फूट काय पडली पण उद्धव ठाकरे यांनी नवीन समीकरणे तयार केली! आंबेडकर आणि प्रबोधनकार यांची संगती लावून,“ममुद फॅक्टर” मधील “द”म्हणजे दलित मते कशी जोडली? ( भाग-३ :अंतिम)

रिडल्स इन हिंदुइझमचा वाद झाला तेंव्हा शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी मैदानात उतरून भव्य मोर्चा काढला. आणि दलितविरोधी भूमिका घेतली.त्यावेळी ब्राह्मण्यवादी हिंदुत्ववाद हातात घेऊन,ठाकरे यांनी मध्यमवर्गीय समाजाला भुरळ घालून मुंबई-ठाणे पट्ट्यात शिवसेनेचे स्थान बळकट केले.त्यांची नजर काँग्रेसच्या शहरी मतदारावर होती.

तसेच मराठवाडा नामांतरात बाळासाहेब ठाकरे यांनी घरात नाही पीठ कशाला हवी विद्यापीठ असे उदगार काढून वाद निर्माण केला.१४ जानेवारी १९९४ रोझी शरद पवार यांनी नामविस्तार केला.पण शिवसेनेने मराठवाडा विभागात या भूमिकेतून आपले स्थान बळकट केले.

नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी पीठ आणि विद्यापीठ या वादाबाबत खुलासा करताना सांगितले की,मला दलित समाजाचा उपहास करायचा नव्हता तर,दलित समाजाला मूलभूत शिक्षण आणि पोट भरायला रोजगार दिला पाहिजे.त्याऐवजी त्यांना नामांतरात गुंतवूले जात आहे.

त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती असा प्रयोग केला.त्यातून शिवसेनेची वाहुजन समाजाशी असलेली कटुतेची धार कमी केली.

आता मात्र भाजपने शिवसेनेत पाडलेली फुट, त्यामागे भाजपवर आधीच ब्राह्मणी भूमिका असण्याचा आरोप.त्यात देवेंद्र फडणवीस यांची फुटीत असणारी प्रमुख भूमिका!यामुळे उद्भव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानभूती तयार झाली.अर्थात ब्राम्हण्याला नैसर्गिक विरोधातून दलित समाज साहजिकच, उध्दव ठाकरे यांच्याकडे मानसिकदृष्ट्या झुकला.

त्यात या फुटीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे या फायरब्रँड आंबेडकरी विचारांच्या नेतृत्वाची एंट्री झाली.शिवसेनेने मोकळे रान दिले.त्यानी थेटपणे आंबेडकरवाद आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची सांगड घातली.शिवसेनेच्या मंचावर शाहू-फुले आणि आंबेडकर गर्जू लागले.सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा प्रचंड गाजली.त्यानी केलेली सोशल इंजिनिअरिंग शिवसेनेला उपयुक्त ठरली.

त्यातच शिवसेना पक्षच अस्तित्वात नसताना. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युती केली.त्यामागे आज त्याकडे मागे वळून बघितले असता,असे लक्षात येते की,वंचित-बहुजन समाजात शिवसेनेविषयी निर्माण होणारे स्थान लक्षात घेऊन.वंचितने केलेली ती राजकीय खेळी होती असे म्हणता येईल.

पण यांमुळे ठाकरे यांच्या शिवसेनेची वंचित-बहुजन समाजात योग्यवेळी सांधेजुळणी झाली. त्यांनतर वंचितने युती तोडली तरी शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आदर व्यक्त केला.आम्ही भविष्यात एकत्र येऊ असा आशावाद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्यात भाजपने अबकी बार चारसो पार हा नारा दिला.आधीच भाजपच्या संविधान संदर्भात संशय गडद आहे.मनुस्मृती आणायची अशी धारणा खोलवर रुजली आहे.त्यात देशभरात अनंत हेगडे सारखे नेते उघडपणे चारशे खासदार का हवेत यावर बोलले.

मग काय देशभरात वातावरण बिघडले. महाराष्ट्रात तर “वंचित” विषयी तर संशय दोन निवडणुकीतून दृढ झाला होता.त्यात दलित मतदारांना काही राजकीय मर्यादित उपलब्ध होता.

त्यात उद्धव ठाकरे आपले हिंदूत्व शेंडी-जान्हवयाचे नाही.देवळात घंटा बडविणारे नाही. हा भाजपच्या ब्राह्मणी हिंदुत्वावर हल्ला करत होते. त्याचवेळी आपल्याला संविधान वाचवायचे आहे.असे जाहीरपणे सातत्याने भाषणातून सांगितले.त्याचा एकत्रित परिणाम दिसून येतो आहे.आज “ममुद फॅक्टर” मधील मराठी-मुस्लिम-दलित यामधील “द” दलित मतदार संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीपेक्षा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जास्त विश्वासाने बघत आहे.

एकूणच उद्धव ठाकरे हे भाजपचे तथाकथित चाणक्य मंडळीना मात देतात का हे नेमकेपणाने चार जूनला स्पष्ट होईल.कारण शेवटी मशीनवर मतदान आहे.

-अ‍ॅड. मनोज वैद्य

Leave a Comment

× How can I help you?