोकमानस म्हणते, “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो.” याचा मथितार्थ असा की, ” सर्व दुःख, संकटं दूर होवोत आणि बळीराजासारखे न्यायी, समृद्ध, आनंदी राज्य पुन्हा यावे”

जर बळी अत्यंत दयाळू, धर्मप्रिय आणि न्यायी होता तर देवांना त्यांच्या स्वर्गातील निजधामाची चिंता का वाटली? बळीने स्वर्गावर आक्रमण पण केलेले नव्हते. तसेच बळी हा उतलेला मातलेला राजा पण नव्हता. मग केवळ अशा धर्मप्रिय,दयाळू, रयतेचे कल्याण पाहणाऱ्या राजाला पाताळात धाडण्याचे कारण काय? शब्दाला पक्का व दानावर प्राणांतिक निष्ठा ठेवणाऱ्या राजाला पाताळात धाडून देवांनी नेमके काय साध्य केले? केवळ नि केवळ लोकमानसाची समजूत काढण्यासाठी त्याला वर्षातून एकदा पृथ्वीतलावर येण्याची परवानगी दिली का?

बळीला पाताळात पाठविण्यात इतका कोणता धोका देवांना वाटला? रयतेला कल्याणराजा पासून वंचित करून काय झाले? सत्यवान, निष्ठावान, रयतेचे कल्याण चिंतनारा हा राजा केवळ दैत्य होता म्हणून देवांनी त्याला पाताळात धाडले का? देवांनाही त्याची असुया वाटत होती का? आमच्या देवांना सुद्धा भय वाटत होते का? मग माणूस,दैत्य व देव यांच्यात फरक तो काय? म्हणून म्हणावेसे वाटते ,’देवांनो तुम्ही सुद्धा!

: मोरेश्वर बागडे

Leave a Comment