आजची आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरवाद

आजची आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला संविधानिक मूल्यांवर आधारित विचारांचा रिपब्लिकन पक्ष  हा सर्व जातीधर्माच्या वंचितांना न्याय देणारा असा राष्ट्रीय सक्षम पर्याय म्हणून उभा राहणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्या पश्चात या पक्षांची मोजता येणार नाहीत एवढी शकले झाली आहेत आणि सर्वसमावेशकता सोडून केवळ काही ठराविक अनुसूचीत जातींचे पक्ष म्हणून आज ही शकले ओळखली जातात. त्यांच्या धरसोड भूमिकांमुळे हे पक्ष बाबासाहेबांचे संविधान मोडीत काढणार्‍या शक्तींनाच प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत करीत आहेत असे भयावाह चित्र आज दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि राजकीय अशा अनेक चळवळी चालवल्या. आता निवडणूक हंगाम असल्याने आपण त्यांच्या राजकीय चळवळीवर नजर टाकू या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची एक देशव्यापी राजकीय पक्ष म्हणून संकल्पना मांडली. कॉंग्रेसच्या विरोधात विविध समविचारी पक्षांना सोबत घेऊन (स्वतंत्रपणे निवडणूक लढवून यश मिळत नाही हे लक्षात आल्याने.) संविधानिक मूल्यांवर आधारित, सर्व जाती-धर्मातील वंचित शोषितांसाठी काम करणारा आणि त्यांना शासनकर्ती जमात बनवणारा पक्ष असे त्याचे स्वरूप होते. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला होता. परंतु हा पक्ष आकारास येण्याआधीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या नंतर या राजकीय चळवळीचे काय झाले?
बाबासाहेबांच्या नंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे खोब्रागडे, गायकवाड गवई गट, नंतरची दलित पॅंथर चळवळ आणि त्या नंतरचे, मोजायला कॅल्कुलेटर वापरायला लागेल, एवढे गट, तट, तुकडे डोळ्यासमोर उभे राहतात. अशी आजच्या आंबेडकरी चळवळीची अवस्था आहे. आज, या चळवळीचे वाहक म्हणून मुख्यतः अॅड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी – वंचित), खा. रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – रिपाई), बहन मायावती (बहुजन समाज पार्टी – बसपा)यांची नावे घेतली जातात.
यावरून राजकीय अंगाने विचार केल्यास संविधानिक मूल्ये (समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद) म्हणजेच आंबेडकरवाद आणि या  मूल्यांवर आधारित चळवळ म्हणजे आंबेडकरवादी चळवळ असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
परंतु आजची आंबेडकरवादी राजकीय चळवळीची परिस्थिती पाहून ही चळवळ खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली, राष्ट्रव्यापी, समविचारी पक्षांना एकत्र आणणारी, संविधानिक मूल्यांवर आधारित अशी चळवळ राहिली आहे काय असा प्रश्न प्रत्येक संविधानप्रेमीस पडतो.
वर उल्लेख केलेल्या (वंचित, रीपाई, बसपा) आंबेडकरी विचारांच्या पक्षांचा कागदोपत्री उद्देश संविधानिक मूल्यांचे जतन करणे, ती रुजवणे आणि सत्ता मिळवणे वगैरे नक्कीच असू शकतो. परंतु, हे पक्ष राष्ट्रव्यापी आहेत का? भाजप विरोधात ते समविचारी पक्षांसोबत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास पदरी निराशाच येते.
या तीनही प्रमुख पक्षांचे नेते आणि त्यांचे अनुयायी यांचे निरीक्षण केल्यास हे पक्ष म्हणजे ठराविक अनुसूचीत जातींच्या लोकांचे पक्ष आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. (त्या त्या पक्षात असलेल्या ठराविक एक दोन अन्य समाजातील नेत्यांची नावे देऊन वरील मताविरुद्ध युक्तिवाद करू नये.) जर हे पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाची ध्येयधोरणे राबवीत असतील तर मग ते ठराविक जातींपुरतेच मर्यादित का आहेत? ते अन्य जातीधर्मांच्या लोकांना सोबत घेण्यात का अयशस्वी ठरले? भाजप विरोधात लढताना ते अन्य समविचारी पक्षांसोबत एकत्र का येत नाहीत, स्वतंत्रपणे निवडणूक का लढवत आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास या लोकांनी आंबेडकरवादास ठराविक जातीपुरते संकुचित स्वरूप दिले आहे असे दिसते. आंबेडकरी म्हटला की तो जयभीमवाला म्हणजे मुख्यतः बौद्ध किंवा अनुसूचीत जातीचाच असला पाहिजे अशी जी आज स्थिती दिसत आहे यास हेच लोक जबाबदार आहेत आणि या लोकांनी आंबेडकरवादाचा केलेला हा पराभवच आहे.
