
सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार ‘गिधाड संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आकाशात मोठ्या पंखांनी घिरट्या घालणाऱ्या या पक्ष्यांकडे आपण अनेकदा केवळ मेलेल्या प्राण्यांवर ताव मारणारा पक्षी म्हणून पाहतो; पण प्रत्यक्षात गिधाडे ही निसर्गव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची ‘स्वच्छतादूत’ आहेत. एखाद्या मृत जनावराचे शव कुजण्यापूर्वी त्याचा फडशा पाडून ते परिसर रोगराईपासून मुक्त ठेवतात. त्यामुळे गिधाडांचे अस्तित्व हे केवळ जैवविविधतेचे नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याचेही संरक्षण आहे.
मात्र गेल्या तीन दशकांत माणसाच्या एका चुकीच्या हस्तक्षेपाने या पक्ष्यांचे अस्तित्वच धोक्यात आले. १९९०च्या दशकात भारतात लाखोंच्या संख्येने आढळणाऱ्या गिधाडांची संख्या अक्षरशः कोसळली. पांढऱ्या पाठीचे, भारतीय आणि बारीक चोचीचे गिधाड या तीन प्रजातींची संख्या १९९२ ते २००७ या काळात सुमारे ४० लाखांवरून अवघ्या ३२ हजारांपर्यंत घसरली. म्हणजेच शंभरपटीहून अधिक घट झाली. या अभूतपूर्व संकटामागे पशुधनासाठी वापरले जाणारे डायक्लोफेनॅक हे वेदनाशामक औषध प्रमुख कारण ठरले. हे औषध दिलेल्या जनावरांचे मृतदेह खाल्ल्यानंतर गिधाडांच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होत असे.
ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर भारतात पशुवैद्यकीय वापरासाठी डायक्लोफेनॅकवर बंदी आणण्यात आली. गिधाड संवर्धनासाठी काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने या संकटाविरोधात सातत्याने जनजागृती केली. मेलॉक्सिकॅम आणि टोलफेनॅमिक अॅसिड यांसारखी गिधाडांसाठी सुरक्षित औषधे उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. मात्र संकट अद्याप संपलेले नाही. एसीक्लोफेनॅक, केटोप्रोफेन, नायमेसुलाइड आणि इतर काही औषधे गिधाडांसाठी घातक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. २०२५ मध्ये पशुवैद्यकीय नायमेसुलाइडवर राष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्यात आली, ही संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी ठरली.
गिधाडांची आजची स्थिती समजून घेण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने २०२३ ते २०२५ दरम्यान केलेले देशव्यापी मूल्यांकन अत्यंत महत्त्वाचे आहे. या पहिल्या पद्धतशीर सर्वेक्षणात चार गंभीर संकटग्रस्त निवासी प्रजातींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. देशातील पूर्वी नोंदलेल्या ४२५ गिधाड घरट्यांच्या ठिकाणांपैकी केवळ १२० ठिकाणी पुन्हा घरटी आढळली. नव्या ठिकाणांसह एकूण २१६ ठिकाणी २,४१० घरटी आढळली; त्यापैकी १,९९४ घरटी सक्रिय होती.
या आकडेवारीतून संकटाची तीव्रता स्पष्ट होते. भारतीय गिधाडाची देशातील प्रजननक्षम संख्या किमान २,०५८ ते कमाल २,७५८ इतकी असल्याचा अंदाज आहे. पांढऱ्या पाठीच्या गिधाडाची ही संख्या १,७८० ते १,८९० इतकी आहे. बारीक चोचीच्या गिधाडाची ज्ञात प्रजननसंख्या तर अवघी सुमारे ४० आहे. लाल डोक्याच्या गिधाडाची किमान अंदाजित प्रजननसंख्या सुमारे ८० आहे. हे आकडे संपूर्ण गिधाडसंख्या नसून प्रजननक्षम गिधाडांचे संरक्षित आणि उपलब्ध घरट्यांवर आधारित अंदाज आहेत; त्यामुळे प्रत्यक्ष एकूण संख्या यापेक्षा अधिक असू शकते.
