*डेबिट पडलेल्या माणसांची कहाणी*

४ कवितासंग्रह, ५ लेखसंग्रह, चरित्र लेखन (प्रभो शिवाजी राजा, शूर आम्ही सरदार, गोष्टीरूप गांधीजी, मनकर्णिका राणी लक्ष्मीबाई), तसेच “आणि ग्रंथोपजिवीये” (ई बुक चे ५ भाग), आणि केमिस्ट्री हा गूढकथा संग्रह अशी साहित्य संपदा स्वत:च्या नावावर असलेल्या कवी, चित्रकार आणि गूढकथा लेखक म्हणून प्रसिध्द असलेल्या रामदास खरे यांनी “द लाँस्ट बँलन्स” ही कादंबरी लिहून आणखी एक यशाचं शिखर सर केलं आहे. रामदास खरे यांचं हे १५ वं पुस्तक आहे.

 

“द लाँस्ट बँलन्स” या कादंबरीचा विषय अगदी वेगळा असून प्रेम, स्वप्नं आणि त्याला जोडून येणा-या काल्पनिक घटना यांचा समावेश या कादंबरीत अजिबात नाही. रत्नावली बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या बंधनांमुळे खातेदारांचे आणि ठेवीदारांचे पैसे या बँकेत अडकून पडतात. आपल्या घामाचा पैसा आपण ज्या विश्र्वासाने बँकेत ठेवलेला असतो, त्याच्यावरच जर बंधनं आली तर खातेदार आणि ठेवीदारांचं धाबं दणाणणं साहजिक आहे. हा भूकंपाचा हादरा आहे पण याने शारिरीक नुकसान होण्याआधी मनात उठणा-या मानसिक आंदोलनांमुळे मानसिक तोल जायला वेळ लागत नाही. निरनिराळया खातेदारांवर होणारे हे परिणाम रामदास खरे यांनी निरनिराळया पात्रांच्या संवादांमधून अतिशय संयतपणे पण परीणामकारकरित्या दाखवले आहेत.

 

बँकेचे खातेदार, ठेवीदार, यांचा संबंध हा फक्त काऊंटर पलीकडे बसलेल्या स्टाफ बरोबर येत असतो. ठेवीदार, खातेदार, बँक मँनेजर, आणि कर्मचा-यांपासून ते अगदी शिपायापर्यंत प्रत्येक जण मानसिक दडपणाखाली आहे याची जाणीव ही कादंबरी वाचताना आपल्याला होत जाते.

 

रत्नावली बँक – उज्वल भविष्याची स्वप्नं पहाणारी ही बँक. कर्जदारांनी बुडवलेल्या कर्जामुळे, संचालकांच्या स्वार्थी आणि मनमानी कारभारामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख हळूहळू उतरणीकडे झुकायला लागतो. खोटे अहवाल आणि स्टेटमेंटस् सादर करून काही दिवस रिझर्व्ह बँकेला फसवण्यात बँकेची संचालक मंडळी यशस्वी होतात. पण लवकरच त्यांच्या अपयशाचा फुगा फुटतो आणि रत्नावली बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून एका नोटिसीव्दारे बंधनं घातली जातात. रिझर्व्ह बँकेच्या एका सर्क्युलरमुळे बँकेशी संबंधित सर्वांनाच (कर्जदार सोडून) एका महाभयंकर दिव्यातून जावं लागतं, ज्याला कोणाचाच इलाज नसतो. ही बातमी पेपरमधे प्रसिध्द होताच आपल्या कष्टाचा, घामाचा पैसा परत मिळवण्यासाठी बँकेचे खातेदार आणि ठेवीदार बँकेच्या शाखाशाखांमधून गर्दी करतात. ब्रँच मँनेजर लेले आणि बँकेतील इतर कर्मचारी वर्ग यांची खातेदारांच्या विविध प्रश्र्नांना उत्तरं देताना चांगलीच दमछाक होते. आपल्या प्रश्र्नांना समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे खातेदार अधिकच प्रक्षोभक होतात. रोज रोज होणा-या या प्रश्र्नांच्या सरबत्तीमुळे मँनेजर लेले यांची प्रकृती बिघडत जाते.

 

रिझर्व्ह बँकेकडून येणारी सर्क्युलर्स, मिटिंग्ज, खातेदार आणि ठेवीदारांचा वाढता संताप, बँकेवर नेमला गेलेला प्रशासक, खातेदारांचे शिव्याशाप, प्रशासकांकडून मिळणारं फायरींग या सगळयाच गदारोळात सर्व ब्रँच मँनेजर अक्षरश: भरडून निघतात. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या या बंधनांमुळे बँकेच्या कामकाजावर आणि समाजातील विविध घटकांवर होत जाणारा परिणाम जातो खरे यांनी अचूक दाखवून दिला आहे.

