विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

ठाण्यात फ्लेक्स बोलू लागलेत, आता सत्तेने ऐकावे…

ठाणे शहरात फ्लेक्स नवे नाहीत. फ्लेक्स हे ठाण्याच्या राजकीय संस्कृतीचे जणू ‘अधिकृत साहित्य’ झाले आहे. फरक एवढाच की आतापर्यंत त्या साहित्याचा नायक एकच असायचा, नेता! वाढदिवस असो, उद्घाटन असो, नियुक्ती असो, सण असो किंवा निवडणुकीची चाहूल असो; रस्त्याच्या कडेला, इमारतीच्या भिंतीवर, चौकात, नाक्यावर आणि कधी नागरिकांच्या डोळ्यांसमोर थेट उभा राहणारा एकच प्रश्न, ‘ आपला फोटो एवढा मोठा का नाही? ’

पण ठाण्यात आता एक वेगळाच फ्लेक्स दिसू लागला आहे. त्यावर नेता नाही. पद नाही. पक्षाचा झेंडा नाही. चेहरा नाही. फक्त एक संदेश आहे ‘नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विद्यमान कामे पूर्ण करा! ’

सत्तेच्या भाषेत याला कदाचित ‘ विरोधकांचे षडयंत्र ’ म्हटले जाईल. एखाद्या पक्षाच्या शब्दकोशात त्याला ‘ राजकीय कट ’ म्हटले जाईल. एखाद्या समर्थकाच्या दृष्टीने तो ‘ विकासविरोधी प्रचार ’ ठरेल. पण सामान्य ठाणेकरांच्या शब्दकोशात त्याचा अर्थ अगदी सोपा आहे, ‘ साहेब, आधी जे सुरू केले आहे ते तरी पूर्ण करा! ’ आणि हा आवाज जर उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या निवासस्थानाच्या आसपासच्या परिसरात आणि मॅरेथॉनच्या मार्गावर पोहोचला असेल, तर त्याकडे केवळ फ्लेक्स म्हणून पाहणे राजकीयदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. कारण हा फ्लेक्स नाही; हा नागरिकांच्या संयमाचा फलक आहे.

ठाणे शहराने विकासाची किंमत फार मोठी मोजली आहे. रस्ते खोदले जातात. पुन्हा खोदले जातात. त्याचे पुन्हा सिमेंटीकरण केले जाते. पुन्हा ते उखडते. वाहतूक कोंडी होते. धूळ उडते. पावसात चिखल होतो. एखाद्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि काही काळाने त्या कामाभोवती शांतता पसरते. नागरिकांच्या मनात मात्र ‘हे काम नेमके कधी पूर्ण होणार?; हा एकच प्रश्न उरतो.

सत्तेच्या कॅमेऱ्याला पूर्ण झालेला प्रकल्प जितका आवडतो, तितकेच त्याला भूमिपूजनाचे छायाचित्र अधिक आवडते, असा नागरिकांचा अनुभव आहे. भूमिपूजनाला फुलांचा हार असतो. उद्घाटनाला नारळ असतो. फीत कापताना छायाचित्र असते. घोषणेला प्रसिद्धी असते. पण काम रखडले की? तेव्हा फ्लेक्स बदलतो. चेहरा बदलतो. घोषणा बदलते. आणि नागरिकांची समस्या तिथेच राहते. हीच तर आपल्या विकासाची गंमत आहे.

प्रकल्प पूर्ण होण्यापेक्षा प्रकल्प जाहीर होण्याला जर राजकीय महत्त्व मिळत असेल, तर शहराला विकास मिळतो की फक्त विकासाची जाहिरात? ठाणेकरांनी आता हा फरक ओळखायला सुरुवात केली आहे. म्हणूनच या नव्या फ्लेक्समध्ये एक विलक्षण उपरोध आहे. नेहमी नेत्यांचे चेहरे पाहून थकलेल्या शहराने यावेळी स्वतःचा चेहरा फ्लेक्सवर आणला आहे ‘नागरिकांचा चेहरा!’

हा चेहरा कोणाचा? ज्या ठाणेकराचा रोज वाहतूक कोंडीत अडकतो. ज्या ठाणेकराला कामासाठी घराबाहेर पडताना ‘आज कोणता रस्ता बंद असेल?’ याचा अंदाज घ्यावा लागतो. ज्याच्या परिसरात महिनोन्‌महिने काम सुरू असल्याचे फलक असतात; पण प्रत्यक्षात कामाची प्रगती दिसत नाही. ज्याला कर भरताना विकासाची आश्वासने मिळतात आणि विकासाच्या नावाखाली सततचे खोदकाम मिळते.

आता त्याच नागरिकाने फ्लेक्स उभारला आहे. आणि गंमत पाहा, त्यावर त्याचा फोटोही नाही. कारण त्याला प्रसिद्धी नको आहे. त्याला काम हवे आहे. राजकारणाने हा फरक समजून घेण्याची वेळ आली आहे. कारण नागरिकांना आता ‘किती कोटींचा प्रकल्प’ यापेक्षा ‘कधी पूर्ण होणार?’ हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. कोटींच्या आकड्यांनी शहराची वाहतूक सुटत नाही. मोठ्या आराखड्यांनी खड्डे बुजत नाहीत. घोषणांनी पाणीपुरवठा सुधारत नाही. भाषणांनी पूल उभा राहत नाही.

