वाचता वाचता वेचलेले
मकबूल फिदा हुसेन हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार होते.हुसेन हे मौनी खासदार.त्यांनी सहा वर्षाच्या कालावधीत एकही भाषण केले नाही.परंतु राज्यसभेत ते चर्चेच्या वेळी राज्यसभेचे लिहिण्याचे पॅड ,कधी कधी स्वतःच खासदारकीचे लेटरहेड यावर ते कृष्णधवल रेखाटने काढत. हुसेन यांनी कुंचल्यातून रेखाटलेल्या त्यांच्या रेखाटनांचे , “संसद उपनिषद” नावाने पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यातील त्यांचे मनोगत मनोज्ञ आहे. (त्याबाबत नंतर केव्हा तरी) हुसेन यांचे चरित्र लिहिणाऱ्या इला पाल यांनी हुसेनना विचारले,” बोफोर्स प्रकरणी उडालेला गदारोळ तात्पुरता थंडावला आहे, तेव्हा तुम्ही पुन्हा राज्यसभेच्या बैठकीला हजर नाही का राहणार? तेव्हा हुसेन म्हणाले,”अं….मी काही भाषण करणार नाही,माझं स्केच पॅड भरत आलंय.माझी रेखाटनं हीच पुरेशी बोलकी आहेत.”
परंतु तुम्हाला बैठकीत निषेध व्यक्त नाही करायचा का? त्यावर हुसेन यांनी दिलेलं उत्तर मार्मिक आहे… हुसेन म्हणाले, ” नाही..त्यानं केवळ तुमच्या सदसद्विवेकबुद्धीचं तुम्ही समाधान करता, नोकरशाही व भ्रष्टाचार हा आता स्थायीभाव झाला आहे आणि त्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही.” हुसेन हे मौनी
खासदार असले तरी त्यांची रेखाटने हीच त्यांची भाषणं होती अस म्हटलं तर वावगं होणार नाही.
वेचक: मोरेश्वर बागडे
1 thought on “एम एफ हुसैन यांचा किस्सा!”