बसपाच्या मायावती यांनी वेगळे सोशल इंजिनियरिंग वापरुन उत्तर प्रदेशात काही काळ अन्य पक्षांशी युती करून तर काही काळ स्वबळावर सत्ता मिळवली. परंतु गेल्या दशकात हिंदुत्वाची लाट आणि ईडी, आयटी, सीबीआय यांपुढे त्या पार ढेपाळून गेल्या. एकेकाळी स्वबळावर सत्ता मिळवणार्‍या या पक्षाचा वर्तमान उत्तर प्रदेश विधानसभेत फक्त एकच आमदार आहे. अन्य राज्यात हा पक्ष जोर धरू शकला नाही. त्यांच्या जागा निवडून येण्याची खात्री दिसत नाही, तरीही यंदाची सार्वत्रिक निवडणूक हा पक्ष स्वतंत्रपणे लढवत आहे. भाजप विरोधी मतांची मतविभागणी होण्यास आणि भाजपच्या जागा जिंकून येण्यास यामुळे मदतच होणार आहे.
वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न राबवून आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काही अपेक्षा निर्माण केल्या होत्या. परंतु त्यांच्या या कामास मागे सारून त्यांच्या अनुयायांनी ‘बाबासाहेबांचे रक्त’, ‘श्रद्धेय’ अशा भावनिक चक्रात त्यांना गुंतवून आणि त्यांच्या पाया पडून  त्यांना अक्षरशः ‘देवत्व’ बहाल करून टाकले आहे. हे आंबेडकरवादात कसे आणि कुठे बसते? ते बाबासाहेबांचे नातू (आणि बाबासाहेबांचे अन्य नातेवाईक) आहेत म्हणून सर्वांना आदर वाटतोच. परंतु राजकारण वेगळे आणि बाबासाहेबांचे रक्त वेगळे हे या अनुयायांना कधी कळणार? हे सारे बाबासाहेबांच्या नातू म्हणून हे योग्य वाटत नाही कारण, त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाया पडायला कोणीतरी पुढे आले असता त्यांनी त्या माणसाला काठीने मारून पाया पडू देण्यास नकार दिला होता, हा किस्सा आजही सांगितला जातो. वंचितने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलीच हवा निर्माण केली होती. त्यांनी मिळवलेल्या मतांमुळे प्रस्थापित पुरोगामी पक्षांच्या काही जागा पडल्या. यंदा समविचारी पक्ष आणि वंचित यांच्यात युती होऊन भाजप विरोधात जबरदस्त आघाडी निर्माण होईल अशी अपेक्षा होती. वंचितला अधिक जागा देऊन का होईना  आघाडी व्हावी असे वाटत होते. परंतु प्रस्थापित पुरोगामी पक्ष आणि अॅड. प्रकाश आंबेडकर हे दोघेही आता एकमेकांस आघाडी न झाल्याबद्दल दोष देत आहेत. वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. काही जागांवर त्यांनी आघाडीस पाठिंबा दिला आहे हे खरे आहे. परंतु अन्य जागांवर त्यांच्यामुळे मतविभागणी होऊ शकते. त्यांचे बरेचसे व्यक्तिमाहात्म्य न मानणारे आणि संविधानास मानणारे  अनुयायी अस्वस्थ आहेत आणि ते कदाचित वंचितला मते न देता आघाडीस मते देतील अशी शक्यता आहे. असे होऊन त्यांची मतांची टक्केवारी अजून कमी झाल्यास ‘तेलही गेले, तूपही गेले…..’ अशी त्यांची अवस्था होऊ शकते. तरी शेवटी याचा  प्रत्यक्षाप्रत्यक्ष फायदा भाजपला होणार आहे.
रीपाईचे रामदास आठवले यांच्याविषयी काय बोलावे? ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, विद्वत्तापूर्ण भाषणांनी संसद गाजवली त्याच संसदेत हा भाजपने राज्यसभेवर आणलेला  आंबेडकरी नेता एक विदूषक, सोंगाड्या म्हणून ‘नावारूपास’ आला आहे. ते नुसते उभे राहिले तरी तोंड उघडण्याआधीच संसदेतील सर्व खासदार हसू लागतात. त्यांच्या पाचकळ कविता या टिंगल-टवाळीचा विषय झालेल्या आहेत. यापेक्षा भयानक बाब म्हणजे ‘आंबेडकरवादी म्हणजे असलेच असतात’ अशी आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी यांची विकृत प्रतिमा यांनी निर्माण केली आहे. संविधान बदल करून  मनुस्मृती आणणार्‍य शक्तींविरोधात विरोधी पक्ष एकजूट होऊन लढत असताना संविधान वाचवणे हा आठवले यांना चक्क बाबासाहेबांचा अपमान वाटत आहे. एके काळच्या लढावू पॅंथरचे भाजपच्या ताटाखालील मांजरात झालेले हे रूपांतर हाच खरे तर आंबेडकरवादाचा घोर अपमान आहे. आठवले यांना कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे, हे मान्य. त्यांनी तो जसा वापरायचा आहे तसा वापरावा. परंतु, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव वापरुन आंबेडकरवादास भाजपच्या दारी बांधणे अजिबात योग्य वाटत नाही. त्यांना स्वतःला आणि त्यांच्या अनुयायांना आंबेडकरवादी म्हणणे सोडून द्यावे.
महाराष्ट्रातील चित्र पाहता, रामदास आठवले हे भाजपच्या चरणी लीन झालेले आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या (आणि मायावती यांच्याही) भूमिकेमुळे अनेक जागांवर भाजप विजय सोपा होत आहे. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते काय?

Leave a Comment

× How can I help you?