
विज्ञान म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर प्रयोगशाळा, पांढरे कोट, अत्याधुनिक यंत्रे, अवकाश संशोधन, अणुशक्ती, कर्करोगावरील उपचार किंवा हवामान बदलाची आकडेवारी उभी राहते. विज्ञान म्हणजे काहीतरी अत्यंत गंभीर, अवघड आणि सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे क्षेत्र, अशी आपली समजूत असते. पण विज्ञानाची खरी ताकद कदाचित याच्या अगदी उलट आहे. जिथे सामान्य माणूस हसून पुढे निघून जातो, तिथे वैज्ञानिक थांबतो आणि विचारतो, ‘पण असे का?’
याच वृत्तीचा उत्सव म्हणजे ‘इग नोबेल’ पुरस्कार. २०२६चे इग नोबेल पुरस्कार ३ सप्टेंबरला स्वित्झर्लंडमधील झ्युरिख येथे प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांचे वैशिष्ट्य असे की, ते अशा संशोधनांना गौरवतात जे प्रथम हसवतात आणि नंतर विचार करायला भाग पाडतात. यंदा अंडरवेअर जमिनीत पुरण्यापासून चुंबनाची वैज्ञानिक व्याख्या करण्यापर्यंत आणि मूत्रालयातील शिंतोडे कमी करण्यापासून डासांच्या सोंडेचा ३-डी प्रिंटिंग नोजल म्हणून वापर करण्यापर्यंत अनेक विलक्षण संशोधनांना गौरवण्यात आले. यातील एक संशोधन तर आपल्या कल्पनाशक्तीलाही आव्हान देणारे आहे, मातीची योग्यता तपासण्यासाठी अंडरवेअर जमिनीत पुरणे.

फ्रांझ बेंडर, मार्सेल व्हॅन डर हायडन, अटलांट बिएरी आणि पिया विवियानी यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात २५हून अधिक देशांमध्ये एक हजार समान प्रकारच्या अंडरवेअरच्या जोड्या जमिनीत पुरण्यात आल्या आणि दोन महिन्यांनी त्या बाहेर काढण्यात आल्या. अंडरवेअर किती प्रमाणात कुजले, यावरून मातीतील सूक्ष्मजीव किती सक्रिय आहेत, याचा अंदाज घेण्यात आला. ऐकायला हा प्रयोग विनोदी वाटतो. पण त्यामागचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, आपली माती जिवंत आहे का?
माती म्हणजे केवळ आपल्या पायाखाली असलेली धूळ नव्हे. तिच्यात असंख्य सूक्ष्मजीव कार्यरत असतात. सेंद्रिय पदार्थांचे विघटन, पोषकद्रव्यांची निर्मिती आणि शेतीची उत्पादकता यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे कापडाचे अंडरवेअर जमिनीत किती वेगाने विघटित होते, यावरून जमिनीतील जैविक क्रियाशीलतेचा एक अंदाज मिळू शकतो. या प्रयोगातून जमिनीचा वापर आणि तिचे आरोग्य यांच्यातील संबंधही अधोरेखित झाला. म्हणजेच ज्याला आपण कपड्याचा तुकडा समजतो, तो वैज्ञानिकांच्या हातात मातीच्या आरोग्याचा निर्देशक बनतो.

याच पुरस्कार सोहळ्यात आणखी एक संशोधन आहे, ज्याचा उल्लेख करताना मॅटिल्डा ब्रिनल यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या उत्क्रांतीविषयक जीवशास्त्रज्ञ डॉ. मॅटिल्डा ब्रिनल, प्राध्यापक स्टुअर्ट वेस्ट आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅथरीन टॅलबॉट यांच्या संशोधनाला बायोमेकॅनिक्सचा इग नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांचा विषय होता, चुंबन म्हणजे नेमके काय?
हा प्रश्न ऐकला की पुन्हा हसू येते. चुंबनाचीही वैज्ञानिक व्याख्या असू शकेल का? असा प्रश्न पडतो. पण वैज्ञानिक संशोधनाची गंमतच अशी आहे. एखादी गोष्ट आपल्याला सहज समजते असे वाटत असले, तरी तिची काटेकोर व्याख्या करणे ही वेगळीच गोष्ट आहे.
ब्रिनल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चुंबनाची अशी व्याख्या सुचवली की त्यात दोन जीवांमधील संघर्षविरहित, एकमेकांकडे निर्देशित मुख-संपर्क, ओठ किंवा मुखांगांची काही हालचाल नसणे अपेक्षित आहे. या व्याख्येमुळे चुंबन ही मानवी कृती न राहता अनेक प्राण्यांच्या वर्तनाच्या अभ्यासाचा विषय बनते. ध्रुवीय अस्वले, काही पक्षी आणि मुंग्यांसारख्या जीवांच्या वर्तनाकडेही या चौकटीतून पाहता येते.
यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या संशोधनाने चुंबनाच्या उत्क्रांतीकडे लक्ष वेधले. ब्रिनल यांच्या टीमने मोठ्या कपि-प्रजातींच्या पूर्वजांमध्ये अशा वर्तनाची उत्क्रांती फार पूर्वी झाली असावी, असे मांडले. म्हणजेच आज आपण ज्याला प्रेम, जवळीक किंवा प्रणयाचा भाग मानतो, त्याच्या मुळांचा शोध उत्क्रांतीच्या खूप मागे घेता येतो. इथेच इग नोबेलचे महत्त्व समोर येते. विषय हास्यास्पद असू शकतो; पण प्रश्न हास्यास्पद नसतो.