 

दूरदर्शनवरील बातम्या, उलटसुलट चर्चा, विविध भल्या बु-या प्रतिक्रिया यातून आपले स्वकष्टाचे या बँकेत ठेवलेले सर्व पैसे बुडाले, ते मिळण्याची आता शक्यता नाही याची प्रकर्षाने जाणीव झाल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांचा मानसिक तोल साहजिकच ढळतो. त्यातून पुन्हा त्यांच्या प्रश्र्नांना बँकेच्या अधिका-यांकडून वा अन्य कर्मचा-यांकडूनही समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. खातेदार, ठेवीदार, बँक कर्मचारी यांच्याही मनाचा हा लाँस्ट बँलन्स खरे यांच्या प्रभावशाली लेखणीतून दृश्यमान होऊ लागतो.

 

बँकेकडून अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊन, आणि कर्ज फेडण्याची नुसती आश्वासनं देऊन एक पैही न देणारे कर्जदार, वेळप्रसंगी बँकेच्या कर्मचा-यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना परतवून लावणारे कर्जदार. कर्जवाटप करताना नियमांची पायमल्ली करून अशा कर्जदारांना पुन्हा पुन्हा कर्ज देणारे बँकेचे संचालक. सर्वासाधारणपणे बँकेच्या खातेदारांसमोर न येणारी ही अदृश्य बाजू खरे यांनी या कादंबरीतून प्रकाशात आणली आहे. बुडीत खात्यात गेलेली कर्ज, कर्ज घेण्यापूर्वी अजिजीने आणि नंतर उन्मत्तपणे वागणारे कर्जदार, कोणतीही शहानिशा न करता कर्ज वाटप करणारे बँक संचालक यांच्यामुळे आणि वाढत जाणा-या बुडीत कर्जांमुळे बँकेची उत्तम स्थिती असूनही काही दिवसांतच रत्नाकर बँकेवर जी परिस्थिती ओढवली, तशीच वेळ इतर कुठल्याही बँकेवर येऊ शकते त्यामुळेच “बँकेचा गाडा हाकणारे संचालक मंडळ, मँनेजमेंट आणि सेवकवर्ग या सर्वांचा एकत्र सहभाग आणि सुसंवाद असणे अत्यावश्यक असतं. त्यासाठीच बुध्दिमान, कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वाची जास्त गरज असते” हे खरे यांनी कादंबरीत लिहिलेलं वाक्य तंतोतंत पटतं.

 

डबघाईला आलेली अशीच आणखी एक बँक म्हणजे आर एम बँक. राणोजी मल्हारराव पतपेढीला, बँक व्यवसाय करण्याचं लायसन्स मिळाल्यावर तिचं नामकरण “राणोजी मल्हार को आँपरेटीव्ह बँक लिमिटेड” म्हणजेच “आर एम को आँपरेटीव्ह बँक लिमिटेड” असं झालं. मात्र राणोजी गेल्यानंतर त्यांच्या दुस-या मुलाने – सहदेवने निवडणुकीत कुरघोडी करून बँकेचं संचालकपद मिळताच, कर्जवाटप करतानाचे नियम धाब्यावर बसवून, मनाला येईल तसं कर्ज वाटप केलं आणि कर्ज वसूली करण्यासाठी, मोठया भावाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्याने राजकीय नेते शेलार यांची मदत घेतली. या बँकेवरही रिझर्व्ह बँकेची बंधनं येऊन पुढे ही बँक रत्नावली बँकेमधे विलीन केली जाते. त्यानंतर पुन्हा एकदा तोच डाव खेळला जाऊन, नियमांची पायमल्ली करून नव्याने कर्ज वाटप केलं जातं.

 

रत्नावली बँकेचं अंतर्गत राजकारण, रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप, खातेदार आणि ठेवीदारांवर होणारे त्याचे परिणाम, कर्जदारांवर भरलेले खटले, कोर्ट कचे-या या सर्व घटनांमधून बँकेच्या अंतर्गत कारभाराचं, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाचं आणि त्यामुळे खातेदारांवर होणा-या मानसिक परिणामांमधून मन सुन्न करणारी वास्तव कथा खरे यांनी कादंबरी रुपाने साकार केली आहे.

 

या कादंबरीच्या शेवटी रामदास खरे यांनी १४ पानी उपसंहार दिला आहे. ज्यामधे सुभाष लेले, निशिकांत बक्षी, मुक्ता नाईक आणि कादंबरीतल्या अन्य पात्रांचं पुढे काय होतं ते समजून घेण्यासाठी हा उपसंहार वाचणंही तेवढंच आवश्यक आहे. “”हेड आँफीसच्या एका अंधा-या कोप-यात नियती अदृश्यपणे उभी होती, स्वत:शीच हसत होती” असं एक वाक्य खरे यांनी १६ व्या प्रकरणातील पान नं १९० वर लिहिलं आहे. ही नियती, सहदेव, शेलार आणि बँकेच्या संचालकांना काय शिक्षा देते याचा उलगडा उपसंहार वाचताना होतो.

