जाणून घ्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची कथा आणि व्यथा

प्राचीन काळी महाराष्ट्र ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते.(हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) महाराष्ट्राचा उल्लेख सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे स्वामी चक्रधर यांनी केला आहे.सातशे वर्षांपासून विदर्भ,मराठवाडा हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य भाग म्हणून गणला जात आहे.चक्रधर स्वामी लीला चरित्रात म्हणतात –
देश म्हणजे खंड मंडळ
जसे फलटणापोसोनि दक्षिणसी
मराठी भाष जे तुला ठाईव ते
तो एक मंडळा,तयासी उत्तरे बालाघाटाचा शेवट असे,
ऐसे एक खंडमंडळ
मग उभय गंगातीर तेही एक खंडमंडळ
आज तयापासोनि मेघकर( मेहकर)
घाट तेही एक खंडमंडळ
तयापासोनि अवघे वऱ्हाडस तेही एक मंडळ
पर अवघे ची मिळैवुनी महाराष्ट्रची बोलती.
हे सातशे वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे भौगोलिक वर्णन असून याचा उल्लेख आचार्य अत्रे यांनी विधानसभेत केला होता.
ब्रिटिश वसाहतीच्या काळात हा प्रदेश बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सध्याचा महाराष्ट्र, गुजरात आणि सध्याच्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा भाग असलेले क्षेत्र समाविष्ट होते.
मराठी भाषिक लोकांकडून बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या मुख्यतः मराठी भाषिक प्रदेशासाठी वेगळ्या राज्याची मागणी वाढत होती. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली.महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे प्रदीर्घ संघर्ष सुरू होता.अनेक संप आणि निदर्शने झाली,सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ,पण शेवटी मराठी भाषिकांनाच यश मिळाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र राज्य झाले. १ में १९६० रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तीन दिवस मुंबईत लोकांनी रोषणाई आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून उत्सव साजरा केला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची महाराष्ट्रातील जनतेने अभिमानाने आणि आदराने आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.हा दिवस महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, भाषा, वारसा आणि गौरवशाली इतिहास साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आचार्य अत्रे यांनी मराठी माणसाला दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. आचार्य अत्रे म्हणाले, ” संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजे आपले कार्य संपले असे म्हणणे चुकीचे आहे.उलट आताच खरी सुरुवात आहे.बाई बाळंतिण झाली म्हणजे सुईणीचे काम संपले. बारसे झाले म्हणजे नातें नातेवाईक मोकळे झाले. पण त्या बाळाला वाढविण्याचे ,घडविण्याचे काम जन्मदात्या आईला जन्मभर करावे लागते.संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना म्हणजे नवमहाराष्ट्र निर्मितीचा श्रीगणेशा आहे . मराठी भाषेच्या विकासाचा ओनामा आहे.मराठी जनतेने आता जागरूकतेने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. द्विभाषिक मोडण्याचे काम झाले आता नवमहाराष्ट्र घडवायचा आहे.” आचार्य अत्रे यांनी केलेला इशारा किती सार्थ होता हे आजच्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता दिसून येते.
ज्या महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी संत व महात्मे जन्माला आले त्यांच्या कार्यकर्तुत्वाला बट्टा लावण्याचे काम अलिकडे स्वार्थी राजकारणी , संविधानिक पदावरील व्यक्ती मोठ्या प्रमाणात करत आहे.संपन्न महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या दुबळा करण्याचे कटकारस्थान केले जात आहे.आज कणखर व राकट महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि भाषिक अस्मिता पणाला लागली आहे. महाराष्ट्राचे अखंड भारतात असलेले पूर्वीचे गौरवशाली स्थान अढळ राखण्याचा प्रयत्न केला तरच यासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान कामी येईल. यासाठी आपण सारे एक दिलाने झटले पाहिजे आणि करंट्या राज्यकर्ते व शासनकर्ते यांना त्यांची जागा दाखवण्याचे कामही केले पाहिजे.

मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?