महाराष्ट्र गिधाड संवर्धनाच्या नकाशावर अत्यंत महत्त्वाचे राज्य बनले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या ताज्या मूल्यांकनानुसार महाराष्ट्रात भारतीय गिधाडाची १८ ठिकाणी १२६ घरटी, त्यापैकी ९३ सक्रिय घरटी आढळली. त्यावरून या प्रजातीच्या प्रजननक्षम गिधाडांची संख्या १८६ ते २५२ इतकी असल्याचा अंदाज आहे. पांढऱ्या पाठीच्या गिधाडाची महाराष्ट्रातील ३५ घरटी, त्यापैकी २७ सक्रिय, नोंदली गेली असून त्याची प्रजननसंख्या ५४ ते ७० इतकी असल्याचा अंदाज आहे. म्हणजे या दोन प्रमुख संकटग्रस्त प्रजातींची महाराष्ट्रातील किमान अंदाजित प्रजननसंख्या २४० ते ३२२ इतकी ठरते.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गिधाडांचे अस्तित्व आता अनेक ठिकाणी संरक्षित वनक्षेत्रांशी जोडले गेले आहे. विदर्भातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी या व्याघ्रप्रकल्पांमध्ये गिधाड पुनर्स्थापनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि BNHS यांच्या संयुक्त प्रयत्नातून बंदिस्त प्रजनन केंद्रांमध्ये वाढविलेली गिधाडे पुन्हा जंगलात सोडली जात आहेत.
पेंचमध्ये २०२४ मध्ये दहा गिधाडे सोडण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये आणखी १३ गंभीर संकटग्रस्त गिधाडे आठ पांढऱ्या पाठीची आणि पाच भारतीय गिधाडे निसर्गात सोडण्यात आली. त्यांना जीपीएस/जीएसएम उपकरणे लावून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. याच कार्यक्रमाचा विस्तार मेळघाट आणि ताडोब्यापर्यंत करण्यात आला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा येथे एकूण ३४ गिधाडांना नैसर्गिक वातावरणात सोडण्यात आले.
मेळघाटसाठी ही मोहीम विशेष महत्त्वाची आहे. या परिसरात गिधाडे जवळपास स्थानिक पातळीवर नामशेष झाली होती. २०२५ मध्ये पिंजोर येथून १५ भारतीय गिधाडे मेळघाटात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यांना उपग्रह आणि जीएसएम ट्रान्समीटर लावण्यात आले. २०२६ मध्ये या पक्ष्यांमध्ये जंगलाशी जुळवून घेण्याची चिन्हे दिसू लागली. मेळघाटमध्ये हिमालयीन गिधाडाचे दर्शन होणे आणि ताडोब्यात युरेशियन ग्रिफॉनची नोंद होणे हीसुद्धा संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली उत्साहवर्धक चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात ‘गिधाड रेस्टॉरंट’ किंवा सुरक्षित खाद्यस्थळांची संकल्पनाही महत्त्वाची ठरत आहे. नाशिकच्या खारपाडा भागासह श्रीवर्धन परिसरात मृत पशुधन सुरक्षित पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा ठिकाणी गिधाडांना विषारी औषधांपासून मुक्त अन्न मिळते आणि त्यांच्या अधिवासात त्यांचे अस्तित्व टिकविण्यास मदत होते. भारतीय वन्यजीव संस्थेच्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील श्रीवर्धन आणि नाशिक येथे अशा ‘गिधाड रेस्टॉरंट’ स्थळांची नोंद झाली आहे.
गिधाडांचे संवर्धन म्हणजे केवळ एका पक्ष्याला वाचविण्याची मोहीम नाही. गिधाडे नष्ट झाल्यानंतर मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची नैसर्गिक व्यवस्था कोसळते. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांना अधिक अन्न उपलब्ध होते आणि पर्यावरणीय तसेच सार्वजनिक आरोग्याच्या समस्या वाढतात. म्हणूनच गिधाड हे निसर्गाचे केवळ सफाई कामगार नाहीत, तर परिसंस्थेचे आरोग्य तपासणारे जैविक निर्देशक आहेत.
आज भारतात संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे आशेची काही किरणे दिसत असली, तरी संकट संपलेले नाही. विषारी औषधे, अधिवासाचा ऱ्हास, मृत जनावरांची असुरक्षित विल्हेवाट, वीजवाहिन्या, विषबाधा आणि अन्नाची कमतरता ही आव्हाने कायम आहेत. त्यामुळे गिधाड संवर्धन दिन हा केवळ एखादा ‘दिन’ म्हणून साजरा करण्याऐवजी गिधाडांसाठी सुरक्षित औषधे, सुरक्षित अधिवास आणि सुरक्षित अन्नसाखळी निर्माण करण्याचा संकल्पदिन ठरायला हवा.
कारण गिधाड आकाशातून नाहीसे झाले, तर त्याची पोकळी केवळ आकाशात निर्माण होणार नाही; ती आपल्या गावांच्या, जंगलांच्या आणि अखेरीस आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या व्यवस्थेतही जाणवेल. गिधाड वाचविणे म्हणजे निसर्गाची स्वच्छता व्यवस्था, जैवविविधता आणि माणसाचे आरोग्य या तिन्हींचे रक्षण करणे होय.