 

रामदास खरे यांच्यामधे कवी आणि चित्रकारही दडला आहे. पान नं ११३ वर ते एका छोटयाशा कवितेतून याची चूणूक देतात. तर पान नं १७ वर बाहेर पडणा-या पावसाचं, पान नं १३६ वर बेलार्ड इस्टेट परिसराचं, पान नं १३९ वर जहांगीर आर्ट गँलरीतील काही चित्रांचं, तसंच लालबाग परळ परीसराचंही शब्दचित्र खरे यांनी त्यांच्या लेखणीतून आपल्या डोळयासमोर उभं केलं आहे.

 

पुस्तकाचं मुखपृष्ठ अर्थातच रामदास खरे यांचंच असून कवयित्री आणि अनुवादक सुजाता राऊत “मुखपृष्ठ …. एक विचार” या शीर्षकांतर्गत आपलं मत व्यक्त करताना लिहितात “सर्वसामान्य माणसांना किमान स्थैर्यपूर्ण शाश्वत, सरळमार्गी जीवन अपेक्षित असते. पण अचानक स्वत:ची काही चूक नसताना जगण्याचा आर्थिक पाया डळमळीत होतो, मग सुरू होतो एक अधांतरी प्रवास. हे अधांतरीपण फक्त आर्थिक स्थितीचं नाही, त्यातून येणारी अगतिकता, भविष्याची चिंता, अकल्पित संकटानं विसविशीत झालेली जगण्याची असोशी आणि सर्वात मुख्य म्हणजे हरवलेला विश्र्वास. या सा-याला कारणीभूत काही मूठभर लोकांची, सत्ताधा-यांची मानसिकता, पैशासाठी कुठल्याही थराला पोचणं, अनिर्बंध लालसा, ओरबाडून घेण्याची वृत्ती. या सगळयात भरडला गेलेला सामान्य माणूस. कादंबरीचे हे मुखपृष्ठ या सगळ्या परिस्थितीवर सूचक भाष्य करते.”

 

कादंबरीविषयी आपलं मनोगत लिहिताना खरे यांनी “कविता म्हणजे सजवलेली कलात्मक लहानशी खोली तर कथा म्हणजे छोटया मोठया खोल्यांनी साकारलेला संपूर्ण मजला आणि कादंबरी म्हणजे अनेक खोल्यांची, अनेक मजल्यांची मजबूत पण देखणी इमारत” असं भाष्य करून कादंबरी लेखनाला बांधकामाची उपमा दिली आहे.

 

डाँ वंदना बोकिल कुलकर्णी यांनी या कादंबरीची अचूक शब्दांत पाठराखण (blurb) केली आहे. त्या लिहितात “द लाँस्ट बँलन्स ही लाक्षणिक अर्थानेदेखील ढळलेल्या तोलाची कहाणी आहे. अंतर्मुख करणारी, अस्वस्थ करणारी, सुन्न करणारी. रामदास खरे यांच्या ‘द लाँस्ट बँलन्स’ कादंबरीने मात्र परिश्रमपूर्वक बँकिंग क्षेत्राचे ताणेबाणे उलगडून दाखवले आहेत. राजकारणी, क्षुद्र स्वार्थ साधताना सारासार विचार हरवून बसणारी सामान्य माणसं, आपली आयुष्यभराची पुंजी बँकांच्या हवाली करणारे वयस्कर नागरिक, ठेवीदार आणि त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर गिधाडासारखे तुटून पडलेले निर्लज्ज संचालक आणि त्यांच्या आशीर्वादाने निडर झालेले कर्जदार यांच्या भेदक चित्रणातून साकार झालेली ही उत्कंठावर्धक कादंबरी”

 

ठाण्याच्या अनघा प्रकाशनाने हे आगळया वेगळया विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित कथा, कादंबरी आपल्याला वाचायला मिळते पण बँकिंग विश्र्वावरची अशी कादबंरी दुर्मिळ प्रकारात असावी. थोडक्यात सांगायचं तर अनघा प्रकाशनने प्रकाशित केलेली ही सुबक निर्मिती आपल्या घरच्या लायब्ररीत असायलाच हवी.

 

 

 

द लाँस्ट बँलन्स – रामदास खरे

 

पृष्ठे – २७२ मूल्य – रू ५००/-

 

प्रकाशक – अनघा प्रकाशन

Leave a Comment

× How can I help you?