काम पूर्ण झाले कीच विकास दिसतो. बाकी सगळे कागदावरचे स्वप्न आणि फ्लेक्सवरची सजावट आणि ठाण्याच्या राजकारणात फ्लेक्सला विशेष महत्त्व आहे. इतके की कधी कधी वाटते, शहराच्या लोकसंख्येपेक्षा फ्लेक्सवरील नेत्यांची संख्या अधिक असावी! एका चौकात इतके चेहरे दिसतात की नागरिकांना वाहतूक कोंडीपेक्षा ‘हा कोणत्या पक्षाचा?’ याचा शोध घेणे अवघड जाते.

चेहरे मोठे. अक्षरे मोठी. पद मोठे. दावे त्याहून मोठे. फक्त काम? ते मात्र अनेकदा छोट्या अक्षरांत! या पार्श्वभूमीवर ‘नेत्याऐवजी संदेश’ असलेला फ्लेक्स हा खरोखरच स्वागतार्ह बदल आहे. कारण लोकशाहीत जाहिरात नव्हे तर उत्तरदायित्व मोठे असले पाहिजे.

सत्तेत असताना प्रत्येक प्रकल्पाचे श्रेय घेणे सोपे असते. पण त्याच प्रकल्पाच्या विलंबाची जबाबदारी घेणे कठीण असते. उद्घाटनाच्या वेळी उपस्थित राहणारे अनेक असतात; काम रखडल्यावर नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे किती? हा प्रश्न केवळ एका पक्षाला नाही. हा प्रश्न प्रत्येक सत्ताधाऱ्याला आहे.

आज सत्ता तुमची असेल. उद्या दुसऱ्याची असेल. पण रस्ता नागरिकांचाच राहणार आहे. कर नागरिकांचाच असणार आहे. शहर नागरिकांचेच असणार आहे. म्हणूनच ‘आम्ही एवढे प्रकल्प आणले’ या राजकीय मिरवणुकीपेक्षा ‘आम्ही एवढे प्रकल्प वेळेत पूर्ण केले’ ही कामगिरी महत्त्वाची आहे.

आता या फ्लेक्सची संख्या वाढली तर आश्चर्य वाटू नये. कारण समाजमाध्यमांच्या काळात एखाद्या नागरिकाचा प्रश्न क्षणात हजारो लोकांचा प्रश्न होऊ शकतो. एका रस्त्यावरील फलकातून शहरभर चर्चा सुरू होऊ शकते. हेच या फ्लेक्सचे राजकीय महत्त्व आहे. तो कोणाच्या विरोधात नाही. ‘आधी घोषणा, नंतर काम; काम अर्धवट राहिले तरीही पुढची घोषणा!’ या संस्कृतीला आता पूर्णविराम हवा.

ठाणे शहराला आणखी भूमिपूजने नकोत. आणखी आश्वासने नकोत. आणखी रंगीत फलक नकोत. आणखी चेहऱ्यांची गर्दी नको. ठाणेकरांना हवे आहेत पूर्ण झालेले रस्ते, सुरळीत वाहतूक, सक्षम पायाभूत सुविधा आणि वेळेत पूर्ण होणारे प्रकल्प आणि म्हणूनच या फ्लेक्सकडे सत्ताधाऱ्यांनी रागाने नव्हे, आरशासारखे पाहावे. कारण आरशावर रागावून चेहरा बदलत नाही. चेहरा बदलायचा असेल तर आरशात दिसणाऱ्या वास्तवाला सामोरे जावे लागते.

आज फ्लेक्सवर एक वाक्य आहे. उद्या तेच वाक्य नागरिकांच्या तोंडात असेल. परवा ते मतदानाच्या वेळी ऐकू येईल. आणि तेव्हा राजकीय फ्लेक्सवरील हजारो चेहरे असतील; पण मतदाराच्या मनात एकच चेहरा असेल तो म्हणजे काम करणाऱ्या प्रशासनाचा. म्हणून सत्ताधाऱ्यांनी या छोट्याशा फ्लेक्सला कमी लेखू नये.

इतिहास सांगतो की मोठ्या घोषणा अनेकदा विसरल्या जातात. पण जनतेची छोटीशी नाराजी कधी कधी मोठे राजकीय परिणाम घडवते. आज ठाण्याच्या रस्त्यावर फ्लेक्स बोलू लागले आहेत. आता सत्तेने ऐकायचे आहे. नागरिकांचा संदेश अगदी स्पष्ट आहे, नवीन कामाचे श्रेय घेण्याआधी जुने काम पूर्ण करा!’ कारण जनतेने एकदा ‘नको’ म्हटले, तर त्या ‘नको’वर कितीही मोठा फ्लेक्स लावला, तरी त्यावरचा फोटो जनतेच्या मनातला निर्णय बदलू शकत नाही.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

और पढ़ें