शौचालयात उडणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यांवरही याच वर्षी संशोधन झाले. पाण्याचा थेंब पृष्ठभागावर कोणत्या कोनातून आदळतो, त्यावर शिंतोडे किती उडतील, याचा अभ्यास करून कमी शिंतोडे उडवणाऱ्या मूत्रालयाची रचना करण्याचा प्रयत्न झाला. साधारण माणूस जिथे ‘काय किरकोळ गोष्ट आहे!’ म्हणून दुर्लक्ष करेल, तिथे भौतिकशास्त्रज्ञांनी द्रवगतिकीचा प्रश्न शोधला.
डासाची सोंड ३-डी प्रिंटिंगच्या अतिसूक्ष्म नोजलप्रमाणे वापरण्याचा प्रयोगही याच मालिकेतील आहे. मृत डासाच्या सोंडेचा वापर करून सूक्ष्म पातळीवर छपाई करण्याच्या शक्यतेचा शोध घेण्यात आला. नावही देण्यात आले ‘नेक्रोप्रिंटिंग’.
आणि अर्थशास्त्राचा पुरस्कार? संपन्न लोक सामाजिकदृष्ट्या अधिक अनैतिक वर्तन करतात का, याचा अभ्यास. श्रीमंत लोक वाहतुकीत इतरांना कट मारण्याची, कामाच्या ठिकाणी खोटे बोलण्याची किंवा मुलांसाठी ठेवलेल्या मिठाया घेण्याची अधिक शक्यता असते का, यासारख्या प्रश्नांवर संशोधन झाले. हे सारे विषय पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, विज्ञानात ‘योग्य’ प्रश्नांची यादी नसते.
आपल्या शिक्षणपद्धतीची मात्र मोठी अडचण आहे. मुलाने प्रश्न विचारला की त्याला उत्तर द्यायचे असते; पण अनेकदा त्याला ‘असा प्रश्न विचारायचा नसतो’ असेही सांगितले जाते. अभ्यासक्रमात नसलेला प्रश्न म्हणजे वेळेचा अपव्यय, अशी मानसिकता तयार होते. विज्ञान मात्र नेमके तिथे सुरू होते जिथे अभ्यासक्रम संपतो. ‘हे असे का?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे ‘हे वेगळ्या पद्धतीने करून पाहिले तर काय होईल?’
जगातील अनेक मोठे वैज्ञानिक शोध अशाच जिज्ञासेतून पुढे आले. प्रत्येक प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. प्रत्येक प्रश्नाचा तात्काळ उपयोग होईलच असे नाही. पण प्रश्न विचारण्याची सवय संपली, तर संशोधनाची संस्कृतीही संपते. इग नोबेल पुरस्कारांना हास्यास्पद ठरवणे हा आपला संकुचित वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण उपयोगी आणि निरुपयोगी, गंभीर आणि हास्यास्पद, मोठे आणि छोटे असे संशोधनाचे कप्पे तयार केले आहेत. पण निसर्गाला या कप्प्यांची काहीच पर्वा नसते.
माती तपासण्यासाठी अंडरवेअर पुरणारा वैज्ञानिक आणि चुंबनाची उत्क्रांती शोधणारी मॅटिल्डा ब्रिनल; दोघेही एकाच गोष्टीचे प्रतिनिधित्व करतात : जिज्ञासा. फरक एवढाच की एका संशोधनात अंडरवेअर जमिनीत गेले आणि दुसऱ्यात चुंबन प्रयोगशाळेत पोहोचले. यावर हसावेच. पण हसून थांबू नये. कारण या प्रयोगांमागे मातीचे आरोग्य, जैवविविधता, उत्क्रांती, मानवी वर्तन, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे प्रश्न आहेत. आज जगासमोर असलेल्या मोठ्या समस्यांची उत्तरेही कदाचित अशाच एखाद्या अनपेक्षित प्रश्नातून सापडतील. म्हणून विज्ञानाला नेहमी गंभीर चेहरा देण्याची गरज नाही. त्याला मुक्त प्रश्नांची गरज आहे.
अंडरवेअर जमिनीत पुरल्यावर जर मातीचे आरोग्य समजत असेल, तर तो प्रयोग विनोदी असला तरी विज्ञान गंभीर आहे. चुंबनाची व्याख्या करताना जर जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा मागोवा लागत असेल, तर प्रश्न विचित्र असला तरी शोध महत्त्वाचा आहे. शौचालयातील शिंतोड्यांमधून भौतिकशास्त्र समजत असेल, तर दैनंदिन जीवनातील किरकोळ त्रासही संशोधनाचा विषय होऊ शकतो. शेवटी मुद्दा अंडरवेअरचा नाही. मुद्दा चुंबनाचाही नाही. मुद्दा आहे, आपण प्रश्न विचारण्याचे धाडस अजून जपले आहे का?
विज्ञानाची सुरुवात एखाद्या भव्य प्रयोगशाळेत होत नाही. ती सुरू होते ‘असं केलं तर नेमकं काय होईल?’ या एका साध्या, कदाचित हास्यास्पद वाटणाऱ्या प्रश्नाने आणि त्या प्रश्नावर हसण्याऐवजी त्याचे उत्तर शोधायला जो निघतो, तोच उद्याच्या विज्ञानाची पाऊलवाट तयार करतो.
: मनीष चंद्रशेखर वाघ