बलात्काराला सुद्धा जात, धर्म, पक्ष असतो काय?

२०१२ साली दिल्लीच्या ‘निर्भया’वरील निर्घृण लैंगिक अत्याचारा नंतर त्या विरोधात जात-धर्म-राजकीय बांधिलकी बाजूला ठेऊन समाजाचे सर्व घटक एकजुटीने रस्त्यावर उतरले होते आणि समाजाच्या महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत भावना किती तीव्र आहेत हे दाखवून दिले होते. परंतु हाच समाज गेल्या दशकात असा काही बदलला आहे की तो अत्याचार करणार्‍या नराधमाची तसेच अत्याचार-पीडित महिलेची जात-धर्म-पक्षीय निष्ठा बघूनच मग किती आणि कसा निषेध करायचा किंवा करायचा नाही हे ठरवतो. प्रज्वल रेवन्ना या सत्ता-वर्तुळाशी जवळीक असलेला नराधम एवढ्या मोठ्या संख्येने महिलांवर लैंगिक अत्याचार करतो हे व्हिडिओ क्लिप्स मधून पुढे आलेले चित्र अत्यंत धक्कादायक आणि जिचे आपण पावलोपावली गोडवे गातो त्या संस्कृतीस लांछन आणणारे आहे. परंतु, या प्रकरणात सुद्धा असाच त्याची पक्षीय बांधिलकी बघून निषेध केला जात आहे. त्यात तो भाजपचा लोकसभा उमेदवार. अशा राजकारणामुळे समाजाचे झालेले हे अधःपतन कोणाही संवेदनशील व्यक्तीस अस्वस्थ करणारे आहे.

असा बादल होण्यास कारणीभूत ठरणारी गेल्या काही काळातील उदाहरणे पहा. बलात्कारी नराधमांचा सत्कार करणे, वजनदार लोकांनी केलेल्या अत्याचारांकडे कानाडोळा करणे किंवा त्यांच्यावरील गुन्हा सौम्य करून त्यांची अटक टाळणे, त्यांना आपल्या पक्षात सामील करून पवित्र करून घेणे, मणिपूरसारख्या घटनांवर मौन बाळगणे, वगैरे. अशी कृत्ये करणार्‍या गुन्हेगारांना आधी पक्षाश्रय देऊन नंतर राजाश्रय आणि अभय देण्याचा आणि अत्याचारांकडे जात-धर्म-पक्ष-सापेक्षतेने पाहण्याचा पाया भाजपने घालणे हे त्यांच्या संस्कृतीनुसार आणि त्यांच्या राजकीय नैतिकतेनुसार कदाचित त्यांना योग्य वाटत असावे असे चित्र दिसते. परंतु, मणि शंकर अय्यर यांच्या मोदी विरोधातील कथित अनुदार वक्तव्यावर संवेदनशीलता दाखवून तत्काळ कारवाई करणारा कॉंग्रेस पक्ष संदेशखाली प्रकरणाकडे मात्र तेवढ्या गंभीरतेने पहात नाही, हे पाहून हा पक्ष देखील महिलांवरील अत्याचारांचा निषेध करताना आजकाल जात-धर्म-पक्षीय निष्ठा बघणार्‍या भाजपचीच री ओढत आहे की काय असे जाणवते. हे वर्तमान अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. थोड्याफार फरकाने हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होत आहे.

महिलांवरील अत्याचार हा पुरुषी मानसिकतेतून केला जाणारा मानवतेविरूद्धचा भयानक घृणास्पद असा गुन्हा आहे. यात बळी जाते ती स्त्रीच. भाजपसारखे काही राजकीय पक्ष अशा अपराधांकडे पाहताना राजकीय फायदा तोट्याचा विचार करत असताना, अशा अपराधांविरोधात खरे तर समस्त महिलांनी देखील आपल्यातील भेदाभेद विसरून, एकजूट होऊन, चवताळून उठून, आपल्यातील दुर्गा-काली जागृत करून आपला रुद्रावतार दाखवून दिला पाहिजे. परंतु, अनेक महिला नेत्या तसेच महिला सुद्धा, काही अपवाद वगळता, असा निषेध पीडितेची किंवा गुन्हेगाराची जात-धर्म-पक्षीय निष्ठा पाहून करत आहेत हे अत्यंत यातनादायी आहे. महिलांमध्ये असा दुभंग निर्माण करून त्यांच्यावर वर्चस्व राखणे हे पुरुष-वर्चस्ववादी मानसिकतेच्या लोकांना आवश्यक वाटत असले तरी शतकानुशतकांच्या गुलामगिरितून नुकत्याच कुठे बाहेर पडणार्‍या आणि समता, स्वातंत्र्याची चव चाखणार्‍या महिलांच्या लक्षात ही चाल येत नाही याचे आश्चर्य वाटते. महिलाच जर स्वतःवरील अन्याय-अत्याचाराबाबत अशा दुभंगलेल्या आणि पुरुषी मानसिकतेच्या आहारी गेलेल्या असतील किंवा जात असतील तर त्यांच्यासाठी समता, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी अजून काही शतके तरी वाट पहावी लागेल असे दिसते.

उत्तम जोगदंड

Leave a Comment

× How can I help you?